पुलवामा : काश्मीरच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना ठाऊक नाही?

प्रकाश जावडेकर

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी काश्मीरच्या विद्यार्थ्यांना रोषाला सामोरं जावं लागलं. मात्र केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बातम्यांचा इन्कार केला. काय आहे नेमकं सत्य?

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरच्या विद्यार्थ्यांबरोबर कुठेही मारहाणीचा प्रकार घडल्याचं मानण्यास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नकार दिला.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत जावडेकर म्हणाले, ''काश्मिरातील विद्यार्थ्यांवर देशभरात अनेकठिकाणी हल्ले आणि मारहाणीचे प्रकार घडत आहेत असं सांगण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. मात्र हे खरं नाही. मी सर्व शैक्षणिक संस्थांच्या संपर्कात आहे आणि अशी कुठलीही घटना घडलेली नाही हे मी सांगू इच्छितो''.

जावडेकर यांच्या वक्तव्यावर काश्मीरमधील स्थानिक लोकांनी आक्षेप घेतला आहे आणि सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे.

जावडेकर यांनी ऑपरेशन डिजिटल बोर्डच्या लाँचदरम्यान वीस मिनिटं सुरू असलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान हे वक्तव्य केलं.

ते म्हणाले, ''पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात त्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने हा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर देशभरातील नागरिकांमध्ये राग आहे''.

14 फेब्रुवारी रोजी काश्मीरमध्ये पुलवामा येथे CRPF जवानांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात 45हून अधिक सैनिकांनी जीव गमावला. या घटनेनंतर देशभरात आक्रोश पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी कँडल मार्च तर काही ठिकाणी आक्रमक आंदोलनं झाली. या सगळ्यादरम्यान काश्मीरातील विद्यार्थ्यांना मुलामुलींना धमकावण्याचे तसंच त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. केंद्रीय मंत्री असलेल्या जावडेकर यांच्या वक्तव्यावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

क्रोधित गर्दीचा दबाव

पुलवामा हल्ल्यानंतर अनेक ठिकाणांहून काश्मीरच्या विद्यार्थ्यांना मारहाण तसंच त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याच्या छोट्यामोठ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

यापैकी उत्तराखंड राज्यातील डेहराडून इथलं प्रकरण चांगलंच गाजलं. डेहराडूनहून शहरातील दोन कॉलेजांनी पुढच्या सत्रापासून काश्मीरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये असं परिपत्रक काढलं.

आता आपण चार वक्तव्यांचा अभ्यास करूया. ही वक्तव्यं ऐकल्यावर केंद्रीय मंत्र्यांनी सत्य परिस्थितीचा स्वीकार केलेला नाही हे लक्षात येईल.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

डेहराडूनच्या बाबा फरीद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. अस्लम सिद्दीकी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "चिडलेल्या जमावाच्या दडपणासमोर आम्हाला ते परिपत्रक जारी करावं लागलं. या परिपत्रकात पुढच्या सत्रात काश्मीरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असं म्हणावं लागलं''.

डेहराडूनच्याच अल्पाइन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीनेही अशाच स्वरुपाचं परिपत्रक जारी केलं होतं.

अल्पाइन कॉलेजचे संचालक एस. के. चौहान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ''आमच्या कॉलेजात अडीचशे विद्यार्थी आहेत. यापैकीच एका विद्यार्थ्याने असंवेदनशील पद्धतीने ट्वीट केलं होतं. त्यानंतर राजकीयदृष्ट्या सक्रिय विद्यार्थी कॉलेजात येऊन पोहोचले. त्या विद्यार्थ्याला निलंबित करण्यात यावं या मागणीवर अन्य विद्यार्थी ठाम होते. पुढच्या सत्रापासून काश्मीरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही असं लेखी द्या असा त्यांचा आग्रह होता''.

काश्मीरच्या विद्यार्थ्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या 22 विद्यार्थ्यांना आम्ही अटक केली आहे. काश्मीरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये यासाठी ते कॉलेज प्रशासनवर दबाव टाकत होते.

बातम्या काय सांगतात?

डेहराडूनप्रमाणे हरियाणातल्या अंबालातही असाच प्रकार घडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. घरमालक काश्मीरच्या विद्यार्थ्यांना घर रिकामं करा सांगत असल्याचा व्हीडिओ शेअर केला जात आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर उत्तराखंड आणि हरियाणामध्ये काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी जगणं अवघड होत चाललं आहे या आशयाचा वृतांत बीबीसीने 19 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केला होता. काश्मीरच्या विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं हे तुम्ही वाचू शकता.

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन काश्मीर करिअर काऊंसेलिंग असोसिएशनने गुरुवारी केंद्र सरकारला काश्मीरच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यास सुचवलं आहे.

काश्मीरमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार काश्मीरमधील कोचिंग सेंटर असोसिएशनने पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातल्या विविध शिक्षण संस्थांमधून काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊ असं म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून काश्मीरच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चिंता व्यक्त केली आहे.

काश्मीरच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त काश्मीरच्या व्यापाऱ्यांबरोबर पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा आणि बिहारमध्ये बदनामीच्या घटना प्रसिद्ध झाल्या होत्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)