सनी लिओनीने बिहारची इंजिनीयर पदाची परीक्षा खरंच टॉप केली का?

सनी लिओनी Image copyright Getty Images

सरकारी नोकरीसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेमुळे बिहार सरकारच्या अब्रूचं पुन्हा खोबरं झालं आहे. आणि यावेळी कारण ठरली आहे PHED अर्थात सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागातील इंजिनीयर पदासाठीची भरती प्रक्रिया.

मेरिटनुसार होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी 13 फेब्रुवारीला विभागाच्या वेबसाईटवर उमेदवारांची यादी अपलोड करण्यात आली. आणि यात सर्वांत वरच्या क्रमांकावर एक नाव - 'सनी लियोनी'. अॅप्लिकेशन नंबर JEC/0031211 आणि वडिलांचं नाव 'लियोना लियोनी'.

अर्जावरील माहितीनुसार शैक्षणिक आणि अनुभवाच्या आधारावर या परीक्षार्थीला 98.5 टक्के गुण मिळालेत.

या यादीत दुसरं नाव आहे निर्मल चक्रवर्ती. वडिलांचं नाव ओम पुरी. तिसऱ्या क्रमांकावर ज्या व्यक्तीचं नाव आहे तो म्हणजे 'bvcxzbnnb'.

ही माहिती सार्वजनिक होताच सोशल मीडियावर याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत.

विरोधकांनीही या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. शिवाय बिहारच्या शिक्षण व्यवस्था आणि भरती प्रक्रियेची खिल्ली उडवली आहे.

पण बिहारमध्ये हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधीही बिहारमध्ये रूबी राय आणि गणेश हे सामान्य कुवतीच्या विद्यार्थ्यांना टॉपर म्हणून गौरवण्यात आलंय. पेपर लीक आणि परीक्षेतील गोंधळाच्या बातम्या तर इथं अजिबात नव्या नाहीयेत.

Image copyright HTTP://FTS.BIH.NIC.IN

दरम्यान, यावेळचं प्रकरण जरी बिहारच्या शिक्षण विभागाशी संबंधित नसलं तरी या सावळ्या गोंधळामुळे नियुक्त्यांवर मात्र मोठं प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे.

नियुक्तीत गडबड झाल्याचा इन्कार

सनी लियोनी आणि इतरांची नावं नियुक्तीच्या यादीत आल्याचा PHEDनं इन्कार केला आहे. मात्र वेबसाईटवर जी यादी प्रकाशित झाली आहे, ती अंतिम यादी आहे.

PHED विभागाचे मंत्री विनोद नारायण झा यांनी बीबीसीला सांगितलं की, "ही काही फायनल मेरिट लिस्ट नव्हती. संबंधित खात्याकडून ज्युनियर इंजिनीयर पदांवर कंत्राटी पद्धतीनं ही माणसं नेमली जाणार होती. यासाठी 7 हजार अर्ज आले होते. आणि अर्जावर असलेल्या माहितीवरूनच अंतिम यादी अपलोड केली होती.

Image copyright HTTP://PHED.BIH.NIC.IN

"जर कुणाला एखाद्या नावावर आक्षेप असेल तर त्याची तक्रार तुम्ही करू शकता. यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यानंतर आम्ही यादी शॉर्टलिस्ट करून मेरिट लिस्ट तयार करणार आहोत."

मंत्री विनोद नारायण झा सांगतात की, "कुणीतरी या प्रकरणात खोडकरपणा केला आहे, आणि ज्यानं हे केलंय, त्याला माफ केलं जाणार नाही. तुम्ही यंत्रणेची खिल्ली उडवू शकत नाही."

"या प्रकरणी आम्ही FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सायबर सेल IT अॅक्टनुसार गुन्हा दाखल करेल. यानंतर चौकशीअंती ज्यानं कुणी हे कृत्य केलं आहे, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल."

Image copyright HTTP://PHED.BIH.NIC.IN

वेबसाईटवर मेरिट लिस्ट 15 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आली होती. यानंतर 16 तारखेला यादीवर आक्षेप असेल तर ते नोंदवण्यासाठीची सूचना अपलोड करण्यात आली. आणि या आदेशावर 13 फेब्रुवारीला सह्या करण्यात आल्या होत्या.

...मग सनी लियोनीचं नाव कसं आलं?

जर यादीत सनी लियोनीचं नाव आलं नसतं तर PHED विभागाच्या मेरिट लिस्टची आणि ज्युनियर इंजिनीयर भरतीची एवढी चर्चा कधी झालीच नसती.

Image copyright TWITTER/SUNNY

तिसऱ्या क्रमांकाच्या नावाचा उल्लेख करत मंत्री म्हणतात की, "हे सगळं बघून एक गोष्ट स्पष्ट होते की कुणीतरी मुद्दाम हा खोडकरपणा केला आहे. यात विभागाची कुठलीही चूक नाही. आम्ही फक्त अर्ज मागवले होते. अजून अर्जांची चाचपणीही केलेली नाही. त्यामुळे लिस्टमध्ये अशी काही नावं राहिली आहेत."

पण आमची काही चूक नाही, एवढं म्हणून प्रकरणापासून हात झटकणं पुरेसं आहे का, असा एक प्रश्न उद्भवतो. कारण प्रश्न असा आहे की या लिस्टमध्ये अखेर सनी लियोनीचं नाव आलं तरी कसं?

तर लक्षात घ्या की PHED विभागाच्या ज्युनियर इंजिनीयर पदासाठी कुठलीही लेखी परीक्षा झालेली नाही. विभागानं ज्युनियर इंजिनीयर पदांसाठी कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी 11 जानेवारीला PHED विभागाचे मुख्य अभियंता सतीश चंद्र मिश्र यांनी जाहिरात प्रसिद्ध केली होती.

Image copyright HTTP://PHED.BIH.NIC.IN/

त्या जाहिरातीत निवड प्रक्रियेची माहिती देताना म्हटलंय की "यातील 100 गुणांपैकी 75 गुण हे शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर दिले जातील. त्यासाठी उमेदवार किमान डिप्लोमाचं शिक्षण घेतलेला असावा."

अर्थात डिप्लोमात मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारीतच गुणसंख्या ठरेल. उरलेले 25 गुण हे कार्यानुभवाच्या आधारावर मिळतील. कमीत कमी एक वर्षाच्या अनुभवासाठी 5 गुण असतील, म्हणजेच 5 वर्षांचा अनुभव असेल तर 25 गुण मिळतील.

PHEDचे संयुक्त सचिव अशोक कुमार सांगतात की, "प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारावर जी यादी बनवण्यात आली होती, ती 11 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आली होती. शिवाय बिहार सरकारच्या नियमानुसार 24 फेब्रुवारीपर्यंत यावर आक्षेप नोंदवण्यासाठी मुभा देण्यात आली होती."

अर्थात त्यांच्या दाव्यानुसार "ही सगळी प्रक्रिया एका सॉफ्टवेअरच्या मदतीनं करण्यात आली. हे सगळं ऑटोमॅटिक होतं. ज्यांनी आपल्या अर्जात जी माहिती दिली त्यानुसार यादी बनवण्यात आली. यात पीएचईडी विभागानं कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही."

...मग हे सगळं केलं तरी कुणी?

अशोक कुमार सांगतात की, "हे सगळं चौकशीअंती स्पष्ट होईल, कारण ऑनलाईन अर्जांसाठी जी माहिती मागवली होती, ती तर उमेदवारानेच भरली असणार. जसं की मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी वगैरे... सायबर सेल याचा नक्की खुलासा करेल."

ते सांगतात की "आम्हाला जो अर्ज मिळाला तो सनी लियोनीच्या नावाचा होता. अर्जावर तिचाच फोटो होता. जन्मतारीख 13 मे 1991 अशी देण्यात आलीय. ई-मेल आयडीच्या जागी Alixxxx@gmail.com हा आयडी दिला आहे. आणि सोबत मोबाईल नंबरही दिला आहे."

Image copyright NIRAJ PRIYADARSHI /BBC

आम्ही या नंबरवर फोन केला. तो एका पुरुषानं उचलला. आमच्या प्रश्नांची उत्तरं देताना हा नंबर "अलिसा एस्कॉर्ट सर्व्हिस"चा असल्याचं सांगितलं. आपण कुठून बोलताय, असा प्रश्न विचारल्यानंतर समोरच्या माणसानं फोन बंद केला.

ट्रू कॉलरवर हा नंबर 'अलिसा एस्कॉर्ट सर्व्हिस'च्या नावानं दिसतो. गुगलवरून लक्षात की हा नंबर अहमदाबादमधून चालवल्या जाणाऱ्या एका कंपनीचा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सायबर सेलकडे सोपवला आहे.

पण एक प्रश्न कायम राहतो, तो म्हणजे बिहारच्या व्यवस्थेची कायम खिल्ली का उडवली जाते आहे?

ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर सांगतात की, "हे केवळ यंत्रणेची खिल्ली उडवणं नाहीए तर हे दिसतंय की अख्खी यंत्रणाच एक विनोद झाली आहे."

"बघा, या घटनेनंतर असं काही होणार नाही की आता सगळं बदलून जाईल आणि खूप मोठी कारवाई होईल. कारण अशा गोष्टींबाबत सरकार आणि यंत्रणा दोन्ही गंभीर नाहीएत. भ्रष्टाचाराच स्तर इतका वाढला आहे की यापुढे अजून अशा गोष्टी बाहेर येतील."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)