पुलवामा : #PakistanAndCongress हॅशटॅगचं सत्य - फॅक्ट चेक
- फॅक्ट चेक टीम
- बीबीसी न्यूज

फोटो स्रोत, Getty Images
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण संवेदनशील झालेलं असताना सोमवारी सकाळी #PakistanAndCongress हा ट्रेंड ट्वीटरवर दिसू लागला.
#PakistanAndCongress या हॅशटॅगसह ज्या नेटिझन्सनी ट्वीट केलं आहे त्यामध्ये उजव्या विचारसरणीची मंडळींचा समावेश आहे. काँग्रेसचा पाकिस्तानप्रति दृष्टिकोन नरमाईचा आहे, असा आरोप या नेटिझन्सचा आहे.
या नेटिझन्सनी केवळ ट्वीटरवर नव्हे तर फेसबुक आणि इतर मेसेजिंग अॅपवर प्रक्षोभक मजकूर शेअर केला आहे.
बहुतांश लोकांनी हा हॅशटॅग वापरताना जुने फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत. बीबीसीने या मजकुराची पडताळणी केली असता यापैकी बहुतांश गोष्टी बिनबुडाच्या असल्याचं स्पष्ट झालं.
प्रियंका गांधी यांची मुलाखत?
उजव्या विचारांचे समर्थक फेसबुक ग्रुप्समध्ये ट्रेडिंग हॅशटॅगसह लिहितात की, 'काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी 7 फेब्रुवारीला दुबईत पाकिस्तान लष्कराचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांना भेटल्या होत्या.' ट्वीटर आणि फेसबुकवर अशा आशयाचे हजारो संदेश फिरत आहेत.
फोटो स्रोत, SM Viral Posts
मात्र या घटनेत तथ्य किती याची आम्ही शहानिशा केली. 7 फेब्रुवारीला प्रियंका गांधी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आल्यानंतर पहिल्यादांच पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला उपस्थित होत्या. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे सर्व महासचिव आणि राज्यांचे प्रभारीही उपस्थित होते.
राहुल गांधी यांचं ट्वीट?
सोशल मीडियावरून 24 ऑक्टोबर 2018ला राहुल गांधी यांनी केलंल ट्वीट शेअर केलं जात आहे. या ट्वीटमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना म्हटलं होतं की, "तपास थांबावा यासाठीच पंतप्रधानांनी सीबीआयच्या संचालकांना हटवलं आहे."
मात्र 'पाकिस्तान डिफेन्स'ने राहुल यांचं ट्वीट रीट्वीट केलं असं काही जणांचं म्हणणं आहे. मोदी यांना पदावरून हटवण्यासाठी पाकिस्तान काँग्रेस पक्षाला मदत करत आहे, असा आरोप काही जणांनी केला.
फोटो स्रोत, SM Viral Post
हा आरोप सपशेल चुकीचा आहे. कारण पाकिस्तानचं संरक्षण मंत्रालय तसंच पाकिस्तानच्या लष्कराचं 'पाकिस्तान डिफेन्स' नावाचं कोणतंही अधिकृत ट्वीटर हँडल नाही.
पाकिस्तानतर्फे संरक्षण तसंच लष्करासंदर्भात माहिती 'इंटरसर्व्हिस पब्लिक रिलेशन' या अधिकृत हँडलवरून जाहीर केली जाते.
कपिल सिब्बल यांचं वक्तव्य?
उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं एक कथित वक्तव्य शेअर केलं आहे. सिब्बल यांनी पुलवामा हल्ल्यासाठी 'टोकाचा राष्ट्रवाद' कारणीभूत असल्याचं म्हटलं असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात कपिल सिब्बल यांच्याना आम्ही संपर्क साधला. "14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यासंदर्भात सोशल मीडियावरच नाही तर कोणत्याही प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही," असं सिब्बल यांनी सांगितलं.
काश्मीरमधील ट्रक ड्रायव्हर
जम्मू काश्मीरमधील लोकांसंदर्भात सोशल मीडियावरून गरळ ओकली जात असल्याचं चित्र आहे. काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांविरोधात भावना फडकणारे संदेश पाठवले जात आहेत.
यातील व्हीडिओचा तपशील आम्ही पडताळून बघितला. पुलवामा हल्ल्याने संतापलेल्या लोकांनी काश्मीरातील ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली आणि ही घटना उधमपूरची असल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी 2018मध्ये सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हीडिओचा पुलवामा हल्ल्याशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी तसं स्पष्ट केलं आहे.
16 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर पोलीस यांनी अधिकृत ट्वीटमध्ये, "काश्मीरातील ड्रायव्हरला मारहाण केली जात असल्याचा व्हीडिओ उधमपूरचा असल्याचं भासवत अफवा पसरवल्या जात आहेत. हे खरं नाही. अशा अफवांवर लक्ष देऊ नका," असं म्हटलं आहे.
काश्मीरातील कामगारांना मारहाण
काश्मीरमधील स्थानिक मीडिया ग्रुप्समध्ये इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हीडिओ वारंवार शेअर केला जात आहे. एका लग्नादरम्यान काश्मीरमधील कामगारांना मारहाण झाल्याचा या व्हीडिओत सांगितलं जात आहे. हा व्हीडिओ चंदीगढचा असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं आहे. मात्र प्रत्यक्षात हा व्हीडिओ दिल्लीतील जनकपुरी इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमधील आहे. हॉटेलमध्ये जेवण मिळण्यावरून हॉटेल स्टाफ आणि पाहुणे यांच्यात झालेल्या मारहाणीचा हा व्हीडिओ आहे.
काश्मीरमधील लोकांबरोबर गैरव्यवहार झाल्याच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. मात्र सोशल मीडियावर शेअर होत असलेला लग्नाच्या व्हीडिओचा पुलवामा हल्ल्याशी तसंच काश्मीरातील नागरिकांशी संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाजप नेत्यांचं वक्तव्य
सोशल मीडियावर #PakistanAndCongress या हॅशटॅगला प्रत्युत्तर देताना भाजप खासदार नेपाल सिंह यांचं एक जुनं वक्तव्य जोडून शेअर केलं जात आहे.
काँग्रेस समर्थक फेसबुक ग्रुप्स तसंच मुंबई काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून नेपाल सिंह यांच्या वक्तव्यावर आधारित वर्षभरापूर्वीच्या बातमीला पुलवामा हल्ल्याचा संदर्भ जोडत ट्वीट केलं होतं.
2017मध्ये CRPFच्या सराव शिबिरावर झालेल्या हल्ल्यात चार सैनिकांनी जीव गमावला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते नेपाल सिंह म्हणाले होते, "लष्कर दररोज माणसं गमावतात. प्रत्येक देशात वादविवाद तंटे सुरू असतात, त्यात सैनिक जीव गमावतात."
त्यावेळी नेपाल सिंह यांच्या वक्तव्यावरून गदारोळ झाला होता. नंतर त्यांनी या वक्तव्याप्रकरणी माफीही मागितली होती.
पण त्यांच्या त्यावेळच्या वक्तव्याचा पुलवामा हल्ल्याशी काहीही संबंध नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)