Valentine's Day : मधुबालावरील प्रेमाची जेव्हा दिलीप कुमारांनी कोर्टात कबुली दिली...

मधुबाला Image copyright MADHUR BHUSHAN

भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वांत सुंदर चेहरा कोणता या प्रश्नावर आजही अनेकांच्या ओठावर पहिलं नाव येतं मधुबालाचं. मधुबालाच्या वेगवेगळ्या चित्रपटातल्या अदा डोळ्यांसमोर येतात.

हावडा ब्रिज चित्रपटातील मादक डान्सर, मिस्टर अँड मिसेस 55 मधली अवखळ तरूणी, अकबरासमोर बेधडकपणे प्यार किया तो डरना क्या म्हणणारी मुघल ए आझम चित्रपटातली अनारकली...मधुबालाच्या या भूमिका एकापाठोपाठ एक आठवतात.

मोहक, सुंदर, दिलखेचक आणि प्रसन्न, चेहऱ्यावर तेज अशी अनेक विशेषणं तिच्या सौंदर्याला लावली गेली. 1990 मध्ये एका चित्रपटविषयक मासिकानं बॉलिवूडमधील सार्वकालिक श्रेष्ठ अभिनेत्रींविषयी सर्वेक्षण केलं होतं. त्यामध्ये 58 टक्के लोकांनी मधुबालाला पसंती दिली.

दुसऱ्या क्रमांकावर होती अभिनेत्री नर्गिस. मात्र नर्गिसला मिळालेल्या मतांची संख्या होती 13 टक्के. यावरूनच मधुबालाची लोकप्रियता पुढच्या पिढ्यांमध्येही किती टिकून होती हे लक्षात येतं. मधुबालाला आपल्यातून जाऊन पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र नवीन पिढीही सौंदर्याचा मापदंड म्हणून मधुबालाच्याच नावाला पसंती देते.

सौंदर्यवती मधुबाला

Image copyright MADHUR BHUSHAN

मधुबालासोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे अभिनेते राजकपूर यांनी एकदा म्हटलं होतं, की परमेश्वरानं त्यांना स्वतःच्या हातानं संगमरवरातून घडवलं आहे. पेंग्विन इंडियानं प्रकाशित आणि भाईचंद पटेल यांनी संपादित केलेल्या बॉलिवूड टॉप 20- सुपरस्टार्स ऑफ इंडिया या पुस्तकात राज कपूर यांचं हे विधान आहे.

या पुस्तकात शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला एक प्रसंग आहे. ठाकरे चित्रपटसृष्टीत काम करत होते, तेव्हाची ही आठवण आहे. त्यांनी एक दिवस मधुबालाचं चित्रीकरण पाहिलं. मधुबालाला पाहिल्यानंतर आजचा दिवस सार्थकी लागला असा विचार त्यांच्या मनात आला.

अभिनेते शम्मी कपूर यांनीही आपलं आत्मचरित्र शम्मी कपूर- द गेम चेंजरमध्ये एक पूर्ण प्रकरण मधुबालावर लिहिलं आहे. 'फेल मॅडली इन लव विथ मधुबाला' असं या प्रकरणाचं शीर्षक आहे. "मधु दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते हे मला माहिती होतं. पण तरीही मी तिच्या प्रेमात पडलो होतो. यात कोणाचाच दोष नाही. तिच्याइतकी सुंदर स्त्री मी माझ्या आयुष्यात पाहिली नव्हती," असं शम्मी कपूर यांनी लिहिलं आहे.

Image copyright MUGAL E AZAM TWITTER @FILM

शम्मी कपूर यांचं आत्मचरित्र 2011 मध्ये प्रकाशित झालं होतं. आज साठ वर्षांनंतरही जेव्हा मधुबालाचा विचार मनात येतो, तेव्हा हृदयात हलकीशी कळ उमटते, असंही शम्मी यांनी लिहिलं होतं. शम्मी यांच्यावर मधुबालाच्या सौंदर्याची जणू मोहिनी पडली होती. शम्मी आपल्या पदार्पणाचा चित्रपट 'रेल का डब्बा'च्या चित्रीकरणादरम्यान मधुबालाला पाहिल्यानंतर संवादच विसरून जायचे.

मधुबाला यांना अवघं 36 वर्षांचं आयुष्य लाभलं होतं. त्यातही शेवटच्या नऊ वर्षांत त्यांना आपल्या घरातून बाहेरही पडता येत नव्हतं. मात्र आपल्या अल्पायुष्यातच त्यांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं, जे आजही अबाधित आहे.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चित्रपटसृष्टीत

जन्मतःच मधुबालाच्या हृदयाला छिद्र होतं. डॉक्टरांनी आरामाची गरज असल्याचं वारंवार सांगूनही मधुबालाच्या वडिलांनी तिला अशा जगात ढकलंल, जिथं रात्रंदिवस काम करावं लागायचं.

अकरा बहिण-भावंडांच्या कुटुंबात मधुबाला ही एकटी कमावती होती. तिच्यावरच सर्वजण आर्थिकदृष्ट्या अवलंबून होते. मधुबालाचे वडील लाहौरमध्ये इंपीरियल टोबॅको कंपनीमध्ये काम करायचे. मात्र नोकरी गेल्यानंतर ते दिल्लीला आले. तिथून ते मुंबईला पोहोचले. इथं आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की आपल्या सुंदर मुलीला चित्रपटांमध्ये सहज काम मिळेल.

अवघ्या सहाव्या वर्षी मधुबाला यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. इतक्या लहानवयापासून कष्ट करताना मधुबाला शारीरिक-मानसिकदृष्ट्या अगदी झिजून गेली. या कामाचा तिच्यावर कसा परिणाम झाला होतो, याची झलक फिल्मफेअरच्या एका विशेष अंकामध्ये पहायला मिळते. 1957 साली फिल्मफेअरनं काढलेल्या या अंकामध्ये त्यावेळेच्या सर्व सुपरस्टार्सना स्वतःबद्दल काहीतरी लिहायला सांगितलं होतं. नर्गिस, मीनाकुमारी, नूतन, राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, किशोर कुमार, अशोक कुमार या सर्वांनी स्वतःबद्दल लिहिलं होतं. मधुबाला यांनी मात्र स्वतःबद्दल काही लिहिण्यास नकार देत माफी मागितली होती.

Image copyright MADHUR BHUSHAN

आपल्या नकाराचं कारण देताना त्यांनी लिहिलं होतं, "माझं अस्तित्वंच हरवलंय. अशापरिस्थितीत मी स्वतःबद्दल काय लिहू? तुम्ही मला अशा व्यक्तिबद्दल लिहायला सांगितलंय जिला मी ओळखतही नाही. मला कधी स्वतःला निवांतपणे भेटण्याचा वेळच मिळाला नाही. मी पाच वर्षांची असताना मला कोणी काही विचारलं नाही आणि मी या भूल-भुलैय्यामध्ये आले. चित्रपटसृष्टीनं मला शिकवलेला पहिला धडा म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल सगळं काही विसरावं लागतं. तरच तुम्ही अभिनय करू शकता. अशापरिस्थितीत मी स्वतःबद्दल काय लिहू?"

मधुबालाच्या आयुष्यावर खतीजा अकबर यांनी 'आय वाँट टू लिव्ह-द स्टोरी ऑफ मधुबाला' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकातून मधुबालाला आपल्या सौंदर्याचा अजिबात अहंकार नव्हता हे स्पष्ट होतं. आपल्या कामाप्रति त्यांची शिस्त आणि शिकत राहण्याची उर्मी कधीच कमी झाली नाही.

मधुबाला त्याकाळातली एकमेव अशी कलाकार होती, जी वेळेच्या आधीच सेटवर हजर रहायची. अर्थात, नाजूक तब्येतीमुळे मधुबाला रात्री शूटिंग करायची नाही. आपल्या पूर्ण कारकिर्दीत त्यांनी कधी आउटडोर शूटिंगही केलं नाही. मात्र तरीही मधुबाला त्याकाळची आघाडीची अभिनेत्री होती.

मधुबाला आपल्या कामात किती चोख होत्या याचं उदाहरण म्हणजे मुघले आजम चित्रपटातील दिलीप कुमारसोबतचे प्रेमप्रसंग. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या तरल रोमँटिक दृश्यांमध्ये मुघले आजमच्या प्रेमप्रसंगांचा समावेश केला जातो. मात्र पडद्यावर उत्कट प्रेमप्रसंग साकारणाऱ्या दिलीप कुमार आणि मधुबालामधील संबंध मुघले आजमच्यावेळेस पूर्णपणे संपुष्टात आले होते. दोघं एकमेकांशी बोलतही नव्हते.

दिलीप कुमार-मधुबालाची प्रेमकहाणी

Image copyright MADHUR BHUSHAN

दिलीप कुमार-मधुबाला ही एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीतली सर्वांत रोमँटिक जोडी मानली जायची. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. 1955 साली इन्सानियत या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी पहिल्यांदा दोघेही सार्वजनिकरित्या एकत्र दिसले. मात्र दोघं असे एकत्र येण्याची हीच शेवटचीही वेळ होती.

हा इव्हेंट कव्हर करणारे पत्रकार के. राजदान यांनी लिहिलं आहे, की मधुबालाला यापूर्वी इतकं खूश कधीच पाहिलं नव्हतं. रॉक्सी चित्रपटगृहात इन्सानियतचा प्रीमिअर झाला. कार्यक्रमादरम्यान मधुबाला पूर्णवेळ दिलीप कुमारचा हात हातात घेऊन फिरत होती.

मात्र मधुबालाच्या वडिलांना त्यांचं नातं मान्य नव्हतं, असं म्हटलं जातं. याबद्दल अनेक फिल्मी मासिकांमधून लिहूनही आलं होतं. दिलीपकुमार यांनी आपल्या आत्मचरित्रात वेगळीच गोष्ट सांगितली आहे.

कसे वेगळे झाले दिलीप कुमार-मधुबाला?

दिलीप कुमार यांनी लिहिलं आहे, "मधुच्या वडिलांचा माझ्या आणि तिच्या लग्नाला विरोध नव्हता. त्यांची स्वतःची प्रॉडक्शन कंपनी होती. एकाच घरात दोन स्टार्स असतील या विचारानंच ते खूप खूश झाले होते. दिलीप कुमार आणि मधुबालानं अखंड हातात हात घालून चित्रपटात रोमान्स करावा, अशीच त्यांची इच्छा होती.

मग नेमकं असं काय झालं की बॉलिवूडच्या सर्वाधिक गाजलेल्या प्रेमकथेचा शोकांत झाला. दिलीप कुमार यांनी याबद्दल लिहिलं आहे, "जेव्हा मला मधुकडून तिच्या वडिलांच्या या योजनेबाबत कळल्यानंतर मी त्यांच्याशी अनेकदा बोललो. मी त्यांना सांगितलं, की माझी कामाची पद्धत खूप वेगळी आहे. मी माझ्या हिशोबानं चित्रपट निवडतो. माझं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस असलं तरी मी कामाच्या पद्धतीत बदल करू शकत नाही."

Image copyright MUGHAL-E-AZAM

मधुबाला यांचे वडील अयातुल्ला खान यांना ही गोष्ट खटकली, असं दिलीप कुमार यांनी म्हटलं. त्यांना दिलीप कुमार हे आडमुठे आणि हटवादी वाटायला लागले. दिलीप कुमार यांच्या मते मधुबाला नेहमीच आपल्या वडिलांचंच ऐकायची. ती मला म्हणायची की लग्नानंतर सगळं नीट होईल.

असंही नव्हतं की दिलीप कुमार लग्नासाठी तयार नव्हते. 1956 साली 'ढाके की मलमल' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकदा त्यांनी मधुबालाला लग्नाची गळ घातली. माझ्या घरी काझी वाट पाहत आहेत, आपण आजच लग्न करू असा आग्रह त्यांनी केला. मात्र त्यांनी असं म्हटल्यावर मधुबाला रडायला लागली. दिलीप कुमार यांनी निर्वाणीचं सांगितलं, की आज तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुझ्याकडे कधीच परत येणार नाही.

त्यानंतर खरंच दिलीप कुमार मधुबाला यांच्याकडे परत आले नाहीत. 1957 साली त्यांच्यामध्ये झालेल्या वादानं उरलंसुरलं प्रेमही संपुष्टात आलं. 1957 साली प्रदर्शित झालेल्या 'नया दौर' चित्रपटासाठी दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनी दिलीप कुमार आणि मधुबालाला साइन केलं होतं. या चित्रपटाचं आउटडोअर शूटिंग पुणे आणि भोपाळमध्ये होणार होतं. मात्र मधुबालाचे वडील तिला भोपाळला पाठवायला तयार नव्हते. तोपर्यंत बी. आर. चोप्रांनी आपल्या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग पूर्ण केलं होतं.

Image copyright MADHUR BHUSHAN

वकील असलेले बी. आर. चोप्रा हे प्रकरण कोर्टात घेऊन गेले. दरम्यान, त्यांनी मधुबालाच्या जागी वैजयंतीमालाला साइन केलं. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिलीप कुमार यांनी कोर्टात सांगितलं होतं, की त्यांचं मधुबालावर प्रेम आहे आणि जन्मभर ते तिच्यावर प्रेम करतील. मात्र प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांनी साक्ष मात्र बी. आर. चोप्रांच्या बाजूनं दिली होती.

दिलीप कुमार यांनी आपल्या आत्मचरित्रातही त्याचा उल्लेख केला आहे. "आपण हे प्रकरण सामंजस्यानं मिटविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र कोणताही फायदा झाला नाही. शिवाय बी. आर. चोप्रांची बाजूही न्याय्य होती," असं दिलीप कुमार यांनी म्हटलं.

या प्रकरणानंतर मधुबाला यांना कळून चुकलं की दिलीप कुमार त्यांच्यापासून खूप दूर गेले आहेत.

किशोर कुमारसोबत लग्न

दिलीप कुमारपासून वेगळं होतानाच मधुबालानं मनोमन लग्न करण्याचा निर्णय घेऊन टाकला होता. मात्र मधुबाला किशोर कुमारशी लग्न करेल, याचा अंदाज कोणालाच नव्हता.

ज्यावेळी मधुबाला दिलीप कुमारपासून दुरावत होती, त्याचवेळी किशोर कुमारने आपली पहिली पत्नी रोमा देवी यांना घटस्फोट दिला होता. किशोर कुमार आणि मधुबाला त्यावेळी काही चित्रपटांमध्ये सोबत कामही करत होते. याच दरम्यान ते एकमेकांकडे आकर्षित झाले आणि 1960 साली मधुबाला-किशोर कुमार यांचा विवाह झाला.

अर्थात, किशोर कुमार यांच्याशी लग्नाचा निर्णय मधुबालासाठी हा दिलीप कुमार यांच्यापासून वेगळं होण्यापेक्षाही जास्त वेदनादायी ठरला.

Image copyright MADHUR BHUSHAN

किशोर कुमारला मधुबालाच्या आजाराबद्दल माहिती होतं, मात्र त्याचं गांभीर्य फारसं लक्षात आलं नाही. ते मधुबाला यांना उपचारासाठी लंडनला घेऊन गेले. तिथं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, की मधुबाला फारतर एक-दोन वर्षेच जगू शकतील.

लंडनवरून परतल्यानंतर किशोर कुमार मधुबालाला वडिलांकडे सोडून आले. आपण खूप व्यस्त असल्यानं मधुबालाची काळजी घेऊ शकणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ते मधुबालाला भेटायला यायचे, मात्र तीन ते चार महिन्यांच्या अंतरानं. मधुबाला यांना जेव्हा किशोर कुमार यांच्या सहवासाची सर्वांत जास्त गरज होती, तेव्हाच ते त्यांच्यासोबत नव्हते.

अखेरचे वेदनादायी दिवस

मधुबालाच्या हृदयाचं दुखणं बळावत होतं. मात्र तिची जगण्याची इच्छा कायम होती. कदाचित त्यामुळंच डॉक्टरांनी हार मानल्यानंतरही ती नऊ वर्षे जगली. मात्र तिच्या आयुष्यातली ही शेवटची नऊ वर्षे अतिशय एकाकी होती. या काळात मोजकेच लोक तिची विचारपूस करायला यायचे. यामध्ये दिलीप कुमार यांचे कुटुंबीयही होते.

मुघले आजम प्रदर्शित झाल्यानंतरच मधुबालाचं दुखणं बळावलं होतं. मात्र त्यांनी ज्या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं होतं, ते प्रदर्शित होत होते. मधुबाला अखेरच्या दिवसांत कशी दिसत होती, हे मात्र फारसं समोर आलं नाही.

बॉलिवूड टॉप 20-सुपरस्टार्स ऑफ इंडिया या पुस्तकात मधुबालाच्या अखेरच्या दिवसाबद्दल माहिती मिळते. दिलीप कुमार यांची बहीण सईदा खान यांनी मधुबालाची अखेरच्या दिवसातील आठवण सांगितली आहे. सईदा मधुबालाला त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधीच भेटल्या होत्या. त्यावेळीही मधुबालाचं सौंदर्य उणावलं नव्हतं, असं सईदा यांनी म्हटलं.

मात्र आजारपणामुळं त्या मानसिकदृष्ट्या खचायला लागल्या होत्या. आपल्या अखेरच्या दिवसांत मधुबाला खूप मेकअप करायला लागल्या. 'सुपरस्टार्स ऑफ इंडिया'मध्ये दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी म्हटलं आहे, की मधुबाला यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी मी त्यांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी खूप मेकअप केला होता. खरंतर मधुबाला आपल्या पूर्ण करिअरमध्ये अतिशय कमी मेकअप वापरण्यासाठी प्रसिद्ध होती.

आपल्या सौंदर्यानं अनेकांना घायाळ करणाऱ्या मधुबालाला चित्रपटप्रेमी आजही विसरले नाहीत. भारतीय टपाल खात्यानं 18 मार्च 2008 ला मधुबालाच्या स्मृतीप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. यावेळी बोलताना प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांनी म्हटलं, की मधुबाला देशाचा चेहरा होती. शतकातून एखादी मधुबाला जन्माला येते. मी जेव्हा त्यांना पहायचो, तेव्हा एखादी सुंदर गझल मनात यायची.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)