शिवसेना-भाजप युती रश्मी वहिनींच्या हातच्या साबुदाणा वडा आणि खिचडीमुळे: मुख्यमंत्री

फोटो स्रोत, Getty Images
आजची वृत्तपत्रं आण वेबसाइटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :
1. 'मातोश्री'वरील साबुदाणा वडा आणि खिचडीमुळे झाली युती: मुख्यमंत्री
शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर अनेक राजकीय विश्लेषक ही युती का झाली याचं उत्तर आपल्या परीने शोधत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मिश्कील विधान केलं आहे. शिवसेना-भाजप युतीचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हातचे साबुदाणा वडे आणि खिचडी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकमतच्या महाराष्ट्रियन ऑफ द इअर या कार्यक्रमावेळी अभिनेता रितेश देशमुखनं मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिल्याचं एबीपी माझानं म्हटलं आहे.
2. शिवसेनेविरोधात पाच ठिकाणी राणे आपले उमेदवार उभे करणार
भाजप-शिवसेना युती झाली तरीही भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष राज्यातील पाच मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार आहेत. विशेष म्हणजे हे पाचही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व अन्य एका मतदारसंघांत उमेदवार उभे करणार आहेत. 'आपला पक्ष स्वतंत्र असून, पक्षाच्या वतीने उमेदवार उभे करणार आहोत, असे राणे यांनी सांगितले. प्रत्येक महसूल विभागात एक उमेदवार उभा केला जाईल. हे वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
3. रोजगाराचा मुद्दा ठरणार कळीचा! - टाइम्स मेगा पोल
निवडणुकीच्या काळात रोजगाराचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरू शकतो असं निरीक्षण टाइम्स ऑनलाइन महासर्वेक्षणात मांडलं गेलं आहे. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे. निवडणुकीमध्ये रोजगाराचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरू शकतो असं मत 40.2 टक्के लोकांनी मांडलं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न, राम मंदीर हे मुद्दे देखील प्रचारातील मुख्य मुद्दे असतील असं लोकांना वाटत असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
4. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जागावाटपात बदल होण्याची शक्यता
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे पण अद्याप जागावाटप निश्चित झालं नसल्याचं काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
फोटो स्रोत, Getty Images
जागावाटपाबाबत शरद पवार यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे.
जागावाटपाबाबत शरद पवार यांच्याबरोबर बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात बदल होण्याची शक्यता असल्याचं विखे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी किती जागा काँग्रेस लढवेल आणि किती राष्ट्रवादी तसेच कोणते मतदार संघ कुणाकडे राहतील हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
5. किसान मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली
राज्य सरकारने आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा एकटवले आहेत. किसान सभेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण देत किसान सभेच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तसेच आंदोलनाचे आयोजक अजित नवले यांच्यासह अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे गुरुवारी पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. ही बातमी झी 24 तासनं दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)