शिवसेना-भाजप युती: तलवार म्यान केली नाही, वारे आमच्या बाजूला वळले: शिवसेना #5मोठ्या बातम्या

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

आजची वृत्तपत्रं आण वेबसाइटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. तलवारी म्यान केली नाही, वारे आमच्या बाजूला वळले: शिवसेना

भाजपशी केलेली युती ही लाचारी नसून वारे आमच्या बाजूला वळले असल्याची निशाणी असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये म्हटले आहे.

"पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण 'वारे' आमच्या बाजूला वळले," अशी भूमिका शिवसेनेनी सामनामधून घेतली आहे. शिवसेनेनी भाजपशी युती केल्यानंतर शिवसेना लाचार झाली अशी टीका विरोधकांनी केली होती. त्याला सामनातून शिवसेनेनी प्रत्युत्तर दिले आहे.

देशात लाटांचे जिरणे आणि उसळणे नवीन नाही असा चिमटा देखील सामनाने काढला आहे. शिवसेना हा NDAचा जुना घटकपक्ष होता. तसेच भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर आले. त्यांना जे काही सांगायचे ते आपण ठाकरे शैलीत सांगितले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

2. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे सध्याच्या ९ टक्क्यांवरून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील महागाई भत्ता १२ टक्के होणार आहे. ही वाढ १ जानेवारी २०१९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे, असं वृत्त लाइव्ह मिंटनं दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ९,२०० कोटींचा अतिरिक्त बोजा येणार आहे. महागाई भत्त्यातील या वाढीचा लाभ एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सना मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

3. आनंद दिघेंचा मृत्यू नैसर्गिकच, मुलगा नीलेशचा दावा खोडत नारायण राणेंचं स्पष्टीकरण

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. हे वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन,

आनंद दिघे

माजी खासदार नीलेश राणे यांनी आनंद दिघे यांचा मृत्यू हा अपघात नसून हत्या होती असा खळबळजनक दावा नीलेश राणे यांनी केला होता. मात्र हा दावा खोडून काढत आनंद दिघेंचा मृत्यू नैसर्गिक होता असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दिघे यांचा मृत्यू कोणीही मारून झालेला नाही, त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता. मी त्यांना भेटणारा शेवटचा माणूस होतो त्यांच्या अपघातानंतर मी जेव्हा त्यांना भेटलो त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या मृत्यूची बातमी आली.

4. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णाद्रमुकची युती

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तामिळनाडूतील अण्णाद्रमुकशी युती केली आहे. अण्णाद्रमुक आणि भाजपने मंगळवारी तामिळनाडू व पुद्दुचेरीमध्ये लोकसभा निवडणूक एकत्रितरित्या लढवणार असल्याचे जाहीर केले, ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि अण्णाद्रमुकचे नेते ओ. पनीरसेल्वम यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली.

त्यानुसार भाजप तामिळनाडूतील महाआघाडीचा भाग म्हणून निवडणूक लढवले. तामिळनाडूत लोकसभेच्या एकूण ३९ जागा असून त्यापैकी पाच जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. तर पुद्दुचेरीत भाजप लोकसभेच्या एका जागेवर निवडणूक लढवेल.

5. सिद्धूजी अपने दोस्त इम्रान खान को समझाइये, दिग्विजय सिंह यांचा सिद्धूंना चिमटा

अपने दोस्त इम्रान खान को समझाइये असा चिमटा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना घेतला आहे, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

"मला ठाऊक आहे मोदी भक्त मला ट्रोल करतील पण मी हे सांगणार आहे," अशा शब्दांत दिग्विजय सिंह यांनी ट्वीट केलं. त्यानंतर ते म्हणाले की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे मुस्लीम कट्टरवाद्यांसमोर हतबल झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आणि हाफिज सईद यांना भारताच्या हवाली करून इम्रान खान यांनी थोडी हिंमत दाखवावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. इम्रान खानमुळेच तुम्हाला शिव्या पडत आहेत तेव्हा आपल्या मित्राची समजूत काढावी असं दिग्विजय सिंह यांनी सिद्धू यांना म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)