लोकसभा निवडणूक 2019: मोदींच्या सत्तेचा राजमार्ग तामिळनाडूतून जाणार?

  • आर. मणि
  • बीबीसी मराठीसाठी
मोदी

फोटो स्रोत, Getty Images

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तामिळनाडूच्या राजकारणाची दिशा आता स्पष्ट झाली आहे. AIDMK आणि DMKनं युती आणि आघाडीची घोषणा करुन प्रचाराचं रणशिंग फुंकलंय.

19 फेब्रुवारीला एआयएडीएमकेनं पट्टाली मक्कल कटची (PMK) आणि भाजपसोबत युती केल्याची घोषणा केली.

तामिळनाडूत लोकसभेच्या 39 जागा आहेत. एआयएडीएमकेनं यातील 7 जागा PMKसाठी तर 5 जागा भाजपसाठी सोडल्या आहेत.

AIDMK आणि भाजपच्या युतीची घोषणा होताच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला DMKनं काँग्रेससोबत आघाडीची घोषणा केली. तसंच काँग्रेसला 10 जागा देण्याचंही मान्य केलं. यात पाँडिचेरीच्या एकमेव जागेचाही समावेश आहे.

इतकंच नाही तर VCK आणि MDMKसुद्धा आघाडीत लवकरच सामील होईल असंही सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

2014 मध्ये भाजपा-MDMK आणि विजयकांत यांची MDMK यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)च्या बॅनरखाली एकत्र निवडणूक लढवली होती.

मात्र तामिळनाडूत त्यांना फारशी जादू दाखवता आली नाही. कारण NDAला फक्त 2 जागा जिंकता आल्या.

त्यातली एक जागा PMKनं तर दुसरी जागा भाजपनं जिंकली होती. बाकी सगळ्या म्हणजे 37 जागांवर जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षाचे उमेदवार निवडून आले.

फोटो स्रोत, Getty Images

विशेष म्हणजे जयललिता यांचा पक्ष AIADMK 2014 ला स्वबळावर मैदानात उतरली होती. त्यांनी कुणासोबतही आघाडी केली नव्हती. तरीही त्यांनी 37 जागा जिंकल्या होत्या.

आतापर्यंत राज्यात आघाडीचं गणित कसं होतं?

1998, 2004 आणि 2009 लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग अर्थातच तामिळनाडूतून जात होता.

1998 मध्ये AIDMKनं 18 खासदारांसह NDAचं सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्यानंतर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते. हे सरकार 1999 मध्ये केवळ एका मतानं पडलं होतं.

यानंतर 2004 मध्ये तामिळनाडूत DMK, PMK, MDMK, CPI आणि CPMची आघाडी झाली. आणि त्यांनी राज्यातल्या सगळ्या म्हणजे 39 जागा जिंकल्या.

त्यावेळी AIADMK आणि भाजपला एकही जागा मिळाली नाही.

फोटो स्रोत, Getty Images

2009 मध्ये DMK, काँग्रेस आणि VCKच्या महाआघाडीला 27 जागा जिंकता आल्या. तर AIDMK, DMK, CPI आणि CPMच्या आघाडीला 12 जागा मिळाल्या.

अनेक केंद्रीय मंत्री देणारं राज्य

2004 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि भाजपात केवळ 7 जागांचं अंतर होतं. काँग्रेसनं 145 तर भाजपनं 138 जागा जिंकल्या होत्या.

काँग्रेसच्या नेतृत्वातील UPAनं तामिळनाडूतील सहकाऱ्यांना सोबत घेऊन सरकार बनवलं. त्यामुळेच तामिळनाडूचं महत्व राष्ट्रीय राजकारणात वेळोवेळी आधोरेखित झालं.

2004 आणि 2009 च्या सरकारांमध्ये तामिळनाडूतून अनेक खासदार मंत्री झाले. 2004 मध्ये तामिळनाडूला 14 केंद्रीय मंत्रिपदं मिळाली तर 2009 मध्ये 10 केंद्रीय मंत्रिपदं मिळाली.

करुणानिधींच्या घरी मोदींची भेट

2018 मध्ये करुणानिधींच्या घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस केली. मात्र ऑगस्ट 2018 मध्ये दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं.

याआधी काहीच महिनेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईत करुणानिधींच्या घरी पोहोचले होते. इतकंच नाही तर त्यांनी दिल्लीत येऊन आपल्या घरी राहावं आणि उपचार करावेत असंही मोदींनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मोदींचा इशारा साफ होता. त्यांना DMKसारखा मजबूत साथीदार NDAच्या बाजूला हवा होता.

पण 20 फेब्रुवारीला मोदींच्या या मनसुब्यांना सुरूंग लागला. कारण DMKनं काँग्रेससोबत आघाडीची घोषणा केली.

रजनीकांत आणि कमल हासन

करूणानिधी आणि जयललिता यांच्या मृत्युमुळे तामिळनाडूच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरण्यासाठी आपण राजकारणात येत असल्याचं 31 डिसेंबर 2017 ला सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटलं होतं.

मात्र आपणाला केवळ विधानसभा निवडणुका लढवण्यात रस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर रजनीकांत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नसल्याचं सांगितलं होतं. तसंच आपलं नाव किंवा फोटो कुणीही वापरू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

रजनीकांत यांची ही घोषणा मोदींसाठी मोठा झटका मानली जातेय. कारण शेवटच्या क्षणी रजनीकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुला पाठिंबा जाहीर करतील अशी भाजपला अपेक्षा होती.

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे कमल हासन यांनीही लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कमल हासन यांचा 'मक्कल निधि मय्यम' (MNM) हा पक्ष तामिळनाडू आणि पाँडिचेरीच्या 40 जागा स्वबळावर लढवण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

मात्र कमल हासन डीएमकेवर टोकदार भाषेत निशाणा साधतायत, तर भाजपच्या प्रति त्यांची भाषा थोडी नरमाईची आ.

तामिळनाडू हे भारतातलं असं राज्य आहे ज्यावर फिल्मी दुनियेतल्या ताऱ्यांनी 50 वर्ष सत्ता चालवली.

मात्र आगामी निवडणुकांमध्ये रजनीकांत आणि कमल हासन काय बदल घडवतील हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

धन शक्ती

विशेष बाब म्हणजे तामिळनाडूच्या निवडणुकांमध्ये पैशांचाही वारेमाप वापर होत असतो. "पैशांच्या बदल्यात मतं" देण्याबाबतीत तामिळनाडू देशात अग्रगण्य आहे. सध्याच्या निवडणूक आयुक्तांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

तसंच हे थांबवण्यात आपल्याला अपयश आल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आ. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालातून एक नवं समीकरण आणि दृष्टीकोण आपल्याला पाहायला मिळू शकतो.

(या लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)