शिवसेना-भाजप युती : किमान एक तरी जागा द्या, रामदास आठवलेंची मागणी #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आजची वृत्तपत्रं आण वेबसाइटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :
1. किमान एक तरी जागा द्या, रामदास आठवलेंची मागणी #मोठ्याबातम्या
लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कमीत कमी एक तरी जागा द्या अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे, हे वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
अमित शाह आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा केली आहे. लोकसभावेळी ४८ जागांपैकी शिवसेना २३ तर भाजपा २५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटप करताना मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचा विचार न केल्यामुळे रामदास आठवले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
'जर आमच्या पक्षाला एकही जागा न दिल्यास शिवसेना - भाजपाला महाराष्ट्रातील दलित मताचा फटका बसेल. राज्यात आणि केंद्रात एनडीएला पुन्हा सत्तेत यायचे असल्यास आरपीआयची मदत लागेल. त्यामुळे आमच्या पक्षाला लोकसभामध्ये एक तरी जागा द्या. यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेईल, असे आठवले म्हणाले.'
2. वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये -हरभजन सिंग
जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी CRPF जवानांवर केलेल्या हल्याने संपूर्ण देशाला हादरुन सोडले. या हल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आगामी क्रिकेट विश्वचषकात भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये अशी प्रतिक्रिया क्रिकेटपटू हरभजन सिंगने दिली आहे, हे वृत्त टाइम्स नाऊनं दिलं आहे.
पाकिस्तानबरोबर सामना न खेळताही भारत वर्ल्डकपवर नाव कोरू शकतो असा विश्वास भज्जीने व्यक्त केला आहे. पुलवामा येथील हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. सर्वांत आधी देशाचा विचार करण्यात यावा असं देखील हरभजन सिंगनं म्हटलं.
3. 'पुलवामा हल्ल्याचा संशयित मास्टरमाइंड चकमकीत ठार'

फोटो स्रोत, Getty Images
तब्बल 18 तास चाललेल्या चकमकीत पुलवामा हल्ल्याचा संशयित मास्टरमांइड ठार झाल्याचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी CRPFच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या जहालवादी संघटनेनी आत्मघातकी हल्ला केला होता. त्यात 46 जवानांचे प्राण गेले होते. या हल्ल्याचा मास्टरमांइड चकमकीत ठार झाल्याचे लष्कराने सांगितले आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये जैश-ए-मोहम्मदचा जहालवादी ठार झाला. या चकमकीत 1 मेजर आणि 4 जवानांचे प्राण गेले.
4. 300 काश्मिरींचे उत्तराखंडमधून पलायन
14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची प्रतिक्रिया उत्तराखंडमध्ये उमटली आहे. अंदाजे 300 काश्मिरी विद्यार्थ्यांना उत्तरांखडमधून पलायन करावे लागले आहे. या विद्यार्थ्यांनी जम्मू आणि दिल्लीला पलायन केल्याचे वृत्त द हिंदूने दिले आहे.
काश्मिरी विद्यार्थ्यांनी 24 तासांच्या आत वसतिगृह रिकामे करावे अशा धमक्या सोशल मीडियावर फिरत होत्या. अशा विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात यावे अशी सूचना हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. उजव्या विचारसरणीच्या समूहांकडून या धमक्या आल्या होत्या असं एका विद्यार्थ्याने माध्यमांना सांगितलं.
5. निवडणुकीसाठी फेसबुकची नवी नियमावली
21 फेब्रुवारीपासून फेसबुकनं भारतातल्या निवडणुकांसाठी नवी नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या पॉलिसीनुसार राजकीय जाहिरात देण्यासाठी ती व्यक्ती भारतीय असण्याची अट घालण्यात आली आहे. शेजारी राष्ट्रांनी किंवा परराष्ट्रातील व्यक्तींनी भारतीय निवडणूक प्रभावित करू नये म्हणून फेसबुकनं हे पाऊल उचललं आहे. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
अमेरिका, इंग्लंड आणि ब्राझिलनंतर ही नियमावली लागू झालेला भारत हा चौथा देश ठरला आहे. गुगलने 14 फेब्रुवारी रोजीच नवे नियम अंमलात आणले असल्याचे सांगितले आहे. मुंबई हायकोर्टात या दोन कंपन्यांनी निवडणुकासाठी आपल्या योजना काय आहेत याची माहिती दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)