शिवसेना-भाजप युती : यू-टर्नमुळे शिवसेनेनं विश्वासार्हता गमावली?

शिवसेना, भाजप, युती
प्रतिमा मथळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवसेनेसाठी हा निर्णय त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिकेपासून घेतलेला यू-टर्न आहे आणि त्याचा फटका त्यांना बसेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढवणार असल्याचं अमित शाह, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सोमवारी जाहीर केलं.

गेले अनेक महिने उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका करत होते. मात्र भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने उद्धव यांनी युतीची घोषणा केली.

'देवेंद्र झुकले, उद्धव हरले'

''युतीच्या घोषणेचं एका वाक्यात वर्णन करायचं तर देवेंद्र झुकले आणि उद्धव हरले असंच करावं लागेल'', असं पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राही भिडे यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, ''भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्हीच निवडून येणार असा अभिनय भाजपचे नेते करत असले तरी त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आहे. 1995 मध्ये वाजपेयी असतानाही सत्ता टिकवता आली नसती. भक्तगट सोडला तर अन्य आघाड्यांवर मोदींवर चहुबाजूंनी टीका होते आहे. खोटं बोला पण रेटून बोला असं त्यांचं तत्व आहे. पुलवामा हल्ल्यानंतरही मोदी आणि भाजपचं लक्ष्य निवडणुकाच आहेत''.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा युतीचा निर्णय अपरिहार्यता?

''राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्यामुळे बाकी सेक्युलर पक्ष शिवसेनेला जवळ करू शकत नाहीत. भाजप आणि शिवसेनेची मध्यमवर्गावर भिस्त आहे. हा वर्ग दोन्ही पक्षांचा पाठीराखा आहे. भाजपने दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. त्याचा फायदा शिवसेनेला घ्यायचा आहे. हिंदुत्व आणि राम मंदिर या मुद्यांवर किती मतं मिळणार? असा सवाल राही यांनी केला. शिवसेनेबरोबर जाण्यासाठी भाजपने साम-दाम-दंड-भेद असे सगळे प्रयत्न करून पाहिले. आम्ही लाचार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या बरोबराने मुख्यमंत्री फडणवीस मातोश्रीच्या दारी हजर झाले'', हा विरोधाभास राही यांनी मांडला.

युतीचा निर्णय का घ्यावा लागला यावर राही सांगतात, ''उद्धव ठाकरे यांनी चौकादार चोर है असं म्हटलं होतं. आता उद्धव चोरांच्या कळपात सामील होणार का? असा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेने थोडी अस्मिता दाखवली असती तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना फायदा झाला असता. शिवसेनेला सत्तेची मलई कमी मिळते. तो शेअर वाढावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. अमित शहा यांना सुरुवातीपासूनच युती नको होती. मात्र मोदींचा आलेख घसरला आहे याची जाणीव शहांना आहे.

'शिवसेनेचा अहंकार भाजपने कुरवाळला पण...'

''युतीची घोषणा अशीच होईल अशी अपेक्षा होती. ती खरी ठरली. युतीच्या निमित्ताने भाजपने शिवसेनेचा अहंकार कुरवाळला असं याचं वर्णन करता येईल'', असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणाले.

ते पुढे म्हणतात, ''मुंबईपाठोपाठ कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नारायण राणेंमुळे शिवसेना कोकणात डळमळीत झाली होती. नाणार प्रकल्प कोकणातून अन्यत्र स्थलांतरित करण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. युतीमध्ये शिवसेनेसाठी ही एकमेव जमेची बाजू आहे''.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शिवसेना आणि भाजपतर्फे एकमेकांवर जोरदार आरोप करण्यात आले होते.

''गेले काही महिने उद्धव ठाकरे भाजपवर जोरदार टीका करत आहेत. केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांवरही त्यांनी झोड उठवली आहे. आता ते जनतेपुढे कोणत्या तोंडाने मतं मागणार हा प्रश्न आहे. पाच वर्षात राम मंदिरही झालेलं नाही. त्यामुळे शिवसेनेसाठी हा यू-टर्न अडचणीचा ठरू शकतो. भाजपने या समीकरणात कुठेही नमतं घेतलेलं नाही. त्यांनी जागांवर पाणी सोडलेलं नाही. युती झाली नसती तर मतांचं विभाजन झालं असतं. ते भाजपने टाळलं आहे. पाच वर्षांपूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे नुकसान होणार हे नक्की पण युतीमुळे नुकसानीचं प्रमाण भाजपने कमी केलं आहे. युती झाली नसती तर शिवसेनेच्या जागी कमी होणार आणि याचा फायदा काँग्रेसला होणार याची जाणीव भाजपला आहे. एकप्रकारे युतीचा निर्णय भाजपसाठी डिझॅस्टर मॅनेजमेंट आहे'', असं चोरमारे यांनी सांगितलं.

भाजपच्या खेळीचा अर्थ उलगडून सांगताना चोरमारे सांगतात, ''उद्धव ठाकरेंना सन्मान हवा होता. बाळासाहेब ठाकरेंच्यावेळी भाजप नेते त्यांना भेटायला मातोश्रीवर येत. मात्र या भेटीत राजकीय समीकरणांपेक्षा वैयक्तिक संबंधांचा मुद्दा उद्धव लक्षात घेत नाहीत. बाळासाहेबांचं वलय होतं. भाजप अध्यक्ष अमित शहा तसंच मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर यावं लागलं. हा सन्मान उद्धव यांना हवा होता. भाजपने उद्धव यांचा इगो कुरवाळण्याची खेळी केली आहे''.

'शिवसेनेनं विश्वासार्हता गमावली'

''दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून शिवसेना भाजपवर जोरदार टीका करत आहे. राहुल गांधींना पाठिंबा देऊ अशी भाषा केली जात आहे. आम्ही निवडणूक पूर्व युती करणार नाही असा रीतसर ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांनी चौकीदार चोर है अशी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली होती. सातत्याने भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने युतीचा निर्णय घेतल्याने पक्ष म्हणून शिवसेनेच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे'', असं ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांनी सांगितलं.

युती का झाली यामागची कारणं रोहित यांनी उलगडली. ''उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाजवादी पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. विरोधातले दोन पक्ष एकत्रित येत आहेत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतून सर्वाधिक खासदार लोकसभेवर निवडून दिले जातात. सत्ता मिळवण्यासाठी भाजप-शिवसेनेने युतीचा निर्णय घेतला''.

''नोटबंदीनंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेची वाताहत झाली आहे. व्यवस्थेविरोधात असंतोष वाढत चालला आहे. दुष्काळामुळे परिस्थिती चिघळणार हे स्पष्ट झालं आहे. मे महिन्यात दुष्काळ शिगेला पोहोचेल आणि त्याचवेळी निवडणुका आहेत. हे सगळं ध्यानात घेऊन भाजप-शिवसेना सक्तीने एकत्र आले आहेत'', असं रोहित यांना वाटतं.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे

''शिवसेना आणि भाजप यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे. पाच वर्षांपूर्वी मोदींची लाट होती. ती आता नाही हे अमित शहांना कळलं आहे. शरद पवारांसारख्या मुरलेल्या राजकारण्याने काँग्रेससह जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना ग्रासरुटची सखोल कल्पना असते. वातावरण सरकारविरोधी आहे हे समजण्यासाठी पवारांची भूमिका पुरेशी सूचक आहे'', असं ते म्हणाले.

शिवसेना सातत्याने भाजपवर टीका करते आहे. मात्र भाजपने सावध भूमिका घेतली होती. त्यांनी थेट टीका टाळली होती. भूमिकेपासून, वक्तव्यांपासून पलटी खाल्ल्याने शिवसेनेच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)