पुलवामा : मातांनो, कट्टरवादाकडे वळलेल्या तुमच्या मुलांना सरेंडर करायला सांगा, नाहीतर...

के. एस. ढिल्लों Image copyright Getty Images

काश्मिरमध्ये जो कोणी बंदूक उचलेल, त्याचा बंदोबस्त करण्यात येईल, असा थेट इशारा लष्कराकडून देण्यात आला आहे.

काश्मिरमध्ये पुलवामा इथं CRPF च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं सोमवारी कट्टरपंथीयांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन कट्टरपंथी ठार झाले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, CRPF आणि जम्मू-काश्मिर पोलिसांच्या वतीनं एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.

या पत्रकार परिषदेमध्ये लेफ्टनंट जनरल के. एस. ढिल्लों यांनी यापुढे कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल हे स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेला CRPF चे IGP झुल्फिकार हसन आणि जम्मू-काश्मिर पोलिसांचे महानिरीक्षक एसपी पाणि हेदेखील उपस्थित होते.

काश्मिरी मातांना लष्कराचं आवाहन

भरकटलेल्या काश्मिरी तरूणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लष्करांनं भावनिक आवाहनंही केलं. "कट्टरपंथाकडे आकर्षित झालेल्या तरूणांच्या पालकांनी आपल्या मुलांना समजवावं. विशेषतः आयांनी. काश्मिरी समाजात आईची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. काश्मिरी मातांनी आपल्या मुलांची समजूत घालावी आणि त्यांना शरणागती पत्करण्यासाठी तयार करावं," असं ढिल्लोंनी म्हटलं.

ढिल्लों यांनी सांगितलं, की हा संदेश आहे आणि विनंतीही आहे.

हल्ल्याला पाकिस्तानी लष्कराचं पाठबळ

CRPF च्या जवानांवर झालेल्या हल्ल्याला पाकिस्तानी लष्करच जबाबदार असल्याचंच ढिल्लों यांनी म्हटलं. पाकिस्तानी लष्कर आणि ISIच्या मदतीनं जैश-ए-मोहम्मदनं हा आत्मघातकी हल्ला केला असल्याचंही त्यांनी म्हटलं. जैश-ए-मोहम्मद ही संघटना पाकिस्तानी लष्कराचंच पिल्लू आहे, असंही लेफ्टनंट जनरल ढिल्लोंनी म्हटलं.

जैश-ए-मोहम्मदचा महत्त्वाचा सदस्य कामरान ठार

Image copyright Getty Images

पुलवामा हल्ल्याची आखणी करणाऱ्या तीन कट्टरपंथीयांना संपविण्यात लष्कराला यश आलं असल्याची माहिती त्यांनी दिली. हल्ल्यानंतर शंभर तासांत लष्करानं कारवाई करून जैश-ए-मोहम्मदच्या तीन जणांना ठार केलं. यामध्ये पुलवामा हल्ला घडवून आणणाऱ्या आदिल अहमदचा साथीदार कामरान हादेखील होता. कारवाईमध्ये लष्कराचंही नुकसान झाल्याचं ढिल्लों यांनी म्हटलं.

'जैश'चं काश्मिरमधील नेतृत्व संपविण्यात यश

14 फेब्रुवारीला ज्यापद्धतीचा हल्ला झाला, तसा हल्ला यापूर्वी झाला नव्हता. असे हल्ले सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये होत असतात. काश्मिर खोऱ्यातून जैशचं पूर्ण नेतृत्व संपविण्यात लष्कराला यश मिळाल्याचं लेफ्टनंट जनरल ढिल्लोंनी म्हटलं. सोमवारी लष्करानं केलेल्या कारवाईत कामरान नावाचा एक कट्टरपंथी मारला गेला. तो CRPFच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आदिल अहमद डारचा साथीदार होता.

Image copyright Reuters

पत्रकार परिषदेत दिल्या गेलेल्या माहितीनुसार कामरान काश्मिर खोऱ्यातील तरुणांना भडकविण्याचं आणि प्रशिक्षण देण्याचं काम करत होता. कारवाईत मारल्या गेलेल्या दुसऱ्या कट्टरपंथीयाचं नाव हिलाल आहे. तो स्थानिक काश्मिरी युवक होता. तो बॉम्ब बनवायचा. तिसऱ्याचं नाव राशिद उर्फ गाझी होतं. तो पाकिस्तानी होता.

'सामान्य नागरिकांनी चकमकीपासून दूर रहावं'

एवढा मोठा हल्ला झाला कसा या प्रश्नावर उत्तर देताना ढिल्लों यांनी सांगितलं, की याप्रकरणाचा तपास सुरू आहे. काही गोष्टी समोर आल्या आहेत, मात्र आम्ही त्या उघड करू शकत नाही.

सामान्य नागरिकांचं रक्षण करताना आमचे जवान शहीद झाले. आम्हाला नागरिकांच्या सुरक्षेकडही लक्ष द्यावं लागतं. आमचे कमांडर आघाडीवर होते. त्यांना नागरिकांनाही वाचवायचं होतं. त्यामुळेच काश्मिरी जनतेला माझी विनंती आहे, की त्यांनी चकमकीच्या ठिकाणापासून लांब रहावं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)