पुलवामा : पंतप्रधान मोदी हे शहिदांच्या कुटुंबीयांना भेटले नाहीत- राहुल गांधी #5मोठ्याबातम्या

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

आज वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. पंतप्रधान मोदी हे शहिदांच्या कुटुंबीयांना भेटले नाहीत- राहुल गांधी

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना भेटलेही नाहीत. हे कृत्य अमानवी आहे," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

आंध्रप्रदेशातील तिरुपती येथे झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले. हे वृत्त न्यूज 18नं दिलं आहे.

जेव्हा हल्ला झाल्याचं कळलं तेव्हा पंतप्रधान मोदी फोटोशूट करत होते असं देखील ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या या आरोपाला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी ज्या फोटोशूटबद्दल बोलत आहे ते त्या दिवशी सकाळी झालं आहे आणि पुलवामा हल्ला दुपारी झाला, असं भाजपनं म्हटलं.

2. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं 'हे' आव्हान

गेल्या साडेचार वर्षांत मी जी कामं केली आहेत ती सांगतो आणि तुम्ही 15 वर्षांत काय कामं केली ते सांगा असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आव्हान केलं आहे, अशी बातमी एबीपी माझाने दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या साडेचार वर्षांत आम्ही जनतेची अनेक कामं केलीत. रस्ते कामात विक्रम झाला, दुष्काळावर मात करण्याचे प्रयत्न केले. मी माझी कामं सांगू शकतो पण विरोधी पक्षातले नेते त्यांची काम सांगू शकतात का, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

3. काश्मिरी लोकांवर पश्चिम बंगालमध्येही हल्ले, 40 जण अटकेत

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशात वेगवेगळ्या ठिकाणी काश्मिरी नागरिकांवर हल्ले होत आहेत. काश्मिरी लोकांवर हल्ला करण्याच्या गुन्ह्यात पश्चिम बंगाल पोलिसांनी 40 जणांना अटक केली आहे. काश्मिरी लोकांवर हल्ले होण्याच्या एकूण 22 घटना पश्चिम बंगालमध्ये झाल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं त्यात 40 जणांना अटक झाली. हे वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

याआधी सुप्रीम कोर्टानं काश्मिरी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांची दखल घेत राज्यांना आदेश दिले आहेत. काश्मिरी लोकांच्या सुरक्षेत वाढ करावी आणि हल्लेखोरांवर नियंत्रण मिळावावे असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

4. शिक्षकांना राज्यात सातवा वेतन आयोग लागू

अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग अखेर लागू करण्यात आला असून याबाबतचा निर्णय शासनाने शुक्रवारी जाहीर केला, असं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असताना शिक्षकांना मात्र वेतन आयोग लागू करण्यात आला नसल्याचा आक्षेप संघटनांनी घेतला होता. त्याबाबत शासनाने शुक्रवारी निर्णय जाहीर केला असून शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांनाही वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

5. रॉबर्ट वाड्रांची EDकडून सुमारे 7 तास चौकशी

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची नवी दिल्ली येथे सक्तवसुली संचालनालयाने (ED) सुमारे सात चौकशी केली. पैशाच्या गैरव्यवहार प्रकरणात त्यांची EDनं पाचव्यांदा चौकशी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

वाड्रा हे चौकशीसाठी सकाळी 11 वाजता पोहोचले होते. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. मध्ये त्यांना जेवणाची सुटी देण्यात आली होती. ही बातमी इकॉनॉमिक टाइम्सनं दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)