पुलवामा: काश्मिरी मुला-मुलींवर होणारे हल्ले रोखा - सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्ट

फोटो स्रोत, Getty Images/BBC

पुलवामा हलल्यांनतर काश्मिरी विद्यार्थ्यांवर देशभरात होत असलेले हल्ले, धमक्या, बहिष्कार रोखण्यासाठी राज्य सरकारांनी काय पावलं उचलली, याची माहिती द्या अशा सूचना सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रासह 10 राज्यांना दिल्या आहेत.

14 फेब्रुवारी रोजी दुपारी काश्मीर मधल्या पुलवामा इथल्या राष्ट्रीय महामार्गावर आत्मघाती हल्ला झाला होता. त्यात 40 CRPF जवानांनी प्राण गमावले.

त्यांनंतर देशभरात काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टानं ही नोटीस बजावली आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला. तारिक आदिब यांनी ही याचिका दाखल केली होती. वकील कोलीन गोन्सालव्हिस यांनी आदिब यांची बाजू मांडली.

काश्मिरी मुलांना होणारी मारहाण, धमक्या, सामाजिक बहिष्कार रोखण्यासाठी योग्य आणि कठोर पावलं उचला असं सुप्रीम कोर्टानं सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांना सांगितलं आहे.

याआधी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं देशभरात काम करत असलेले काश्मिरी लोक आणि शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांची दखल घेत केंद्र सरकार आणि तीन राज्य सरकारांना नोटीस बजावली होती.

महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, जम्मू-काश्मीर, हरियाणा, मेघालय, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ या 10 राज्यांना नोटीस बजावली आहे.

या मुद्यांवर केंद्र सरकारची बाजू मांडताना अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सांगितल की, सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या आदेशाचं पालन करत अगोदरच नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही काश्मिरी मुलांवर हल्ले

पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या घटनेनंतर काश्मिरी विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले चिंताजनक असल्याचं पुण्यात शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी मुलांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

व्हीडिओ कॅप्शन,

पुलवामा : महाराष्ट्रातील काश्मिरी मुलांना जवानांवरील हल्ल्यानंतर असुरक्षित वाटतं?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आतापर्यंत डेहराडून, चंदीगड , दिल्ली तसंच श्रीनगरमध्ये देखील गरीब काश्मिरी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत.

पुण्यात अनेक काश्मिरी मुलं शिक्षण घेत आहेत, नोकरी करत आहेत. जवळजवळ 500 काश्मिरी कुटुंबं पुण्यात असून 2 हजारावर मुलं काश्मीर खोऱ्यातील असल्याची माहिती सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी दिली.

यवतमाळमध्येही चार विद्यार्थ्यांना मारहाणीची घटना गुरुवारी समोर आली आहे.

शिक्षणासाठी जम्मू-काश्मीरहून यवतमाळमध्ये आलेल्या चार विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात 10 ते 12 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवासेनेनं या घटनेचा निषेध करत कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. पण हे कार्यकर्ते मनसेमधून युवासेनेमध्ये आलेले स्वयंघोषित युवासैनिक असल्याचं यवतमाळ शिवसेनेचा दावा आहे.

दरम्यान "आम्ही मारहाण करणाऱ्या या स्वयंघोषित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहोत. अशा मारहाणीचं आम्ही समर्थन करत नाही," असं यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Shiv Sena

हे लोक मनसेमधून सेनेत आलेले कार्यकर्ते असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे.

दरम्यान शिवसेनेनं काश्मिरी मुलांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)