पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेस कोमात तर भाजप जोमात का?

  • राजेश प्रियदर्शी
  • डिजिटल एडिटर, बीबीसी हिंदी
मोदी - गांधी

फोटो स्रोत, Getty Images

अकरा फेब्रुवारीला पूर्वांचलच्या प्रभारी प्रियंका गांधी लखनौमध्ये रोड शो करत होत्या. राहुल गांधीही सोबत होते. ते खेळण्यातलं लढाई विमान दाखवून लोकांना रफालच्या मुद्द्याची आठवण करून देत होते. त्यामुळे "अचानक हवा बदलू लागली आ, भाजप दबावात आहे" असं काही लोक म्हणत होते.

यानंतर बरोबर तीन दिवसांनी म्हणजे 14 फेब्रुवारीला पुलवामात CRPFजवानांच्य तुकडीवर हल्ला झाला. अवघा देश शोक आणि संतापात आ. प्रियंका गांधींनी आपली नियोजित पत्रकार परिषद रद्द केली. आणि अशावेळी राजकीय भाषा करणं योग्य नसल्याचं म्हटलं.

पुलवामा हल्ल्यानंतर ज्याप्रमाणं देश शोकात बुडालाय ते पाहता काँग्रेस पक्ष अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली दिसत नाही. मात्र दुसरीकडे भाजप मात्र पूर्ण जोशात आहे. आणि निवडणुकीच्या रंगातही.

पुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "कट्टरवादाच्या मुदद्यावर आपला पक्ष सरकारसोबत आहे." पण हा हल्ला रोखण्याची जबाबदारी कुणाची होती? आणि या हल्ल्याचं टायमिंग याबाबत प्रश्न उपस्थित करण्याची हिंमत राहुल गांधींनी दाखवली नाही. मात्र त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनी हे धाडस दाखवून भाजपविरोधातील महाआघाडीचं नेतृत्व आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला.

14 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर आपण राजकीय हालचाली पाहिल्या तर स्पष्ट दिसतंय की भाजपनं आपलं निवडणूक कँपेन जोरदार पद्धतीनं सुरु केलंय. मात्र त्याचवेळी काँग्रेसचा गेल्या आठवड्यातला जोश तसा दिसत नाहीए. कदाचित पुलवामा प्रकरण कुठल्या दिशेनं जातंय याचा अंदाज घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या हल्ल्यानंतर अख्खा देश संतापात आहे, आणि तो संताप आपल्या बाजूनं वळवण्याची कुठलीही आयडिया काँग्रेसला सुचत नाहीए असं दिसतंय.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र दुसऱ्या बाजूला भाजप अगदी स्वाभाविकपणे देशभक्ती, राष्ट्रवाद, लष्कर, हिंदुत्व, मोदी, वंदे मातरम्, भारत माता की जय या आपल्या जुन्या-पुराण्या अजेंड्यावर आक्रमकपणे पुढे जाताना दिसतेय. रोजगार, राफेल, विकास हे मुद्दे कुणीही ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे भाजपच्या सुरात सूर मिसळणं किंवा शांत राहणं एवढे दोनच पर्याय काँग्रेससमोर दिसतायत.

पंजाबमध्ये काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी फक्त इतकंच म्हटलं होतं की, "दहशतवादाला कुठला धर्म, जात, देश नसतो." पण त्यावरून विरोधक सिद्धू यांच्यावर तुटून पडले. आणि विशेष म्हणजे सिद्धू यांच्या मदतीला कुठलाही काँग्रेस नेता धावून आला नाही. त्यांना स्वत:लाच आपला बचाव करावा लागला.

महाआघाडी, रॅली आणि भाषणं

मंगळवारी तामिळनाडूत भाजप आणि एआयएडीएमकेच्या युतीची घोषणा झाली. पलानीस्वामी आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकारांना संबोधित केलं. तामिळनाडूत भाजप लोकसभेच्या पाच जागा लढवणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

याआधी सोमवारी शिवसेनेनं साडेचार वर्ष एकमेकांवर कुरघोडी आणि हल्ले प्रतिहल्ले केल्यानंतर भाजपशी युती केली. एक-दुसऱ्याला पटकण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांनी चक्क एकमेकांचा हात हातात घेऊन अगदी हसत हसत फोटोसेशन केलं. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यातील 23 जागा शिवसेना तर 25 जागा भाजप लढवणार आहे.

अमित शाह आणि पियुष गोयल आपल्या राजकीय कार्यक्रमात व्यस्त झालेत. युतीची घोषणा आणि चर्चा बैठका करतायत. मात्र त्याचवेळी प्रियंका गांधी, राहुल गांधी, अखिलेश, मायावती आणि इतर विरोधी पक्षातले नेते शांतपणे हे सगळं पाहताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींनी यादरम्यान उत्तर प्रदेशच्या झांसीत, महाराष्ट्रातील धुळ्यात आणि बिहारच्या बरौनीमध्ये जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी 'वंदे भारत'सह इतर काही योजनांचं उद्घाटन आणि भूमीपूजनही केलं.

पुलवामा प्रकरणाचं राजकारण न करण्याचं आवाहन करणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि रेल्वेमंत्र्यांनी ही रेल्वे म्हणजे "अतिरेक्यांना चोख उत्तर आहे." असं म्हटलं. याप्रमाणेच आसाममध्ये निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना पुलवामा प्रकरणाचा उल्लेख करत "हे यूपीएचं सरकार नाहीए" असं म्हटलं.

निवडणूक सभांचा सिलसिला कायम ठेवत बुधवारी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओडिसाच्या कालाहांडी जिल्ह्यात 'दहशतवादाविरोधात सिंहगर्जना होईल' असा दावा केला.

ज्या दिवशी संध्याकाऴी पुलवामात जवानांनी प्राण गमावले त्यावेळी दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी प्रयागराजमध्ये मतं मागण्यात व्यस्त होते. शिवाय एका संगीत कार्यक्रमातही सहभागी झाले. अर्थात त्यामुळे मनोज तिवारींवर टीकाही झाली.

राहुल गांधींनी पुलवामा हल्ल्यानंतर छत्तीगडमध्ये एका सभेला संबोधित केलं. शिवाय भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या किर्ती आझाद यांना पक्षात प्रवेशही दिला. याशिवाय राजकीय विषयांवर मात्र त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. पुलवामा प्रकरणानंतर प्रियंका गांधी लोकांना भेटतायत. चर्चा करतायत. मात्र जाहीर मंचावरून काहीही बोलणं किंवा पत्रकारांशी संवाद साधणं त्यांनी टाळलंय.

पुलवामा मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार?

14 फेब्रुवारीआधी विरोधकांच्या हल्ल्यांना उत्तर देताना भाजपा विकासाची भाषा करताना दिसत होती. दरम्यान जोवर निवडणूक होत नाही तोवर राम मंदिर प्रकरणी कुठलंही आंदोलन करायचं नाही, अशी जाहीर घोषणाच संघ आणि विश्व हिंदू परिषदेनं केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

पाच दिवस आधी असं वाटत होतं की 2019च्या निवडणुकीचा अजेंडा सेट करण्यात विरोधकांनी आघाडी घेतली आहे. पण पुलवामा प्रकरणानंतर भाजप आक्रमक झाली. कारण पाकिस्तानविरोधात देशभक्ती आणि राष्ट्रवादावर बोलण्यात त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत चांगलं आहे. दुसरीकडे पाकिस्तान, मुसलमान, काश्मिरी, देशद्रोही वगैरे शब्दांचा गरजेप्रमाणे वापर करण्यात आला आहे.

अशा स्थितीत विरोधकांना आपल्या रणनीतीचा पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. पुलवामा हल्ल्याचं प्रकरण थंड होण्याची कुठलीही शक्यता नाहीए. लष्करानं प्रत्युत्तरादाखल केलेली कारवाई भाजप नेते आपलंच यश आहे, असं ठासून सांगण्यात अजिबात कमी पडणार नाहीत. त्यामुळे विरोधकांसाठी कुठलीही टिपण्णी करणं कठीण झालंय. तुम्हाला आठवत असेल की उरी हल्ल्यानंतर झालेल्य सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना टीकेचा सामना करावा लागला होता.

विरोधी पक्षांच्या एकतेला 'महाठगबंधन' म्हणणाऱ्या भाजपनं मात्र तिकडं एआयएडीएमके आणि शिवसेनेशी युती केली. मात्र दुसऱ्या बाजूला भाजपाविरोधात एकजुटीनं लढण्याचा विचार करणाऱ्या विरोधकांच्या गटात सन्नाटा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)