UPSC : नागरी सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; यंदा जागा वाढल्या

UPSC

फोटो स्रोत, Getty Images

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) तर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेची जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे. देशातील सर्वांत कठीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही परीक्षा होते.

यावर्षी एकूण 896 जागांसाठी ही जाहिरात आली आहे. त्यात विकलांग उमेदवारांसाठी 39 जागांची तरतूद करण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 ते 32 इतकी आहे. 1 ऑगस्ट 2019 पर्यंत 32 वर्षांपेक्षा जास्त वय नसलेल्या आणि 21 वर्ष पूर्ण केलेल्या उमेदवारांना ही परीक्षा देता येणार आहे.

परीक्षा कधी आहे?

नागरी सेवा पूर्व परीक्षा 2 जून 2019 रोजी होणार आहे. त्यासाठी अर्जाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून 18 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

फोटो स्रोत, PTI

मुख्य परीक्षा 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा पाच दिवस सुरू राहील. गेल्या काही वर्षांपासून भारतीय वन सेवेची पूर्व परीक्षा ही नागरी सेवेच्या पूर्व परीक्षेबरोबरच घेतली जाते. मुख्य परीक्षेची तारीख वेगळी असते. यावर्षी वनसेवेची मुख्य परीक्षा 1 डिसेंबर 2019 पासून सुरू होईल. ही परीक्षा दहा दिवस सुरू असेल.

अर्ज कसा कराल?

ज्या उमेदवारांना ही परीक्षा देण्याची इच्छा आहे त्यांनी आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण जाहिरात डाऊनलोड करावी. या परीक्षेसाठी दोन भागात अर्ज करायचा असतो. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येतो. याविषयीची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.

परीक्षेचं स्वरूप

IAS, IPS, IFS आणि इतर पंचवीस सेवांसाठी अधिकारी निवडण्यासाठी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येते. पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत परीक्षा घेतली जाते. पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाची असते. त्यात सामान्य ज्ञान आणि नागरी सेवा अभियोग्यता चाचणी (CSAT) असे दोन पेपर्स असतात. मुख्य परीक्षा लेखी स्वरुपाची असते. या परीक्षेत नऊ पेपर्सचा समावेश असतो. तिसरा टप्पा मुलाखतीचा असतो. या सेवांमध्ये दाखल होण्यासाठी हे तिन्ही टप्पे उत्तीर्ण होणं अनिवार्य असतं.

लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर या परीक्षेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)