शरद पवारांकडे दोन अंकी खासदार नाहीत, पण स्वप्न पंतप्रधान व्हायचं- मुख्यमंत्री #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस Image copyright Twitter

सर्व महत्त्वाच्या वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. दोन अंकी खासदार नसलेल्यांना पंतप्रधान व्हायचंय- मुख्यमंत्री

'लोकसभेत ज्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही. ते पण पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत. पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही', अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. मुंबईत मंगळवारी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीचे कधी दोन आकडी खासदारही निवडून आले नाहीत आणि ते पंतप्रधानपदाचं स्वप्न बघतात, संगीत खुर्ची खेळतात असा टोला पवारांना लगावला. तसंच, यावेळची निवडणूक ही भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्त्वाची आहे. 2019 मध्ये भारताचे भविष्य नक्की कुठल्या दिशेने जाणार हे ठरविण्याची ही निवडणूक आहे. जर यावेळी जनतेने जर काँग्रेसला सत्ता दिली आणि भाजपाला पराभूत केलं तर ती ऐतिहासिक चूक असेल आणि भारत आणखी 100 वर्ष मागे जाईल, असेही फडणवीस म्हणाले. असंही ते म्हणाले.

2. वायुप्रदुषणामुळे दरवर्षी सर्वाधिक बळी भारतात

वायुप्रदुषणामुळे देशात सर्वाधिक 1 लाख 8 हजार अपमृत्यू महाराष्ट्रात झाले असून देशाची आर्थिक राजधानी मुंबई देशातील सर्वाधिक प्रदुषित महानगर म्हणून पुढे येत आहे. देशात दरवर्षी 24 लाख वायू प्रदुषणामुळे होतात अशी बातमी लोकमतने दिली आहे.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीवर आधारित भारतातील पर्यावरणाची सद्य स्थिती 2019 हा अहवाल मंगळवारी विज्ञान आणि पर्यावरण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्राने लक्षवेधी प्रदुषणाची पातळी गाठल्याचं म्हटलं आहे.

3.राज्यात आजपासून आर्थिक आरक्षण लागू

राज्यातील आरक्षण नसलेल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलघटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण लागूझाले आहे. यासंदर्भात सरकारने मंगळवारी 'जीआर' जारी केला. १ फेब्रुवारीपासून आरक्षण लागू करण्यात आले. हा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही राखीव जातीत समावेश नसल्याचा उल्लेख असणारे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

केंद्र सरकारने देशातील आरक्षण नसलेल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याबाबत घटनादुरुस्ती केली. या निर्णयाची अंमबजावणी करण्यावर राज्याच्या कॅबिनेट आठवभरापूर्वी शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आता जीआर जारी करण्यात आला. आठ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्यांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल.

4. समान नागरी विधेयक आणि तिहेरी तलाक विधेयक सादर होण्याची शेवटची तारीख

समान नागरी हक्क विधेयक आणि तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत सादर करण्याची आज शेवटचा दिवस आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज ही विधेयकं संमत झाली नाहीत तर ती रदद्बातल ठरतील. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

ही दोन्ही विधेयकं लोकसभेत संमत झाल्यानंतर ती राज्यसभेत सादर करण्यात आली होती. नवीन लोकसभा अस्तित्वात आली की ही दोन्ही विधेयकं पुन्हा लोकसभेत संमत करावी लागतील.

5.रफाल संदर्भात कॅगचा अहवाल आज होणार सादर

रफाल संदर्भात असणारा बहुप्रतिक्षित कॅगचा अहवाल काल संसदेत सादर झाला नाही. तो आज सादर होणार असल्याची बातमी द हिंदूने दिली आहे.

महालेखापाल राजीव मेहरिषी जेव्हा अर्थसचिव होते तेव्हापासून रफाल कराराचे काम सुरू आहे. त्यामुळेच हा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. सरकारला वाचवण्याचा प्रयत्न मेहरिषी करत आहे असा आरोपही काँग्रेसने केल्याचे या बातमीत पुढे म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)