पुलवामा: पुण्यात काश्मिरी पत्रकारावर हल्ला, यवतमाळनंतर दुसरी घटना #बीबीसी मराठी राउंडअप

जिब्रान नाझिर दार
फोटो कॅप्शन,

जिब्रान नाझिर दार

बीबीसी मराठीच्या महत्त्वाच्या बातम्यांवर एका दृष्टिक्षेप.

1) पुण्यात काश्मिरी पत्रकारावर हल्ला, यवतमाळनंतर दुसरी घटना

मूळचा काश्मीरचा आहे, हे समजल्यावर 'टाइम्स ऑफ इंडिया'चे पत्रकार जिब्रान नाझिर दार यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी (22 फेब्रुवारी) पुण्यात घडली.

काश्मीरमध्ये मर्यादित शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध असताना तसंच हिंसाचाराचाला कंटाळून अनेक तरुण काश्मीर सोडून इतर राज्यांमध्ये शिक्षणाला तसंच नोकरीला जात आहेत.

पण 14 फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामामध्ये CRPFवर झालेल्या हल्ल्यात 44 जवानांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून देशभरात तणाव तर आहेच, शिवाय काश्मिरी तरुणांवर ठिकठिकाणी हल्ले होत असल्याच्या बातम्या येतच आहेत. संपूर्ण वृत्त वाचण्यासाठी इथं क्लिक करा

2) राज ठाकरे यांना सोबत घेण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमधले मतभेद उघड

13 फेब्रुवारीच्या संध्याकाळी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार. पण भेटीची कुणकुण माध्यमांना लागताच अजित पवारांनी भेट झाल्याचं कबूल केलं. ते म्हणाले होते, "राज ठाकरे यांचा केंद्रातल्या सरकारला विरोध आहे, म्हणून आम्ही भेटून चर्चा केली."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

संजय निरुपम, राज ठाकरे आणि अजित पवार

त्यानंतर त्यांनी मनसेला आघाडीत घेण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडे पाठवला. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपवर टीका करताना राज ठाकरेंनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राहुल गांधींची स्तुती केली होती. त्यामुळे काँग्रेस मनसेला अनुकूल असेल, अशी शक्यता होती. पण राज ठाकरे यांना सोबत घेण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमधले मतभेद उघड दिसत आहेत. सविस्तर बातमी इथं वाचा

3) पुणे विद्यापीठात M.Phil, PhD विद्यार्थ्यांचं विद्यावेतनासाठी उपोषण

पुणे विद्यापीठात M.Phil आणि PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यावेतनासाठी उपोषण करण्याची वेळ ओढवली आहे.

तीन-चार चादरी अंथरूण त्याला काठ्यांचा आणि दगडांचा आधार देत केलेल्या छताखाली रखरखत्या उन्हात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळ M.Phil आणि PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यावेतन मिळावं यासाठी आंदोलन सुरू करून 14 दिवस पूर्ण झालेत. यापैकी अनेक विद्यार्थी दुष्काळात होरपळलेल्या गावातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात आलेले आहेत.

"वेगवेगळ्या सर्व्हेची कामं करून आतापर्यंतचा खर्च भागवला. आता आई वडिलांना पैसे पण मागू शकत नाही. मी उस्मानाबाद या अतिशय दुष्काळी जिल्ह्यातून शिक्षणासाठी विद्यापीठात आलोय , शेतीत पण उत्पन्न नाही. त्यामुळे आमची फेलोशिप हाच आधार होता," असं हिंदी विभागात पीएचडी करत असलेला आंदोलनकर्ता विद्यार्थी दीपक काळे याने बीबीसी मराठीला सांगितलं.

दीपक प्रमाणे 30-35 विद्यार्थी 8 फेब्रुवारी पासून धरणं आंदोलन करतायत तर जवळजवळ 175 M.Phil आणि पीएचडी च्या विद्यार्थ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

4) लोकसभा निवडणूक 2019 : मोदींच्या सत्तेचा राजमार्ग तामिळनाडूतून जाणार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तामिळनाडूच्या राजकारणाची दिशा आता स्पष्ट झाली आहे. AIADMK आणि DMKनं युती आणि आघाडीची घोषणा करुन प्रचाराचं रणशिंग फुंकलंय.

19 फेब्रुवारीला AIADMKनं पट्टाली मक्कल कटची (PMK) आणि भाजपसोबत युती केल्याची घोषणा केली.

तामिळनाडूत लोकसभेच्या 39 जागा आहेत. AIADMKनं यातील 7 जागा PMKसाठी तर 5 जागा भाजपसाठी सोडल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

AIADMK आणि भाजपच्या युतीची घोषणा होताच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला DMKनं काँग्रेससोबत आघाडीची घोषणा केली. तसंच काँग्रेसला 10 जागा देण्याचंही मान्य केलं. यात पाँडिचेरीच्या एकमेव जागेचाही समावेश आहे.

केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी तामीळनाडुतलं राजकारण का महत्त्वाचं आहे याविषयी आर. मणि यांचं विश्लेषण इथं वाचा

5) पुलवामा : जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा पाकिस्तान सरकारने घेतला ताबा

पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय पाकिस्तान सरकारने ताब्यात घेतलं आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील या मुख्यालयात या संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर असल्याचं सांगितलं जात आहे.

पंजाब प्रांताच्या गृह खात्यानुसार, पंजाब सरकारने मध्य-उल-असबारचा मदरसा आणि परिसरातील सजनाह-उल-इसलाम ही मशीद आपल्या ताब्यात घेतली आहे. ही मशीद जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय मानली जाते. एक प्रशासकीय अधिकारी या परिसरावर नियंत्रणासाठी नेमण्यात आला आहे.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

मसूद अझहर

पाकिस्तान सरकारच्या एका निवेदनानुसार या मदरशात 70 शिक्षक आणि 600 विद्यार्थी आहेत. या परिसराचा ताबा सध्या पंजाब सरकारकडे असल्याचं त्यांनी सांगितलं.

मदरशाच्या कर्मचाऱ्यांनीही या संस्थानाला कुलूप ठोकण्यात आल्याचं बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी ओमर द्रविस नगियाना यांच्याशी बोलताना स्पष्ट केलं. सध्या इथे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)