जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची जेव्हा वाजपेयी सरकारनं सुटका केली होती...

मसूद अझहर Image copyright AFP
प्रतिमा मथळा मसूद अझहर

पुलवामात CRPFच्या तुकडीवर आत्मघातकी हल्ला केल्यानंतर पाकिस्तानातील कट्टरवादी संघटना जैश ए मोहम्मद पुन्हा एकदा चर्चेत आणि हेडलाईन्सध्ये आहे.

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्याच्या अवंतिपुराच्या लेकपुरा भागातून जाणाऱ्या CRPFच्या तुकडीवर आत्मघातकी हल्ला झाला. ज्यात 34 जवान मृत्युमुखी पडलेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनं घेतली आहे.

जैश ए मोहम्मदचा प्रवक्ता मोहम्मद हसननं एक पत्रक जारी केलंय, ज्यात त्यानं म्हटलंय की आदिल अहमद उर्फ वकास कमांडोने हा हल्ला केला आहे. वकास कमांडो पुलवामा जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचं कळतंय.

पण जैश ए मोहम्मदनं भारतात अतिरेकी कारवाया करण्याची ही पहिली वेळ नाहीए.

या सगळ्या घटनाक्रमाची सुरुवात झाली जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना अझहर मसूदच्या अटकेनंतर. त्याच्या सुटकेसाठी 24 डिसेंबर 1999ला अतिरेक्यांनी 180 भारतीय प्रवास करत असलेल्या विमानाचं अपहरण केलं होतं.

त्याआधी 1994ला भारतीय सुरक्षा दलांनी मौलाना मसूद अझहरला श्रीनगरमधून अटक केली होती.

जैशचा पाया कसा रचला गेला?

विमानाचं अपहरण केल्यानंतर अतिरेक्यांनी ते कंदाहारला नेलं. त्यानंतर मौलाना मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईदसारख्या कट्टरवाद्यांच्या सुटकेची मागणी केली.

सहा दिवसानंतर 31 डिसेंबरला अपहरणकर्त्यांच्या अटी-शर्थी मान्य करत भारत सरकारनं कट्टरवादी नेत्यांची सुटका केली. या बदल्यात कंदाहार एअरपोर्टवरुन भारतीय प्रवाशांची सुटका करण्यात आली.

यानंतर मौलाना मसूद अझहरनं फेब्रुवारी 2000मध्ये जैश ए मोहम्मद संस्थेची स्थापना केली. आणि भारतात हल्ले घडवून आणले.

त्यावेळी हरकत उल मुजाहिद्दीन आणि हरकत उल अंसारमध्ये काम करणारे अनेक कट्टरवादी जैश ए मोहम्मदमध्ये दाखल झाले. स्वत: मौलाना मसूद अझहरनं हरकत-उल-अंसार या कट्टरवादी संघटनेचा सरचिटणीस म्हणून काम केलं आहे.

पठाणकोट, उरी ते पुलवामापर्यंतचे हल्ले

स्थापनेच्या दोन महिन्याच्या आतच जैश ए मोहम्मदनं श्रीनगरच्या बदामी बाग परिसरात असलेल्या भारतीय लष्कराच्या मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

यानंतर 28 जून 2000ला जम्मू काश्मीर सचिवालयावर झालेल्या हल्ल्याचीही जबाबदारी घेतली.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा पुलवामा इथं हल्ला झालेलं ठिकाण

यानंतर 24 सप्टेंबर 2001ला एका युवकानं स्फोटकांनी भरलेली कार श्रीनगर विधानसभा भवनावर धडकवली.

त्याचवेळी काही कट्टरवाद्यांनी विधानसभेच्या जुन्या इमारतीच्या पाठीमागील भागाला आग लावली. या घटनेत 83 लोक मारले गेले.

हमल्यानंतर लगेचच जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा इन्कारही केला.

13 डिसेंबर 2001 ला भारतीय संसदेवर आणि जानेवारी 2016ला पंजाबमधील पठाणकोटच्या वायु सेनेच्या तळावर झालेल्या हल्ल्यालाही जैश ए मोहम्मद जबाबदार असल्याचं सांगितलं जातं.

पठाणकोटच्या आधीही भारतात झालेल्या हल्ल्यांना जैश ए मोहम्मदला जबाबदार ठरवण्यात आलं आहे. यातला सर्वात मोठा हल्ला 2008मध्ये मुंबईत झाला होता.

2001मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचे दोषी अफजल गुरुसुद्धा जैश ए मोहम्मदशी संबंधित होते. त्यांना 10 फेब्रुवारी 2013मध्ये मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.

डिसेंबर 2016मध्ये काश्मीरच्या उरीमध्ये असलेल्या लष्कराच्या तळावर जो हल्ला झाला त्यालाही जैश ए मोहम्मद जबाबदार असल्याचं सांगितलं जातं. उरीच्या हल्ल्यात 18 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता.

यानंतर काहीच दिवसात भारतानं सीमारेषेवर 'सर्जिकल स्ट्राईक' केल्याचा दावा केला होता.

'कट्टरवादी' संघटनांच्या यादीत समावेश

जैश-ए-मोहम्मदला भारत, ब्रिटन, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रानं 'कट्टरवादी' संघटनेच्या यादीत टाकलंय.

अमेरिकेच्या दबावानंतर पाकिस्ताननं 2002 मध्ये जैश ए मोहम्मदवर बंदी घातली होती.

Image copyright PTI

मात्र काही रिपोर्ट्सच्या अनुसार अजूनही जैश ए मोहम्मद प्रमुख मसूद अझहर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर परिसरात राहतात.

पठाणकोटवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर आणि मुलतानमधील कार्यालयांवर छापेमारी केली होती. मीडिया रिपोर्टसनुसार अझहर आणि त्यांच्या भावालाही अटक केली होती.

दुसरीकडे भारतानं याआधी अनेकदा अझहर मसूदच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. मात्र पुरावे नसल्याचं कारण देत पाकिस्ताननं ही मागणी धुडकावून लावली आहे.

पठाणकोट हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदनं अल-कलाम वर एक ऑडिओ क्लिप जारी केली होती. ज्यात 'जिहादींना' काबूत ठेवण्यात भारतीय यंत्रणांना आलेल्या अपयशाची खिल्ली उडवली होती.

आत्मघाती हल्ला हीच पद्धत

मीडिया रिपोर्ट्सनुसार जैश ए मोहम्मद भारतात कथिक गोरक्षेवरुन मुस्लिम युवकांवर झालेले हल्ले आणि काश्मीर मुद्द्यावरून मुस्लिमांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहे.

गेल्या काही वर्षात काश्मीरमध्ये अनेक हल्ले झाले, पण पुलवामातील हल्ला सर्वात मोठा हल्ला मानला जातोय.

जैश-ए-मोहम्मदसाठी आत्मघातकी हल्ला ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. पुलवामात याच पद्धतीनं आत्मघातकी हल्ल्याचा वापर करण्यात आला.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)