मनसे नेते नितीन नांदगावकर यांना का बजावण्यात आलीये तडीपारीची नोटीस?

नितीन नांदगावकर

फोटो स्रोत, FACEBOOK/Nitin Nandgaonkar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी दोन वर्षे तडीपारची नोटीस बजावली आहे.

परप्रांतीय रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी अडवणुकीविरोधात नांदगावकरांकडून नेहमी आक्षेप घेतला जायचा. मात्र रिक्षाचालकांची दादागिरी उघड करताना नांदगावकर यांनी कायदा हाती घेतला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

नांदगावकर यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचा ठपका पोलिसांनी नांदगावगावकर यांच्यावर ठेवला आहे.

निराधार आरोप ठेवून पोलिसांनी मुंबई, उपनगरं आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई माझ्यावर करण्यात आली असल्याचं नितीन नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

नांदगावकर यांनी बुधवारी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हीडिओ अपलोड केला आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी स्वतःची बाजू मांडली आहे.

"ज्या पोलिसांना मी माझं कुटुंब मानत होतो, त्यांनीच माझ्यावर कारवाई केली आहे," असं नांदगावकरांनी व्हीडिओमध्ये म्हटलं आहे. अन्यायाच्या विरोधात आपण लढत राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.

नांदगावकरांवर झालेल्या कारवाईबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं, "मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेली ही पहिली कारवाई नाहीये. 2008 पासून मनसेविरोधात अशा कारवाया होत आहेत. त्यामुळे अशा तडीपारीला आम्ही घाबरत नाही. नांदगावकरांसंदर्भात जी काही कायदेशीर लढाई लढावी लागेल, ती आमचे वकील न्यायालयात लढतील."

दरम्यान, मनसेनंही नांदगावकरांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला असून त्यांच्या समर्थनार्थ ट्विटरवर #isupportnitinnandgaonkar या नावाने मोहीम सुरू केली आहे.

कोण आहेत नितीन नांदगावकर?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून नांदगावकर हे पक्षात आहेत. सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांचा पक्षातला प्रवास सुरू झाला. सध्या नितीन नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत.

नांदगावकर हे आपल्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेसाठी ओळखले जातात. आपल्या फेसबुक पेजवर नांदगावकर हे अनेकदा परप्रांतीयांविरोधातले व्हीडिओ टाकत असतात.

अवास्तव भाडे आकारणाऱ्या, प्रवाशांवर दादागिरी करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांना वठणीवर आणण्याचं काम आपण करत असल्याचा दावा नांदगावकर यांच्या अनेक फेसबुक पोस्टमधून पाहायला मिळतो. प्रसंगी अशा वाहन चालकांना त्यांच्याकडून मारहाणही करण्यात येते.

आपण जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असल्याचा दावा करणारे नांदगावकर हे दर बुधवारी सामान्य मुंबईकरांना भेटतात. केवळ रिक्षा आणि टॅक्सीचालकच नाही तर सामान्यांना फसवणाऱ्या बिल्डर, बनावट पासपोर्ट बनवणारी टोळी यांच्याविरोधातही कारवाई केल्याचा दावा नांदगावकर यांनी केला आहे.

टायमिंगवर प्रश्नचिन्ह

युवा आणि छात्र महापंचायतचे अध्यक्ष अरुण मिश्रा यांनी नांदगावकर यांना नोटीस बजावण्याच्या वेळेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

"नांदगावकर गेली तीन-चार वर्षं या प्रकारचे कृत्य करत होते. त्यांच्यावर आताच कारवाई करण्यात आली, म्हणजे त्यामागे निवडणूक जवळ येण्याचे कारण असावं. निवडणुका तोंडावर आल्यामुळं त्याचा एक मुद्दा बनवला जाऊ शकतो.

"नितीन नांदगावकर ज्या प्रकारचे कृत्य करत होते, ते कायदेशीर पद्धतीने करता आले असते. कोणताही प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडविण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे," असं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)