विष्णू सूर्या वाघ यांचं द.आफ्रिकेत निधन, साहित्य विश्वात शोककळा

विष्णू वाघ Image copyright FACEBOOK

कवी, लेखक, नाटककार, संपादक, आमदार अशा विविध भूमिका पार पाडणाऱ्या साहित्यिक विष्णू सूर्या वाघ (53) यांचं निधन झालं आहे.

'विष्णू वाघ यांचं दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथं 8 फेब्रुवारी रोजी निधनं झाल्याचं त्यांच्या पत्नी अरुणा यांनी एका संदेशाद्वारे जाहीर केल्याचं', वृत्त टाइम्स नाऊनं प्रसिद्ध केलं आहे.

विष्णू वाघ यांनी मराठीमध्ये अनेक नाटकं तसंच संगीत नाटकांचं लेखन केलं होत. मराठीप्रमाणे त्यांची कोकणी नाटकं आणि एकांकिकाही प्रसिद्ध आहेत. अनेक नाटकांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.

पर्जन्यधून, फिलगूड फेणी, बच्चूभाईची वाडी, लोकोपनिषद, वाघनखे, सुशेगाद, सुदिरसुक्त हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध होते. एका माणसाचा मृत्यू, कृष्णद्वैतायन, आदित्यचक्षू, तुका अभंग अभंग ही त्यांची नाटकं गाजली आहेत. शिवगोमंतक हे महाकाव्य त्यांनी लिहिले. सळसळ पिंपळपानांची हे चरित्रलेखनही त्यांनी केलं आहे.

2012 साली ते सांत आंद्रे या मतदारसंघातून गोवा विधानसभेत निवडून गेले. तसेच ते गोवा विधानसभेचे सभापतीही होते. 2016 पासून त्यांची प्रकृती सतत ढासळत गेली.

विष्णू वाघ यांना बाकीबाब पुरस्कार, दमानी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, धनंजय कीर पुरस्कार, कला अकादमी पुरस्कार, गोवारत्न पुरस्कार, युवा चेतना पुरस्कार असे अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

स्पष्टवक्ता, निर्भिड कवी आणि नेता

'विष्णू वाघ यांचा स्वभाव अत्यंत निर्भिड होता, ते स्पष्टवक्ते होते'. राजकारणामध्ये प्रवेश केल्यावरही अयोग्य गोष्टींवर ते स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत असत असं मत पत्रकार अरुण नाईक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

ते म्हणाले, "नाटक, काव्याप्रमाणे संगीत नाटकं तितक्याच सहजतेने लिहिणारा हा साहित्यिक होता. वाघ मराठी आणि कोकणी सफाईदारपणे बोलायचे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासमवेत एका कार्यक्रमात त्यांनी मराठी, कोकणी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये सुंदर भाषणं केल्याचं मला आठवतं. त्यांना अध्यात्माचीही आवड होती, विविध विषयांचा अभ्यास हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल."

काव्यहोत्र थंडावलं

विष्णू सूर्या वाघ यांच्या निधनामुळं एक काव्यहोत्र थंडावलं आहे अशी प्रतिक्रिया गोव्यामधील मराठीचे निवृत्त प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, गोव्यामध्ये कोकणीसह मराठीलाही महत्त्व असलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षामध्ये प्रचाराची धुरा सांभाळल्यानंतर ते काँग्रेसमध्ये काही काळ होते. 2012 साली त्यांनी भाजपातर्फे निवडणूक लढविली. 'झिंजिर झंजिर सांज' हा त्यांचा कवितासंग्रह विशेष प्रसिद्ध होता. गोव्यातल्या राजकीय पार्श्वभूमीवर 'सम्राट' नावाचं नाटक त्यांनी लिहिलं होतं. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी अनेक काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. सतत तीन दिवस चालणारा काव्यहोत्र हा कार्यक्रम त्यांनी दोनदा राबवला होता. त्यांच्या जाण्यानं एक काव्यहोत्रच थंडावलं आहे. "

विष्णू वाघ यांनी पत्रकारितेची कारकीर्द बेळगाव तरुण भारत त्यानंतर गोमंतक दैनिकामध्ये ते गेले, त्यानंतर त्यांनी सुदर्शन हे साप्ताहिक काढलं होतं असंही कृष्णाजी कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

कौतुकाची थाप विसरणं शक्य नाही

विष्णू वाघ अत्यंत रसिक आणि गुणग्राही होते. नव्या कवींना शाबासकी ते देत अशी आठवण महाराष्ट्र विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, "दादरला राहाणारे माझे मित्र पंकज पुरंदरे यांनी माझी 'मुजरा' नावाची कविता विष्णू वाघ यांना दाखवली होती. कविता वाचल्यावर त्यांनी मध्यरात्री मला फोन करून दाद दिली होती. नंतर गुजरात विधानसभेत सर्व विधानसभा अध्यक्षांच्या परिषदेत भेट झाली होती. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा माझ्या कवितेचे कौतुक केले. इतक्या मोठ्या व्यक्तीने माझ्यासारख्या सामान्याचं कौतुक करणं, शाबासकी देणं मला भारावून टाकणारं होतं. इतरवेळी त्यांच्याशी फोनवरून संपर्क व्हायचा. मात्र आता ते शक्य नाही याचं दुःख वाटतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)