पूनम महाजन, अजित पवार आणि प्रमोद महाजनांच्या हत्येचा वाद

अजित पवार-पूनम महाजन Image copyright Getty Images

तुमच्या वडिलांना तुमच्या चुलत्यानं का मारलं, असा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला तर तुमच्याकडे काय उत्तर आहे, असा थेट प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना शकुनी मामा असं म्हटलं होतं. अजित पवार यांनी पूनम महाजनांच्या या विधानाचा समाचार घेतला. बारामतीमधील कुरणेवाडीतल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आपलं वय काय, राजकीय कारकीर्द काय, स्वर्गीय प्रमोद महाजन आणि शरद पवार यांचे संबंध काय होते याचा विचार करायला हवा होता. आमचं दैवत असलेल्या पवारसाहेबांना शकुनी मामाची उपमा देणाऱ्या पूनम महाजन तुमची औकात काय? असं म्हणत अजित पवारांनी पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला.

"आपण कोणाबद्दृल आणि काय बोलतोय याचं भान ठेवायला हवं. तुमच्या वडिलांना तुमच्या चुलत्यानं का मारलं असं आम्ही विचारलं तर? सख्ख्या भावानं सख्ख्या भावाला मारलं. महाजन कुटुंबात हे एवढं महाभारत का घडलं याचं काय उत्तर आहे. तुम्हाला बोलता येतं, तसं आम्हाला पण बोलता येतं. पण पातळी सोडायला नको, हा विचार करून आम्ही बोलत नाही. मात्र तुम्ही काहीही बोलाल तर सहन करणार नाही," असं अजित पवार यांनी म्हटलं.

ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. त्यामुळे जास्त शहाणपणा करू नये. संयम पाळावा, असा 'सल्ला' पवारांनी पूनम महाजनांना दिला.

काय होतं पूनम महाजनांचं वक्तव्य?

Image copyright Getty Images

काही दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाच्या सीएम चषक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन मुंबईतील सोमैय्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी बोलताना पूनम महाजनांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

त्यांनी शरद पवारांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामाशी केली होती. स्वतःला मिळालं नाही की इकडंच तिकडे आणि तिकडंच इकडं करणाऱ्या मंथरा आणि शकुनी मामांसारखे आहेत, असं पूनम महाजनांनी म्हटलं होतं.

विरोधकांचं 'महागठबंधन' हे 'महाठगबंधन' आहे, अशी कोटी करून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरू करणारे शरद पवार या महाआघाडीत असल्याचंही पूनम महाजनांनी म्हटलं होतं.

पूनम महाजनांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही प्रत्युत्तर देताना प्रमोद महाजनांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला होता.

प्रमोद महाजनांच्या हत्येचा वाद

Image copyright AFP
प्रतिमा मथळा प्रमोद महाजन

26 एप्रिल 2006 ला प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी पूर्णा इमारतीतल्या राहत्या घरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी स्वतः वरळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. दरम्यान भाजपचे नेते आणि प्रमोद महाजनांचे मेव्हणे गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना तातडीनं हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान 3 मे रोजी प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला.

प्रवीण यांनी प्रमोद महाजनांना एक कोटी रुपयांसाठी धमकावल्याची साक्ष प्रमोद महाजनांच्या पत्नी रेखा महाजन यांनी न्यायालयात दिली. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडेनींही प्रवीण यांनी धमकी देणारा एसएमएस पाठवल्याची साक्ष दिली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रवीण महाजन

खटल्यादरम्यान प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांच्या चारित्र्याबद्दल वादग्रस्त विधानं केल्यानं हा खटला इन-कॅमेरा चालवण्यात आला होता.

सर्व साक्षी-पुराव्यानंतर प्रवीण महाजन यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

3 मार्च 2010 ला प्रवीण महाजन यांचा ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात मृत्यू झाला. डिसेंबर 2009 मध्ये प्रवीण यांना ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मृत्यूपूर्वी नाशिकच्या तुरूंगात असताना प्रवीण महाजन यांनी 'माझा अल्बम' नावाचं पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकातही प्रवीण यांनी प्रमोद महाजनांबद्दल वादग्रस्त विधानं केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)