पुलवामा हल्ल्यानंतरचे 5 प्रश्नं ज्यांची उत्तर अजून मिळालेली नाहीत

  • टीम बीबीसी हिंदी
  • नवी दिल्ली
मोदी आणि राजनाथ सिंह

फोटो स्रोत, Getty Images

पुलवामा इथं CRPFवर झालेल्या हल्ल्याला 1 वर्षं पूर्ण झालं आहे. या हल्यात 40च्यावर जवानांनी प्राण गमावले. भारतीय सैनिकांवर गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये झालेला हा सर्वांत मोठा हल्ला होता. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए महम्मदने घेतली.

या हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त झाला होता, तर दुसरीकडे सरकार आणि गुप्तचर यंत्रणेवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. हे असे प्रश्न आहेत, ज्याची उत्तर अजूनही सरकारने दिलेली नाहीत.

1. हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी म्हटलं होतं की गुप्तचरांकडून इनपूट मिळाले होते, पण त्याकडे दुर्लक्ष झालं. हल्ल्यांसंदर्भात जर गुप्तचर संस्थांनी माहिती दिली होती, तर ही माहिती गांभीर्याने का घेतली नाही?

2. असा मोठा हल्ला करण्यासाठी काही महिने तयारी करावी लागते. गृह मंत्रालय आणि लष्कराला याचा सुगावा लागला नाही, हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश नाही का?

3. जम्मू काश्मीर महामार्ग देशातील अशा महामार्गांत आहे जिथं सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. या महामार्गावर वाहनांची काटेकोर छाननी केली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकं असलेल्या गाडीने सुरक्षा व्यवस्थेला कसं चुकवलं?

4. 200 ते 300 किलो स्फोटकं भारतात आली कुठून? जर ही स्फोटकं बाहेरून आली नाही तर इतकी स्फोटकं हल्लेखोरांना कुठून मिळाली?

5. 78 वाहनांच्या ताफा नेण्यामागं खराब हवामान हे कारण असल्याचं सांगितलं जातं. 2547 जवानांच्या या ताफ्याला हवाई मार्गाने का नेलं नाही?

तज्ज्ञांचे प्रश्न

निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी 2016ला झालेल्या सर्जिकल स्टाईकचं नेतृत्व केलं होतं. पुलवामातील हल्ल्यानंतर इतकी स्फोटकं सीमेपलीकडून येणं शक्य नाही, असं ते म्हणाले होते. "इतकी स्फोटकं लपवून आणली गेली असतील आणि त्याचा उपयोग या हल्ल्यासाठी झाला असेल. आपल्याला शेजारी राष्ट्रासोबत असलेल्या नात्यावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

डी. एस. हुडा

काँग्रेस पक्षाला सुरक्षा संदर्भात विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी समिती बनवण्यात आली आहे. या समितीचं नेतृत्व हुड्डा करत आहेत.

'रॉ'चे माजी प्रमुख विक्रम सूद यांचीही मत असंच आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते सांगतात," सुरक्षेतील चुकीशिवाय इतका मोठा हल्ला होऊ शकत नाही. चूक कुठं झाली हे मी सांगू शकत नाही, पण अशा घटना चुकीशिवाय होऊ शकत नाही." हैदराबादमधील एका चर्चासत्रात ते म्हणाले, "हे उघड आहे हा हल्ला एकट्या व्यक्तीनं केलेला नाही. कुणी तरी कारचं नियोजन केलं असेल. त्यांना CRPFच्या ताफ्याच्या मार्गाची पूर्ण माहिती होती. एका गटाने हा हल्ला घडवला आहे."

सरकारने आतापर्यंत काय पावलं उचलली?

या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्णय घेतले आहेत. आता निमलष्करी दलातील जवानांना श्रीनगरला येण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करता येईल.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली - श्रीनगर, श्रीनगर - दिल्ली आणि जम्मू - श्रीनगर अशा कोणत्याही मार्गावर निमलष्करी दलांना हवाई मार्गाने प्रवास करता येईल. याचा लाभ 7 लाख 80 हजार जवानांना होणार आहे. या मार्गावर या जवानांना हवाई मार्गाचा पर्याय उपलब्ध नव्हता.

याशिवाय जेव्हा सैनिकांचा मोठा ताफा जात असेल तेव्हा तो मार्ग सामान्य नागरिकांसाठी बंद असेल. या संदर्भातील माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये पत्रकार परिषदेत दिली.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)