रफाल : राहुल गांधी रोज अनिल अंबानींवर आरोप करतात, सिब्बल त्यांचा कोर्टात बचाव करतात

कपिल सिब्बल Image copyright Getty Images

एकीकडे राहुल गांधी रोज रफाल विमान करारावरून नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांच्यावर हल्लाबोल करतायत, तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात दुसऱ्या एका खटल्यात चक्क अनिल अंबानी यांचा बचाव करताना दिसतात.

मंगळवारी कपिल सिब्बल यांचा एक वेगळाच अंदाज बघायला मिळाला. कारण सुप्रीम कोर्टात वकील म्हणून सिब्बल चक्क अनिल अंबानी यांचा बचाव करताना दिसले तर दुसरीकडे कोर्टातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राहुल यांच्याप्रमाणे अंबानींवर रफाल करारावरुन तोंडसुख घेतलं.

एरिक्सन इंडियाने सुप्रीम कोर्टात अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली आहे.

आणि याच प्रकरणात सिब्बल अनिल अंबानी यांचे वकील आहेत. कोर्टाच्या आदेशानंतरही अंबानी यांच्या कंपनीनं एरिक्सनची 550 कोटीची भरपाई केलेली नाही, असा आरोप एरिक्सन इंडियाने केला आहे.

मंगळवारी कपिल सिब्बल आणि मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात अनिल अंबानी यांच्या बाजूनं युक्तीवाद केला. तसंच अनिल अंबानी यांनी कुठल्याही प्रकारे कोर्टाचा अवमान केला नाही, असा दावाही केला.

RCom ला दिवाळखोरीत काढण्याची वेळ अनिल अंबानींवर का आली?

या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ने बुधवारी म्हणजे आज अनिल अंबानींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 2014मध्ये एरिक्सन इंडियाने रिलायन्स कम्युनिकेशनसोबत पुढच्या 7 वर्षांसाठी ऑपरेशन आणि व्यवस्थापनासाठीचा करार केला होता.

त्यासाठीच्या 1500 कोटी रुपयांची भरपाई रिलायन्स कम्युनिकेशननं केली नाही, असा एरिक्सन इंडियाचा आरोप आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही आरकॉमचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांनी 7.9 कोटी डॉलरची भरपाई केली नाही, त्यामुळे त्यांना जेलमध्ये पाठवा अशी मागणी एरिक्सन इंडियाने याचिकेत केली आहे.

Image copyright Getty Images

रिलायन्स कम्युनिकेशनकडे तब्बल 15.8 कोटी डॉलरची थकबाकी आहे. मात्र एरिक्सन इंडियाने कोर्टात धाव घेतल्यानंतर आरकॉमनं 1.86 कोटी डॉलर कोर्टात जमा केले आहेत.

कोर्टात सुनावणीला जाण्यापूर्वी काही तास काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी रफाल मुद्द्यावरून नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानींविरोधात ट्विट केलं होतं. आणि मंगळवारीच नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींसाठी मध्यस्थाचं काम करत होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

इतकंच नाही तर नरेंद्र मोदी जेव्हा 36 रफाल लढाई विमानांच्या करारासाठी फ्रान्सला गेले, त्याआधी फक्त 10 दिवस अनिल अंबानींनी स्वत: पॅरीसला जाऊन फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली होती.

त्यामुळेच देशाच्या तत्कालीन संरक्षणमंत्री किंवा संरक्षण सचिवांना रफाल कराराची माहिती नव्हती, मात्र ती अनिल अंबानींना होती असा आरोप राहुल गांधींनी केला होता.

2017मध्येही कपिल सिब्बल यांच्यामुळे काँग्रेसवर खजिल होण्याची वेळ आली होती. कारण कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टात ट्रिपल तलाकविरोधातील ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या बाजूने वकील म्हणून उभे होते.

इतकंच नाही तर शारदा चिटफंड घोटाळ्यात सिब्बल हे ममता बॅनर्जी सरकारचे वकील म्हणून उभे कोर्टात उभे होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)