पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळणार का?

भारत-पाकिस्तान क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानचं दृश्य

भारत-पाकिस्तान मॅच हे कोणत्याही क्रिकेट वर्ल्डकपचं मुख्य आकर्षण असते. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या वर्ल्डकपमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

''वर्ल्डकपमधल्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवर भारताने बहिष्कार घालावा अशी भूमिका फिरकीपटू हरभजन सिंगने मांडली आहे. पाकिस्तानबरोबर कोणत्याही स्वरुपाचे संबंध ठेवण्याची गरज नाही. वर्ल्डकपमध्ये आपण पाकिस्तानविरुद्ध खेळायला नको. देश आपल्या सगळ्यांसाठी पहिला प्राधान्य आहे. आपल्या सैन्यदलाच्या पाठिशी भक्कमपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे'', असं हरभजननं म्हटलं आहे.

तो पुढे म्हणतो, ''पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पुलवामा येथे सैनिकांवर झालेला हल्ला हा नि:शब्द करणारा आहे''.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळायला नको असं मुंबईस्थित सीसीआय अर्थात क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे सचिव सुरेश बाफना यांनी म्हटलं आहे. सीसीआय ही क्रिकेट संघटना आहे मात्र खेळापेक्षाही देश महत्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं.

पुलवामा हल्ल्यानंतर सीसीआयने पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांची तसबीर झाकली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भारत-पाकिस्तान संघांचं चाहते

सीमेनजीकच्या क्षेत्रात हिंसाचाराच्या घटना वाढल्याने दोन्ही देशातले संबंध दुरावले. यामुळे 2013 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतात किंवा पाकिस्तान इथे द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. मात्र ICCतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळतात. याचाच भाग म्हणून आयसीसी वनडे वर्ल्डकप, ट्वेन्टी-20 वर्ल्डकप तसंच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुकाबला होतो.

सरकारच्या परवानगीशिवाय पाकिस्तानशी क्रिकेट सामने होणार नाहीत असं आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितलं. एखादा देश दहशतवादाचं समर्थन करत असेल तर त्याचा खेळावरही परिणाम होतो. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. सरकारची अनुमती असल्याशिवाय पाकिस्तानशी क्रिकेट सामने आयोजित होऊ शकत नाहीत.

वर्ल्डकपमध्ये होणार असलेल्या भारत-पाकिस्तान लढतीविषयी मात्र शुक्ला यांनी ठोस उत्तर दिलं नाही. वर्ल्डकपचं आता सांगता येणार नाही. वर्ल्कपमधील सामन्यासाठी अजून बरेच दिवस बाकी आहेत. काय होतंय ते पाहूया असं त्यांनी सांगितलं.

भारत-पाकिस्तान सामन्याला पारंपरिक द्वंदाची पार्श्वभूमी असल्याने संयोजकांच्या दृष्टीने हा सामना फार महत्त्वाचा असतो. हा सामना हाऊसफुल्ल असतो. जगभर लाखो चाहते टीव्हीच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद लुटतात. या सामन्याभोवतीच्या अर्थकारणावर स्पर्धेचं यश-अपयश अवलंबून असतं.

वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धची लढत सोडली तर...

इंग्लंडमध्ये होणार असलेल्या वर्ल्डकपदरम्यान 16 जून रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत आणि पाकिस्तान लढत होणार आहे. भारताने ही लढत सोडल्यास जाहिरातदार, प्रक्षेपण कंपनी यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. चाहत्यांनाही एक अव्वल दर्जाचा मुकाबला पाहायला मिळणार नाही.

ICCच्या नियमावलीनुसार, एखाद्या संघाने विशिष्ट सामन्यावर बहिष्कार घातला तर तो संघ पराभूत झाला अशी नोंद होते. मात्र दोन्ही संघ आणि आयसीसी यांच्यात सविस्तर बोलणी होऊन तोडगा निघाल्यास दोन्ही संघांना समान गुण विभागून दिले जातात. याआधी वर्ल्डकपमध्ये संघांनी विशिष्ट संघाविरुद्ध किंवा विशिष्ट ठिकाणी खेळण्यास नकार दिल्याची उदाहरणं आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भारत-पाकिस्तान लढत संयोजकांच्या दृष्टीने महत्त्वाची असते.

1996 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघांनी सुरक्षिततेच्या मुद्यावरून श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी श्रीलंकेत नागरी युद्ध सुरू होतं. त्यावेळी श्रीलंकेला संपूर्ण गुण बहाल करण्यात आले होते.

2003 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने रॉबटे मुगाबे यांच्या प्रशासनाला विरोध म्हणून झिम्बाब्वेत खेळण्यास नकार दिला होता. त्याच स्पर्धेत न्यूझीलंडने केनियात खेळण्यास असमर्थतता व्यक्त केली होती. कट्टरतावादी संघटनेने केनियात बॉम्बहल्ल्याची धमकी दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भारत-पाकिस्तान लढतीच दृश्य

मात्र भारत आणि पाकिस्तान संघांनी अद्याप अशी भूमिका घेतलेली नाही. 16 जून रोजी होणारी लढत झाली नाही तर भारतीय संघांचं गुणांच्या बाबतीत नुकसान होऊ शकतं. प्रक्षेपण वाहिनी, जाहिरातदार यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जगातल्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रिकेट लढतींमध्ये या मॅचचा समावेश होतो.

2015 वर्ल्डकपमधली भारत-पाकिस्तान लढत 28.8 कोटी चाहत्यांनी पाहिली होती. या मॅचच्या माध्यमातून 110 कोटींची कमाई झाल्याचा दावा विविध आस्थापनांनी केला होता.

वर्ल्डकपमध्ये भारताचं पारडं जड

वनडे वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान लढतींमध्ये भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. दडपणाच्या अशा या मुकाबल्यात भारतीय संघाने नेहमीच बाजी मारली आहे. 50 षटकांच्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या सहा लढतीत भारतीय संघच विजयी ठरला आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये इंडोपाक लढतींची आकडेवारी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)