शिवसेना-भाजप युतीनंतर नारायण राणे यांचा बालेकिल्ल्यातच कस लागणार

  • तुषार कुलकर्णी
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
नारायण राणे, भाजप

फोटो स्रोत, Twitter

2005साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राणे यांचे समर्थक एक घोषणा द्यायचे, 'नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है.' या घोषणा म्हणजे शिवसेनाला मुंबईतच आव्हान द्यायचा प्रकार होता. नारायण राणे यांनी त्यानंतर पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. काही निवडणुकांत राणेसमर्थक आमदारांची विधानसभेत वर्णी लागली.

पण 2005 आणि 2019 या 14 वर्षांत पुराखालून बरेच पाणी वाहून गेलं आहे. काँग्रेसमध्ये महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी पदे भूषवल्यानंतर राणेंनी काँग्रेसला 'हात' दाखवत 2017ला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. तर राज्याच्या पटलावर शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील, अशी स्थिती निर्माण झाली होती. कोकणात 'राणे' फॅक्टर भाजपसाठी जमेची बाजू वाटत होता. राणे भाजपच्या जाहीरनामा समितीवरही होते. पण शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाल्यामुळे राणे यांची राजकीय समीकरणं बिघडली नसती तरच नवलं.

भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत खासदार असलेल्या राणेंनी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे.

शिवसेना आणि भाजप युतीचा राणेंच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम होईल, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकप्रकारे ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक राणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वासाठीच महत्त्वाची ठरवणार.

"दादानूमुळे अनेक शेळकुंडांची हळकुंडा झाली,' असं कणकवलीत म्हटलं जातं. आता कोकणातच 'हळकुंडांच्या नशीबात काय असा," असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

नारायण राणे पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

नारायण राणेंनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. युतीने भाजप आणि शिवसेनेला फायदा होणार नाही, असा दावा त्यांनी केला. भाजपच्या पाठिंब्यावर आपण खासदार झालो पण आपण भाजपमध्ये नसल्याचं त्यांनी निक्षून सांगितलं.

पण निवडणुकीनंतर आपण भाजपलाच पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. असं असलं तरी लोकसभा निवडणूक 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' स्वबळावर लढेल असं ते म्हणाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून त्यांचे पुत्र निलेश राणे उभे राहतील.

फोटो स्रोत, Nilesh rane@twitter

फोटो कॅप्शन,

रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निलेश राणे उभे राहतील.

ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असतील त्या ठिकाणी राणे आपले उमेदवार उभे करणार आहेत. प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे केले जातील असं नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणूक राणेंसाठी किती महत्त्वाची?

नारायण राणेंसाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार सतिश कामत सांगतात, "त्यांचे पुत्र निलेश राणे 2009मध्ये लोकसभेवर निवडून आले होते पण 2014मध्ये त्यांचा पराभव झाला. आता ते पुन्हा उभे राहणार आहेत. ही निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची तर आहेच पण त्याचबरोबर ती त्यांच्या राजकीय अस्तित्वाची कसोटी असेल," असं मत कामत यांनी व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नारायण राणे आणि नितेश राणे

"युती झाल्यामुळे नारायण राणेंसाठी ही निवडणूक कठीण झाली आहे. निलेश राणे यांची लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात असेल. शिवसेना भाजप एकत्र आल्याने युतीच्या उमेदवाराची शक्ती वाढलेली असेल. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाईल, त्यामुळे तिथं काँग्रेसचा किंवा आघाडीचा उमेदवार उभा राहील. राणेंसोबत काँग्रेसमधून बाहेर न पडलेले कार्यकर्ते आणि शिवसेना भाजपचे कार्यकर्ते राणेंच्या विरोधात प्रचार करतील," असं कामत सांगतात.

राणेंचा कोकणात किती प्रभाव?

नारायण राणे यांनी शिवसेनेविरोधात आपले उमेदवार उभं केले तर शिवसेनेच्या उमेदवारांवर काय परिणाम होऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर देताना कामत म्हणाले, "राणे शिवसेनेत असताना सेनेचे ताकद ही राणेंची ताकद समजली जायची. पण आता चित्र बदललं आहे. रायगडमध्ये त्यांचा प्रभाव नाही आणि रत्नागिरीमध्येही त्यांच्याकडे नेते आणि कार्यकर्ते नाहीत. त्यांचं सिंधुदुर्गमध्ये नेटवर्क आहे. त्या आधारावर पूर्ण कोकणाचा अंदाज आपण काढू शकत नाही."

"शिवसेनेविरोधात नेमके कोणते उमेदवार नारायण राणे उभे करतात त्यावर शिवसेनेचं किती नुकसान होऊ शकतं हे अवलंबून आहे," असं महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे सांगतात.

नाणार प्रकल्पाचा फायदा शिवसेनेला?

"नाणार प्रकल्पाला स्थगिती मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. त्याचा निश्चितपणे शिवसेनेला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यामुळे शिवसेनेचा उमेदवारांना भाजपचं पाठबळ मिळेल. त्याचं नुकसान राणेंना होऊ शकतं. जर काँग्रेसनं त्या ठिकाणी चांगला उमेदवार दिला तर निलेश राणेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते," असं चोरमारे सांगतात.

"आमदार म्हणून नितेश राणे यांचं कणकवली मतदारसंघात चांगलं काम आहे ही त्यांची जमेची बाजू आहे," असं देखील चोरमारे सांगतात.

'युती झाली पण कार्यकर्त्यांचं मनोमिलन नाही'

शिवसेना आणि भाजपची युती झाली पण त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं नाही. मग ते एकमेकांच्या प्रचाराला जातील का, असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.

फोटो स्रोत, AMIT SHAH@TWITTER

शिवसेना सत्तेमध्ये भागीदार होती पण त्यांनी नेहमीच भाजप आणि पंतप्रधानांवर टीका केली ही गोष्ट अद्याप भाजप कार्यकर्ते विसरले नसल्याची आठवण त्यांनी करून दिली. शिवसेनेनी सत्तेत असूनही काहीच विकासकामं केली नाहीत त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे ही निवडणूक आपण जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पण राणे यांच्यासोबतचे एकेकाळचे बरेच कार्यकर्ते आणि नेते आता त्यांच्यासोबत नाहीत, ही बाबा राजकीय विश्लेषक सांगतात.

एकूणच बालेकिल्ला सांभाळतानाच राणेंचा कस लागणार आहे. राज्याच्या राजकीय पटलावर अजूनही बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत, त्यातून राणे त्यांच्यासाठी कशी जागा बनवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)