शिवसेना-भाजप युती: ही दोन्ही पक्षांची राजकीय अपरिहार्यताः सोशल मीडियावर वाचकांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे-अमित शाह-देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, TWITTER / DEVENDRA FADNAVIS

अफझल खान, कुंभकर्ण, चोर अशा शेलक्या विशेषणांनी गेली साडेचार वर्षे भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेनं अखेर त्यांच्याशीच हातमिळवणी केली आहे. आमच्या नात्याची ही नवीन सुरूवात आहे, असं म्हणत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.

युती आणि जागावाटपाची घोषणा करतानाच शिवसेनाप्रमुखांनी आमच्यात मतभेद झाले तरी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेहमी एकत्र आहोत असंही स्पष्ट केलं. आता गुप्त बैठका घेण्याची गरज नाही. मी आणि मुख्यमंत्री उजळ माथ्याने राज्यभर फिरू, असं सांगून उद्धव ठाकरे यांनी सत्ता आणि जबाबदारीचं समसमान वाटप होईल असंही म्हटलं.

आपल्या भूमिकेपासून पूर्णपणे यू-टर्न घेत युती करण्यामागे शिवसेनेची मुत्सद्देगिरी आहे की भाजपचं राजकीय शहाणपण या विषयावर बीबीसीच्या वाचकांकडून आम्ही प्रतिक्रिया मागवल्या होत्या. अनेकांनी या युतीची संभावना ही वैचारिक दिवाळखोरी, राजकीय संधीसाधूपणा अशा शब्दांत केली आहे.

प्रतापसिंह चौहान यांनी ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी उघड झाल्याचं म्हटलं आहे. एस. पाठक यांनीही 'शिवसेनेच्या अक्कलेची दिवाळखोरी' या शब्दांत युतीवर टीका केली.

सत्तेसाठी लाचार होणार नाही, खिशात राजीनामा घेऊनच फिरतो...शिवसेना नेत्यांच्या या विधानांची आठवणही काही वाचकांनी करून दिली आहे. मानसिंग घाटगे यांनी खिशातल्या राजीनाम्याचं काय झालं, असा प्रश्नच शिवसेना नेत्यांना विचारला आहे. रोहिणी सहारे यांनीही 'राजीनामे रद्दीत द्या,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेच्या मोठा भाऊ, छोटा भाऊ विधानावरही वाचकांनी खोचक टिप्पणी केली आहे. नवनाथ सुरकुले यांनी 'ते मोठा भाऊ, बाप वगैरे होतं त्याचं काय झालं,' असं म्हटलं आहे.

अनिकेत देशमुख यांनी सत्तेसाठी काहीही असा टोला लगावला आहे तर संदीप वानखेडेंनी हा भाजपचा मुत्सद्दीपणा आणि सेनेची लाचारी असल्याचं म्हटलं आहे. तर किशोर पवार यांनी एकमेकांची गरज हे युतीचं गुपीत असल्याचं म्हटलं आहे.

काही वाचकांनी शिवसेनेसाठी युती फायद्याची नसून भाजपनं आपलं राजकीय शहाणपण दाखवलं असल्याचं मत मांडलं आहे. दिनकर पवार यांनी ही शिवसेनेची राजकीय आत्महत्या असून भाजपचे धूर्त राजकारण असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. रोहित पाटील यांनीही युतीला 'भाजपचे शहाणपण' असं म्हटलं आहे.

भीमराव जाधव यांनी युती ही भाजपची मोठी खेळी असल्याचं म्हटलंय. चंद्रशेखर मोरे यांनी मात्र पराभवाच्या भीतीनं युती झाल्याचं म्हटलं आहे.

दोघांची बनवेगिरी, नाटक अशा शब्दांतही या युतीबद्दल वाचकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या. 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील संवादाचा आधार घेत अमोल पगारे यांनी 'हा शुद्ध हलकटपणा आहे माने' असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सैद्धांतिक आधारावर युती झाली असल्याचं जाहीर केलं असलं, तरी या युतीमागचं सत्तेचं गणित हे लोकांना पुरेपूर ठाऊक आहे. म्हणूनच काळाची गरज, अपरिहार्यता, सत्तेची लालसा अशा प्रतिक्रियाही वाचकांनी नोंदविल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)