पुलवामा: '4 दिवसात यवतमाळ सोडा नाहीतर...' - काश्मिरी विद्यार्थ्यांना 'युवासेनेकडून मारहाण'

  • नितेश राऊत
  • बीबीसी मराठीसाठी यवतमाळहून
काश्मिरी विद्यार्थ्यांना यवतमाळात मारहाण

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन,

काश्मिरी विद्यार्थ्यांना यवतमाळात मारहाण

काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला CRPFच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणीच्या काही बातम्या देशभरातून येत आहेत. यवतमाळमध्येही चार विद्यार्थ्यांना मारहाणीची घटना गुरुवारी समोर आली आहे.

शिक्षणासाठी जम्मू-काश्मीरहून यवतमाळमध्ये आलेल्या चार विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात 10 ते 12 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवासेनेनं या घटनेचा निषेध करत कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. पण हे कार्यकर्ते मनसेमधून युवासेनेमध्ये आलेले स्वयंघोषित युवासैनिक असल्याचं यवतमाळ शिवसेनेचा दावा आहे.

मारहाण झालेले विद्यार्थी शहरातील दयाभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालयातले आहेत. बुधवारी रात्री युवासेनेच्या काही कार्यकर्त्यांनी या विद्यार्थ्यांना वैभवनगर परिसरात गाठले आणि 'काश्मीरमध्ये परत जा' असं म्हणत त्यांना मारहाण करायला सुरवात केली.

या मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली.

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन,

पोलिसांपुढे जबाब नोंदवताना काश्मिरी विद्यार्थी

मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांनी लोहारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.

"आरोपी युवा सेनेचे असल्याचं व्हीडिओवरून स्पष्ट होत आहे. त्याबाबतची अधिक माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांचं वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. मारहाणीच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून चौकशीअंती ते समोर येईल," अशी राजकुमार यांनी माहिती दिली.

काय आहे व्हीडिओत?

व्हीडिओमध्ये युवा सेनेचे कार्यकर्ते काही तरुणांना 'वंदे मातरम' म्हणण्यास भाग पाडत असल्याचं दिसतं. 'तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात?' असे प्रश्न विचारत त्यांना विचारले जातात. "शिक्षणासाठी तुम्ही इकडे येता आणि तिकडे तुम्ही आमच्या जवानांना मारता. तुम्ही इकडे यायचं नाही, परत जा," अशी धमकीही या देण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी उमर राशीद याने बीबीसीशी बोलताना सांगितलं, "बाजारातून परत येताना काही तरुणांनी आम्हाला घेरले. 'तुम्ही तिकडे दंगे करता,' असं ते आम्हाला म्हणाले. ते आम्हाला शिकू देत नाहीत. आम्हाला इकडे त्रास देतात, त्यामुळं लवकरात लवकर आम्ही सगळे परत जाणार आहोत.

फोटो स्रोत, Nitesh Raut

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"आमच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांनाही मारहाण करण्यात आली. आम्ही जवळपास 80 विद्यार्थी शिक्षणासाठी इकडे आले आहोत. त्यापैकी अनेकजण परत गेले आहेत. आता आम्ही फक्त 10 ते 12 जण उरलो आहोत.

"ते म्हणाले 'तुम्हाला इकडे राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावं लागेल'. गेल्या तीन दिवसांपासून ते काश्मीरच्या विद्यार्थ्यांची घरं शोधत होते. मारहाण करायला काही घरांमध्ये शिरलेदेखील होते. पण काल अचानक आम्हाला शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केली. 'चार दिवसात यवतमाळ सोडलं नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,' अशीही धमकी देण्यात आली आहे."

'आम्ही असला मूर्खपणा करत नाही'

शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड म्हणाले, "आम्ही मारहाण करणाऱ्या या स्वयंघोषित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहोत. अशा मारहाणीचं आम्ही समर्थन करत नाही.

हे लोक मनसेमधून सेनेत आलेले कार्यकर्ते असल्याचा दावा गायकवाड यांनी केला.

"विद्यार्थ्यांना मारहाण करणं चुकीचं आहे. विरोध करण्याचा हा मार्ग नाही. तिकडून आलेल्या एक-दोन विद्यार्थ्यांना मारहाण करणं, हे मर्दुमकीचं लक्षण नाही. आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत. असला मूर्खपणा आम्ही करत नाही," असंही ते म्हणाले.

तर युवासेनेनं या प्रकरणी कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

"आज यवतमाळमध्ये जी घटना घडली ही पाकिस्तान आणि दहशतवादविरोधी उद्रेकातून घडली असली तरी ती चुकीची आणि निषेधार्ह आहे. देशप्रेमी काश्मिरी तरुण हे आम्ही आमचे बंधू समजतो आणि त्यांच्यासोबत युवासेना नेहमी उभी राहील. आजचे निषेधार्ह कृत्य करणारे जर युवासेनेचे कार्यकर्ते असले तर युवासेनेच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल," असं युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी एका प्रसिद्धीपत्रकात जाहीर केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)