पुलवामा: भारतीय जवान आता जम्मू-श्रीनगर-दिल्ली प्रवास हवाई मार्गानं करणार #5मोठ्याबातम्या

जवान

फोटो स्रोत, Getty Images

1) पुलवामा: CRPFचे जवान हवाई मार्गानं ये-जा करणार

पुलवामासारख्या घटना टाळण्यासाठी श्रीनगरहून येण्या-जाण्यासाठी निमलष्करी दलाचे जवान आता हवाई मार्गाचा वापर करु शकतात. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू या दरम्यान निमलष्करी दलाचे जवान हवाई मार्गानं प्रवास करु शकतात.

केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या जवानांसाठीही हा आदेश लागू असेल.

गृह मंत्रालयाच्या आदेशाचा फायदा निमलष्करी दलाच्या 7 लाख 80 हजार जवानांना होणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, एएसआईपासून सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

निमलष्करी दलाच्या जवानांना हवाई मार्गानं प्रवास करता येत नव्हता.

2) लेखी आश्वासनानंतर किसान लाँग मार्च स्थगित

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने लेखी आश्वासन दिल्याने नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला 'किसान लाँग मार्च' स्थगित करण्यात आला आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे (AIKS) नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्यात 4 तास चाललेल्या बैठकीनंतर मोर्चाची कोंडी फुटली, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

फोटो स्रोत, SHRIRANG SWARGE

किसान सभेच्या प्रतिनिधींनी सरकारपुढे आपल्या विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत या बैठकीची तपशीलवार माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असे महाजन यांनी नमूद केले. वन हक्क जमिनीचे दावे येत्या तीन महिन्यांत निकाली काढण्यात येतील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

बैठकीनंतर महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारच्या आश्वासनाने आंदोलकांचे समाधान झाल्याचे सांगितले. यावेळी आंदोलक प्रतिनिधीही उपस्थित होते, असंही या बातमीत म्हटलं आहे.

3) सर्जिकल स्ट्राईकचे 'हिरो' लेफ्टनंट जनरल हुडा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लेफ्टनंट जनरल हुडा हे काँग्रेसच्या गोटात दाखल झाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकापूर्वी काँग्रेस पक्षाला लेफ्टनंट जनरल हुडा यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय सुरक्षा टास्क फोर्स तयार करून त्याची पूर्ण जबाबदारी ही हुडा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, असं सकाळच्या बातमीत म्हटलं आहे.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केल्याची माहिती काँग्रेस पक्षानं दिली. 'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना करण्यासाठी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांची भेट घेतली. हुडा देशासाठी एक कृती आराखडा तयार करतील,' असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसनं सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर एक समिती स्थापन केली आहे. काँग्रेसचं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. त्याचबरोबर हा भाजपसाठीही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

4) भारताविरुद्ध कारवाईसाठी पाकिस्तानी लष्कराला अधिकार

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असतानाच, भारताने आक्रमण केल्यास 'निर्णायक रीतीने आणि व्यापक स्वरूपात प्रत्युत्तर देण्याचा' अधिकार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी देशाच्या लष्कराला दिला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

जैश-ए-मोहम्मद संघटनेने केलेल्या या हल्ल्यानंतर, या भ्याड कृत्याचा बदला घेण्याची सुरक्षा दलांना खुली सूट देण्यात आली असल्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

फोटो स्रोत, Reuters

आम्ही आमच्या लोकांचे संरक्षण करण्यास सक्षम आहोत हे दर्शवण्याबाबत आम्ही 'खंबीर' आहोत, असे राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून हजर राहिल्यानंतर इम्रान खान यांनी सांगितले.

भारताच्या कुठल्याही आक्रमणाला किंवा दुस्साहसाला निर्णायक रीतीने आणि व्यापक स्वरूपात प्रत्युत्तर देण्याचे अधिकार त्यांनी सशस्त्र दलांना दिले, असे बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

5) रामदास आठवले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात

राज्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेची युती जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या जागावाटपात आरपीआयला स्थान न दिल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज आहेत.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने संपर्क केला आहे पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत राहू इच्छितो असेही त्यांनी स्पष्ट केले. ZEE 24 तासनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

रिपब्लिकन पार्टीसाठी एकही जागा न सोडणे ही एक गंभीर बाब आहे. मी अजिबात समाधानी नाही आहे. त्यांनी दलित समाज, आरपीआय आणि माझा देखील अपमान केला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) ला एकही जागा न दिल्याने त्यांनी आपली नारजी व्यक्त केली आहे. आमची उपेक्षा केली गेली आणि दोन्ही पक्षांनी याबद्दल नक्की विचार करावा असे आठवले म्हणत आहेत.

महाराष्ट्रात युतीच्या झालेल्या ठरावानुसार आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा 25 तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढवणार आहे. राज्यात एकूण 48 जागा आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)