शिवसेना-भाजप युती जाहीर: लोकसभेला शिवसेना 23, भाजप 25, विधानसभेत 50:50

युतीच्या घोषणेनंतर गळाभेट घेताना उद्धव ठाकरे आणि अमित शाह, शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Image copyright Twitter / Devendra Fadnavis
प्रतिमा मथळा युतीच्या घोषणेनंतर गळाभेट घेताना उद्धव ठाकरे आणि अमित शाह, शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अखेर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढवणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत.

पाहा युतीची घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे आता राज्यव्यापी दौरा करणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. पण एकाही प्रश्नाचं उत्तर न देता ही पत्रकार परिषद संपली.युतीच्या घोषणेवर संपादक आशिष दीक्षित यांचं विश्लेषण


रात्री 8.20 - आम्ही 45 जागा जिंकू - शाह

प्रतिमा मथळा युतीची घोषणा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं की आम्ही राज्यात 45 जागा जिंकू.

रात्री 8.10 - आता साफ मनाने नवी सुरुवात - उद्धव

उद्धव ठाकरे:

  • आता गुप्त बैठका घेण्याची गरज नाही. आता मी आणि मुख्यमंत्री उजळ माथ्याने राज्यभर फिरू.
  • आता सत्तेत आणि जबाबदाऱ्यांमध्ये समसमान वाटप होईल.
  • कटू आठवणी विसरणार नाही कारण त्याची पुनरावृत्ती टाळायला हवी.
  • आता नवी सुरुवात होईल आमच्या नात्याला.

रात्री 8.05 - जागावाटप जाहीर

अखेर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली - लोकसभेत शिवसेना - 23 तर भाजप - 25 जागा लढवणार. तर विधानसभेत अर्ध्याअर्ध्या जागा दोन्ही पक्ष लढवणार.

संध्याकाळी 7.45 - पत्रकार परिषदेला सुरुवात

अमित शाह, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात.

देवेंद्र फडणवीस:

  • आमच्यात मतभेद झाले तरी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेहमी एकत्र आहोत. 
  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकरिता एकत्र येण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

संध्याकाळी 7.30 - चर्चा संपली

45 मिनिटांनंतर अमित शाह आणि उद्धव ठाकरेंची चर्चा संपली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते. सर्व नेते वरळीतल्या ब्लू सी या हॉटेलच्या दिशेने निघाले आहेत. तिथे युतीची घोषणा होणार आहे.


संध्याकाळी 6.30 वाजता - मातोश्रीवर ताफा

भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचले आहेत. तिथे शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित आहेत.


संध्याकाळी 6 वाजता:

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोप केला आहे की भाजपने उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करून युती करण्यासाठी भाग पाडलं आहे. ईडी (अंमलबजावणी संचालनालय) चौकशीची भीती घातल्यामुळे शिवसेना तयार झाली, असं विखे पाटील म्हणाले. एरव्ही एवढी टीका करणारी भाजप एकाएकी युतीसाठी कशी तयार झाली, हे गूढ आहे, असंही ते म्हणाले.

संध्याकाळी 5 वाजता

भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल. सोफीटेल हॉटेलमध्ये दाखल.

दरम्यान, पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शिवाजी महाराज, बाळ ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा ठेवण्यात आलेल्या आहेत.

वरळीच्या हॉटेल ब्लू सीमध्ये ही घोषणा होत आहे.

प्रतिमा मथळा पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शिवाजी महाराज, बाळ ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा

दुपारी 4 वाजता - 'शिवसेना चोरावर मोर'

युतीची घोषणा होणार, असे संकेत मिळताच विरोधकांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की "उद्धव ठाकरे म्हणतात चौकीदार चोर है. तर युती करणारी शिवसेना चोरावर मोर आहे. भाजप सैनिकांच्या टाळूवरचं लोणी खाते असं शिवसेना म्हणते, मग 14 तारखेला मुख्यमंत्र्यांशी जागावाटपाची चर्चा करताना शिवसेना कुणाच्या टाळूवरचं लोणी खात होती?" असा सवाल मलिक यांनी केला.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की "भ्रष्टाचारी आणि लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती तथाकथित अफजल खान आणि उंदीर जाहीर करतील. पहारेकरी चोर आहे ही बोंब केवळ चोरीतील वाट्याकरिता होती."

दुपारी 2 वाजता -

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की "युतीची सर्व बोलणी झाली आहेत. आता फक्त घोषणा होणार. पण मुख्यमंत्री सेनेचाच असेल," असं म्हणाले आहेत. त्यामुळे लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं जागावाटप एकत्रच घोषित होण्याची शक्यता आहे.

भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 6.30 वाजता मुंबईत युतीची घोषणा होणार आहे.

वाचा बीबीसीची विश्लेषणं -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)