शरद पवार पंतप्रधान होण्याची शक्यता सध्याच्या घडीला किती ?

शरद पवार Image copyright RAVEENDRAN/AFP/Getty Images

निवडणुका जवळ आल्या की शरद पवार पंतप्रधान होणार का अशी चर्चा सुरू होते. आगामी 2019 ची निवडणूकही त्याला अपवाद नाही. याआधीही अनेकदा त्यांची पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली आहे.

कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना "ज्यांच्या खासदारांची संख्या दोनअंकी नाही, तेसुद्धा पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहात आहेत. त्यामुळे पंतप्रधानपद आहे की संगीतखुर्ची हेच कळत नाही" असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होण्याची शक्यता सध्याच्या घडीला आहे का? याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

नुकतंच शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकांआधी त्यांनी आता फक्त राज्यसभेच्या माध्यमातून संसदीय राजकारण करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

"मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही, पण याबाबत विचार करून सांगू," असं शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांची ही नवी खेळी असल्याचं बोललं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला पवारांच्या नेहमीच्याच स्टाइलचा हा 'स्ट्रोक' असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते मात्र करतातच, अशी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ख्याती आहे असं राजकीय निरीक्षक किंवा पवारांचं राजकारण जवळून पाहणारे विश्लेषक सांगतात.

त्यामुळेच राज्यसभेत असणाऱ्या शरद पवारांनी लोकसभेत जाण्याबाबत विचार करु असं म्हटल्यानंतर या वक्तव्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न राजकीय विश्लेषक करत आहेत. काहींना हे वक्तव्य महत्त्वाचं वाटत आहे तर काही विश्लेषकांना ते अजिबात महत्त्वाचं वाटत नाही.

अधुरी एक कहाणी...

शरद पवारांना याआधी पंतप्रधानपदाने वारंवार हुलकावणी दिली आहे. ते आतापर्यंत तीनदा पंतप्रधानपदाच्या अगदी जवळ आले होते असं राजकीय निरीक्षक मानतात. 1991 साली राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर सोनिया गांधींना राजकारणात रस नव्हता आणि काँग्रेसकडे मोठा उमेदवार नव्हता. तेव्हा पवारांच्या नावाची चर्चा झाली. मात्र तेव्हा पंतप्रधानपद पी.व्ही. नरसिंह रावांच्या वाट्याला गेलं.

1999 साली जेव्हा वाजपेयींचं सरकार 13 महिन्यांत कोसळलं तेव्हा शरद पवार विरोधी पक्ष नेते होते. संसदीय प्रघाताप्रमाणे सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. एव्हाना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात होती. त्यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी थेट काँग्रेसला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

Image copyright You tube Grab

2009 साली भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना बहुमत मिळण्याची शक्यता नव्हती तेव्हाही तिसरी आघाडी स्थापन करून पंतप्रधान होण्याची आकांक्षा अपूर्णच राहिली.

सध्याची काय परिस्थिती आहे?

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे दिलेले संकेत आणि विरोधी पक्षांचं शक्तीप्रदर्शन पाहता पवारांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. असं असलं तरी ही शक्यता राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना धूसर वाटते.

ते म्हणतात, "काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष 150-160 च्या आत राहिले तर तिसऱ्या आघाडीचं सरकार येऊ शकतं. त्याला काँग्रेस आणि भाजपचा पाठिंबा मिळू शकतो. 2004 ला जसं एक मोठी आघाडी उभी राहून काँग्रेसचं सरकार आलं. त्याप्रमाणे निवडणुकीनंतर आघाड्यांची जी पुनरर्चना होईल त्यात जर महत्त्वाची भूमिका बजावायची असेल तर संख्याबळ असणं अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आघाडीची पुनर्रचना झाल्यानंतर जे खिचडी सरकार तयार होईल त्यात महत्त्वाची भूमिका असावी असं भाजप आणि काँग्रेसला वाटेल. त्यावेळी किंगमेकर होऊन पवारांची पंतप्रधान होण्याची शक्यता आहे मात्र तीसुद्धा धूसर आहे असं मला वाटतं."

त्याचवेळी ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी आताच्या क्षणाला कोण पंतप्रधान होईल हे सांगणं कठीण असल्याचं म्हटलं. भारतातल्या प्रत्येक राजकारण्याची पंतप्रधान होण्याची आकांक्षा असतेच. त्याला शरद पवारही अपवाद नाहीत. त्यामुळे जर स्पष्ट बहुमत कुठल्याच पक्षाला मिळालं नाही तर ज्या नेत्याला सर्वाधिक पक्षांचा आणि राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळेल असा नेता पंतप्रधान होऊ शकतो.

माढ्याची परिस्थिती नक्की काय आहे?

ज्या माढा लोकसभा मतदारसंघावरून या चर्चेला उत आला आहे तया मतदारसंघाची प्रत्यक्ष परिस्थितीही समर खडस यांनी बीबीसी मराठीला सांगितली. ते सांगतात, "माढ्यात विजयसिंह मोहिते पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्यात वाद आहे. बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना भाजप निवडणूक लढवण्यासाठी फूस लावत आहे. असं झालं तर तिथे अडचण निर्माण होऊ शकते. पक्षाअंतर्गत दुफळी माजू शकते.

Image copyright GettyImages/Hindustan Times
प्रतिमा मथळा शरद पवार आणि तारिक अन्वर

त्यातून शरद पवारांचं नाव समोर आलं आहे. शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्यात सलोखा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. ते यशस्वी होत नाही म्हणून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू केली. ते गेल्या एक वर्षापासून तिथे कामही करत आहेत. त्यानंतर शरद पवारांचं नाव विजयसिंह मोहिते पाटलांनी सुचवलं आहे. याचा अर्थ ते लढतीलच याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही."

त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होणार का हा शक्य या अशक्य या दोन शब्दांतला संगीतखुर्चीचा खेळ आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)