पुलवामा हल्ल्यानंतर 36 काश्मिरी कट्टरतावादी खरंच मारले गेले का? - फॅक्ट चेक

काश्मिरमध्ये सुरक्षा फौजा

फोटो स्रोत, Getty Images

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने एका गुप्त मोहिमेत 36 काश्मिरी कट्टरतावाद्यांना कंठस्नान घातलं, असा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर होत आहे.

या पोस्टमध्ये एक फोटो आहे, ज्यात दोन डझनांहून दहशतवाद्यांचे मृतदेह एका भिंतीशेजारी जमिनीवर ठेवलेले दिसत आहेत. (मन विचलित करणारा हा फोटो इथे प्रसिद्ध करणं आम्ही टाळत आहोत).

हा फोटो शेअर करणाऱ्यांपैकी काही पेजेस डाव्या विचारसरणीचे असून ते भारतीय सैन्याच्या हवाल्याने हे फोटो शेअर करत आहेत. पण हे खरे आहेत का?

14 फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामामध्ये 45 CRPF जवानांचा आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या मोहिमेत भारतीय लष्कराने काही कट्टरतावाद्यांना ठार मारलं होतं, हे सत्य आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने तीन कट्टरतावाद्यांना चकमकीत ठार केलं होतं. पण जो फोटो "36 काश्मिरी दहशतवाद्यांचा" म्हणून शेअर केला जात आहे, तो जुना असून त्याचा पुलवामाशी कोणताही संबंध नाही.

खरंतर हा फोटो भारतातील नसून पाकिस्तानातील आहे. या फोटोचा इतर प्रकरणांमध्ये वापर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. बऱ्याच वेळा त्याचा विविध घटनांनंतर असाच वापर केला गेला आहे.

फोटोची सत्यता

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला हे कळलं की हा फोटो 19 डिसेंबर 2014चा असून तो AFPच्या बसीत शाह यांनी काढला होता.

या फोटोबरोबर AFPने दिलेल्या माहितीनुसार हे मृतदेह तालिबानच्या दहशतवाद्यांचे आहेत, ज्यांना पाकिस्तानी लष्कराने वायव्य भागातील हांगू प्रांतात ठार केलं होतं.

पाकिस्तानातील एका लष्कर-संचालित शाळेवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. पेशावरमधील त्या लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यात 141 जणांचे प्राण गेले होते, ज्यापैकी 132 लहान मुलं होती.

सर्जिकल स्ट्राइक

2016मध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या संदर्भातही या फोटोचा वापर करण्यात आला होता. भारतीय सैनिकांनी काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये दहशतवादी मारल्याचं दाखवण्यासाठी हे फोटो वापरण्यात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images

काश्मीरमध्ये उरीच्या लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ही सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली होती, असं भारत सरकारने सांगितलं होतं.

ISच्या दहशतवाद्यांशी संबंध

कुर्दिश पेशमर्गा फौजांनी इस्लामिक स्टेटच्या (IS) 120 दहशतवाद्यांना 6 तासांच्या अवधीत ठार केल्याचा दावा करणाऱ्या इंटरनेटवरील काही ब्लॉगमध्येही हा फोटो वापरण्यात आला आहे.

कुर्दिश पेशमर्गा फौजा उत्तर इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरुद्ध लढा देत आहेत.

हाच फोटो फेब्रुवारी 2015मध्ये इजिप्तमध्ये व्हायरल झाला होता. ISच्या कट्टरतावाद्यांनी इजिप्तमध्ये 21 ख्रिश्चनांचा शिरच्छेद करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.

त्याचा बदला म्हणून इजिप्तने लिबियामध्ये ISच्या तळांवर बाँबहल्ले केले, असा दावा इजिप्तच्या सोशल मीडियावर अनेकांनी केला होता.

प्रत्यक्षात, इजिप्तने लिबियामध्ये बाँबहल्ले केले होते खरे. पण हा पाकिस्तानचा फोटो तेव्हा या घटनेसंदर्भात वापरण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)