Valentine's Day: ‘गेले सांगायचे राहुनि’ ही हुरहूर आता LGBT समुदायातून दूर होईल

व्हॅलेंटाइन डे Image copyright Emilija Randjelovic/getty

'प्रेम कुणावरही करावं' असं कुसुमाग्रजांनी म्हटलेलं असलं, तरी भारतीय समाजाला हे मान्य नव्हतं. एलजीबीटी समुदायासाठी प्रेम करणं हा गुन्हा समजला जात होता. अगदी अलीकडेच ६ सप्टेंबर, २०१८ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७च्या जोखडातून या समुदायाची मुक्तता केली.

यापुढे परस्पर संमतीने झालेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा मानण्यात येणार नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा न्यायालयाने दिला.

या पार्श्वभूमीवर या वर्षी येणारा 'व्हॅलेन्टाईन्स डे' महत्त्वाचा आहे. सर्वार्थाने प्रेमदिन म्हणून संबोधण्यासाठी.

जिथं अजूनही आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना आपला समाज स्वीकारत नाहीये, तिथं दोन पुरुषांच्या किंवा दोन स्त्रियांच्या प्रेमाला आनंदाने स्वीकारणं तर दूरच राहिलं.

आपलं प्रेम जग स्वीकारत नाही, म्हणून काही महिन्यांपूर्वीच अहमदाबादेत दोन विवाहित महिलांनी साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.

अशा घटना होत राहतात, दुसरा दिवस उजाडला की लोक विसरूनही जातात. मात्र तरीही आता अनेकांना समाजासमोर आपलं प्रेम व्यक्त करता येईल. म्हणूनच आजचा व्हॅलेंटाइन वेगळा आहे.

Image copyright klenova/getty

मी आय. टी. कंपनीत नोकरी करणारा मध्यमवर्गीय घरातला मुलगा. हुशार होतो आणि प्रवाहाविरुद्ध जाण्याची इच्छा असूनही धमक नव्हती म्हणूनही आणि स्वतःला नेमकं काय आवडतंय याबद्दल संदिग्धता होती. खरंतर ती अजूनही असल्यामुळे दहावीनंतर सायन्स मग इंजिनियरिंगनंतर नोकरी असा धोपटमार्गाचा प्रवास केला.

याच आंतरिक संघर्षातून लिहिण्याची, व्यक्त होण्याची प्रथम आवड आणि नंतर गरज तयार झाली. वयाच्या याच टप्प्यावर जिथं करिअरच्या वाटांवर धडपडत होतो, तिथं इतरही खाचखळगे होते.

मैत्रिणी म्हणून मुली ठिक वाटायच्या. पण मला मुलं आवडतात ही गोष्ट घरी साधारण एकवीस-बाविसाव्या वर्षीच मी घरच्यांना सांगितली. तेव्हा घरी एकच गहजब झाला होता.

आईबाबा दोघेही ही गोष्ट स्वीकारण्याच्या मनःस्थितीत नव्हते. आताही त्यांनी पूर्णपणे स्वीकारलं नसलं, तरी बऱ्यापैकी समजून घेतलं आहे.

मी स्वतःला स्वीकारल्यानंतर आता बरीच वर्षं गेली आहेत. मला आवडणाऱ्या मुलाबद्दल केवळ शारीरिक आकर्षण नाही तर त्यापलिकडं काहीतरी आहे हे मला जाणवलं आहे. त्यालाच प्रेम म्हणत असावेत.

व्हॅलेंटाइन्स डे हा वरवर चोवीस तासांचा सोहळा वाटत असला तरी यंदा तो एका मोठ्या वर्गाला कोंडीतून मोकळं करणारा ठरेल असं मला वाटतं. कित्येक शतकांची कोंडी एका निकालानं फुटली. त्यामुळं आता बदल दिसायला लागले आहेत.

अलीकडेच २ फेब्रुवारी रोजी मुंबईत एलजीबीटी समुदायाचा प्राईड मार्च निघाला होता. यावर्षीच्या प्राईड मार्चचं वैशिष्ट्य हे की अनेकांनी मुखवटे फेकले होते. हा एक अतिशय महत्त्वाचा आणि स्वागतार्ह बदल आहे.

न्यायालयाच्या निर्णयाने आपली लैंगिकता समाजापासून लपवून जगणाऱ्या अनेकांना हे बळ दिलं. पण म्हणून सगळे प्रश्न संपलेत, असं नक्कीच नाही.

'व्हॅलेन्टाईन्स डे' साजरा करण्याला आपल्या दांभिक, दुटप्पी समाजाचा भारतीय संस्कृती जपण्याच्या नावाखाली नेहमीच विरोध होत आलेला आहे.

काही राजकीय पक्षांची अरेरावी, गिफ्ट शॉप्सची जाळपोळ, जोडप्यांना मारहाण हे सर्व तर दरवर्षी ठरलेलेच. तरीही हा दिवस दरवर्षी तितक्याच उत्साहाने तरुणाई साजरा करते. बाजारपेठा भेटवस्तूंनी सजतात. प्रेम व्यक्त करण्याच्या नाना तऱ्हा शोधतात. आसपासच्या सर्व अराजकातून खरं प्रेम आपला मार्ग शोधतंच.

कोशात जगणाऱ्या समलैंगिक स्त्री-पुरुषांच्या मार्गात अनेक आव्हाने आहेत. ट्रान्सजेंडर्सचा मार्ग तर अधिकच खडतर. स्वतःच्या मूलभूत मानवी हक्कांसाठीचीच त्यांची लढाई अजून चालू आहे.

केवळ न्यायालयाने कलमात बदल करून गोष्टी एका रात्रीत बदलत नसतात. समाजमन बदलायला त्यापेक्षा फार अधिक काळ जावा लागतो. माझ्या फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये फेक अकाऊंटने वावरणारे अनेक गे मित्र अजूनही कोशात जगत आहेत.

Image copyright eli_asenova/getty

मोठ्या शहरांमध्ये ज्याप्रमाणे प्राईड मार्च निघतात आणि त्याद्वारे निदान जनसामान्यांपर्यंत या गोष्टी निदान पोहोचत तरी असतात, ते चित्र लहान शहरांत किंवा गावांमध्ये अजूनही नाही.

मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये एलजीबीटी समुदायाच्या होणाऱ्या थट्टेविरुद्ध किंवा शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी यंत्रणा आहेत, त्या सर्वत्र असण्याची गरज सर्वांना अजूनही कळलेली नाही.

माझा स्वतःची लैंगिकता स्वीकारण्याचा काळ साधारण एका दशकाचा होता. यात अनेकानेक स्थित्यंतरं होती. मुलींना प्रपोज करून पाहणं, त्यांनी होकार दिला तर सर्व काही ठीक होईल या भ्रमात जगणं, ही केवळ एका विशिष्ट वयातली अवस्था आहे ज्यात सगळ्यांना असं वाटत असतं, जाईल आपोआप निघून, अशी स्वतःची समजूत घालून घेणं, सायकिअॅट्रिस्टच्या औषधांनी सगळं ठीक होईल या आशेवर दिवस ढकलत राहणं, या सगळ्या गोष्टींनंतर एक दिवस माझं मलाच कळलं की या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

लैंगिकता एक्सप्लोअर करण्याच्या टप्प्यावर एक स्ट्रेट मित्र भेटला. नकळत्या वयात झालेल्या त्या प्रयोगांना कसलंही लेबल लागलेलं नव्हतं. त्याला ना कसल्या प्रेमाचा गुलाबी गंध होता, ना कसल्या फसवणुकीचा गिल्ट. प्रेम वगैरे गोष्टी समजण्याचं ते वय नव्हतंच.

सगळंच उथळ, वरवरचं. फक्त आपल्याला समजून घेणारं, न झिडकारणारं या पुरुषांची सत्ता असलेल्या जगात कोणीतरी आहे, हीच भावना सुखावणारी होती.

आजूबाजूला कॉलेजमध्ये सगळीकडे देखणे पुरुष वावरत असताना, त्यांच्यातलं कुणी आवडत असताना त्या व्यक्तीला हे सांगण्यासाठी मात्र भीड चेपत नव्हती.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
व्हॅलेंटाईन डे स्पेशल: एका आंतरजातीय लग्नाची गोष्ट

शारीरिक बळाचा किंबहुना केवळ पुरुष असल्याचा माज बाळगत आसपास स्त्रियांवर, मुलींवर होणारे बलात्कार उघड्या डोळ्यांनी दिसत असताना मनात असूनही पुरुषांकडे कधी प्रेम व्यक्त करण्याचं धाडस झालं नाही. फेक अकाऊंटवरून होणाऱ्या भेटींमध्येही अनेक आव्हाने होती, अजूनही आहेत.

स्वतःच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर होताच, पण हळूहळू सगळं समजून घेत असताना एसटीडीजबद्दल (लैंगिक संबंधांद्वारे पसरणाऱ्या रोगांबद्दल) वाचून आपण सजगपणे जगायला हवं, ही भावना मूळ धरत गेली.

प्राईड मार्चमध्ये कधीही मी प्रत्यक्ष सहभागी झालो नसलो तरी आसपास घडणाऱ्या या चळवळी, एलजीबीटी चित्रपट महोत्सवांनी मला सर्वप्रथम स्वतःच्या मनातला समाजाने तयार केलेला अपराधगंड काढून टाकायला मोलाची मदत केली.

मेघना पेठे, कविता महाजन, गौरी देशपांडे यांचं लिखाण वाचत होतो. त्यातून प्रेमाची परिणती लग्नात झाली म्हणजे घोडं गंगेत न्हालं, असं होत नाही, हे उमजत गेलं. आणि लग्न झालेली जोडपी एकमेकांवर प्रेम करत असतात, हा गोड गैरसमजही गळून पडला.

तरीही प्रेम शोधण्याचे प्रयत्न संपत नसतात. आपण प्रेम करतोय, गुन्हा नाही, या गोष्टीवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वीचा बराचसा काळ हे स्वतःला समजावण्यात गेल्यावर आता माझं मन शांत आहे.

समोरची व्यक्ती आपल्यासारखी नसली तर काय, या भीतीने मनातलं गूज मनातच ठेवणाऱ्या माझ्या अनेक मित्रांना निदान या वर्षी तरी आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येतील, असा आशावाद मनी बाळगायला हरकत नाही.

समतेवर आधारित समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाने उचललेल्या पावलाचं स्वागत आहेच. नकार पचवण्याचं बळ तर अंगी हवंच, पण "गेले सांगायचे राहुनि" ही हुरहूर तरी हा व्हॅलेंटाईन डे दूर करेल, असं मनापासून वाटतं.

(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)