शिवसेना-भाजप युती: जेव्हा अफझल, कुंभकर्ण, चोर आणि थापाडे अचानक मित्र होतात

पाहा युतीची घोषणा

शिवसेना भाजपचे नेते आता पुन्हा गळ्यात गळे घालून युतीची घोषणा करत असले तरी गेल्या साडेचार वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी आणि 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राने भाजपवर जोरदार टीका केली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री फडवणीस आणि अनेक भाजप नेत्यांवर टीका करताना केलेली ही 9 महत्त्वाची विधानं. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी याच अफझल खानाला, कुंभकर्णाला, चोराला आणि थापाड्याला उद्धव मित्र म्हणून जवळ घेणार आहेत.

1. 'मोदी अफझल खान'

2014 सालच्या लोकसभा निवडणुका भाजप-सेना सोबत लढले. पण भाजपच्या दणदणीत विजयानंतर भाजपने विधानसभेत जागा वाढवून मागितल्या. त्या द्यायला शिवसेनेने नकार दिला आणि ऐन विधानसभा निवडणुकीआधी युती तुटली.

त्यानंतर प्रचार करताना शिवसेना आणि भाजपने एकमेकांवर जोरदार टीकास्त्रं सोडली. तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं, "मोदींचं अख्खं कॅबिनेट महाराष्ट्रात मतं मागत फिरत आहे. ते अफझल खानाच्या सेनेप्रमाणे महाराष्ट्र जिंकू पाहात आहेत. पण त्यांचे मनसूबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही."


2. 'अफझल खानाला उताणा पाडू'

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे आणि अमित शाह

त्यानंतर साडे 4 वर्षांनी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात अफझल खानाचा उल्लेख पुन्हा करण्यात आला.

23 जानेवारी 2019 रोजी 'सामना'त छापून आलेल्या अग्रलेखात भाजपवर अशा शब्दांमध्ये टीका करण्यात आली होती: 'शिवसेना संपविण्याचा विडा उचलून महाराष्ट्रात अनेक अफझलखान आले व उताणे पडले. शिवसेनेला राजकीय मैदानात 'पटकण्या'ची पोकळ डरकाळी फोडणारेही काळाच्या ओघात नष्ट झाले.'


युतीच्या घोषणेवर संपादक आशिष दीक्षित यांचं विश्लेषण


3. 'भाजप कुंभकर्ण'

उद्धव ठाकरे यांनी गेल्यावेळेसच्या दसरा मेळाव्यात अयोध्येला जायची घोषणा केली. त्यांनी अयोध्या दौरा केला. या दौऱ्याचे एकच घोषवाक्य होते, 'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार.' मी कुंभकर्णाला जागा करायला आलोय, असं उद्धव ठाकरे या दौऱ्याविषयी म्हणायचे.

त्याचवेळी आमचा राम अजूनही वनवासातच आहे. निवडणुका आल्या की राम आठवतो, मग अयोध्येत राम मंदिर का बांधत नाहीत, असा प्रश्न 'सामना'च्या संपादकीय मधून विचारण्यात आला होता.

Image copyright BBC/Niranjan Chhanwal
प्रतिमा मथळा अयोध्येत उद्धव

4. 'पहारेकरीच चोर'

राम मंदिराच्या मुद्द्यावरूनच पंढरपुरातही शिवसेनेनी सभा घेतली. 'युती गेली खड्ड्यात' असं म्हणत 'हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागलेत' अशी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरे यांनी या सभेत केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की योग्यवेळी शिवसेनेला उत्तर देऊ.


5. 'मोदी लाटेची वाट लावू'

लातूर इथं भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मित्रपक्ष सोबत आले तर ठीक; अन्यथा त्यांनाही पटकू अशी भाषा वापरल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते.

उद्धव ठाकरे यांनी या विधानाला प्रत्युत्तर दिलं. "शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही. आम्हाला कोणी लेचेपेचे समजू नका. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या. आम्ही लाटेची वाट लावतो," असं वरळीत एका अधिवेशनात ते म्हणाले.


6. 'मुख्यमंत्री शुद्धीवर आहेत का?'

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कथित ऑडियो क्लिप चर्चेत आली होती. शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडियो क्लिप जाहीर केली.

याच पोटनिवडणुकीत भाजपने पैसे वाटल्याचा आरोपही शिवसेनेने केला. "एके काळी बूथ ताब्यात घ्यायचे, आता EVMमध्ये घोळ होतो," असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. 'मुख्यमंत्री शुद्धीवर आहेत का' अशी टीका सामानातून झाली.


7. 'मुका घेतली तरी...'

उद्धव ठाकरेंपेक्षाही जहाल भाषेत शिवसेना खासदार आणि 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी वेळोवेळी भाजपवर टीका केली. ते विरोधी पक्षांच्या गटातही काही वेळा सहभागी झाले. तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंच्या दिल्लीतल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवून त्यांनी भाजपला घाम फोडला होता.

'भाजपनं मुका घेतला तरी युती शक्य नाही' असं संजय राऊत यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये डोंबिवलीत एका कार्यक्रमात म्हटलं होतं.


8. 'मुख्यमंत्री थापाडे'

जानेवारी महिन्यात मराठवाडा दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी युतीची चर्चा गेली खड्ड्यात असं विधान केलं होतं. "आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. कोरडी भाषणं आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाही," असा टोलाही लगावला होता.

राज्यात दुष्काळ पडला असला तरी थापांचा आणि फसव्या योजनांचा पाऊस पडत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी अहमदनगरच्या सभेत कली होती.

राजगुरूनगर इथं ऑक्टोबर महिन्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे, हे दिसत नाही. या दुष्काळात गाजराची शेती मात्र बहरली आहे,'' अशी टीका केली होती.


9. रफाल आणि 'विमान कोसळले'

रफालच्या कथित गैरव्यवहाराबाबतही शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीका केली. "शस्त्रखरेदीत सरकार घोटाळा करतं, सरकार पाप करतं" अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर महिन्यात टीका केली होती.

चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्यानंतर 'चार राज्यांत भाजपामुक्त, जास्त उडणारे कोसळले' अशा मथळ्याखाली शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केलं होतं.

'काँग्रेसमुक्त भारताचे जे स्वप्न भाजपने पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे. किंबहुना या राज्यांत जनतेनेच भाजपमुक्तचा संदेश आता दिला आहे. जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले,' असं या अग्रलेखात म्हटलं होतं. तर निकालावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी 'नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले' असं म्हटलं.


हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)