रामदास आठवले : 'भाजपला साथ देण्यासाठी अनेकांचा विरोध पत्करला पण...'

  • तुषार कुलकर्णी
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
रामदास आठवले

फोटो स्रोत, Getty Images

"आठवलेजी, आप तो चमक रहे हो!"

निळ्या रंगाचा सूट घालून जेव्हा सामाजिक कल्याण राज्य मंत्री रामदास आठवले संसद परिसरात आले, तेव्हा पंतप्रधान मोदींनी आठवलेंना ही 'कॉम्प्लिमेंट' दिली. क्षणाचाही विलंब न करता आठवलेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं, "आपने मुझे चमका दिया."

2014 साली नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने निवडून आले. एकेकाळी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीबरोबर असलेल्या रामदास आठवलेंनी त्यांना साथ दिली आणि ते महायुतीत सामील झाले.

मंत्रिमंडळ विस्तारात रामदास आठवले यांना भाजपनं केंद्रीय मंत्रिपद दिलं. मंत्रिपद मिळाल्यानंतर संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या दरम्यान आठवले आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेला हा संवाद.

पण काही दिवसांपूर्वी राज्यात भाजप आणि शिवसेना यांनी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकांसाठी युती जाहीर केली आणि आठवले यांचा कदाचित त्यांना विसर पडला. त्यामुळेच गेल्या सात वर्षांपासून युतीसोबत असलेल्या आठवलेंनी अखेर आपली नाराजी दर्शवली.

"ज्या काळात युती होण्याची चिन्हं जवळपास दिसत नव्हती, त्या काळापासून मी शिवसेना-भाजप युती व्हावी, असंच म्हणत होतो आणि प्रयत्न करत राहिलो. पण आता प्रत्यक्षात जेव्हा युती झाली तेव्हा मला आधी कळवलं देखील नाही," अशा शब्दांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि खासदार रामदास आठवले म्हणाले.

रिपाइला एकही जागा न सोडल्यामुळे युतीला दलित मतांचा फटका बसू शकतो, असंही आठवले म्हणाले.

पुढची दिशा काय असेल याबाबत आपण 25 फेब्रुवारीला निर्णय घेणार असल्याचे आठवलेंनी सांगितले. तर भारतीय जनता पक्ष सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढवणार आहे अशी भाजपची भूमिका आहे, असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी आपली युती जाहीर केली. भाजपच्या वाट्याला महाराष्ट्रात असलेल्या एकूण 48 जागांपैकी 25 जागा आल्या तर शिवसेनेच्या वाट्याला 23 जागा आल्या. या युतीनंतर रिपाईला एकही जागा सोडण्यात आली नाही यावर रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. दक्षिण मुंबईची जागा आठवलेंना हवी आहे.

'भीमशक्ती आणि शिवशक्ती'

एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबरोबर असलेल्या आठवलेंनी शिवसेना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. तर ही अशक्य वाटणारी महायुती कशी बनली या प्रश्नाचे उत्तर देताना आठवले सांगतात, "2012 साली मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र याव्यात अशी त्यांची देखील इच्छा होती. माझ्याबद्दल दलितांचा गैरसमज झाला आहे मी देखील त्यांच्याच बाजूने उभा आहे असं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते."

बाळासाहेब ठाकरे आणि रामदास आठवले

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

"बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समविचारी होते. प्रबोधनकारांनी बाबासाहेबांकडून प्रेरणा घेऊन काम केलं होतं तसेच बाबासाहेबांच्या लढ्याला त्यांचा नेहमीच पाठिंबा असे. हेच संस्कार आपल्यावर देखील झाल्याचं बाळासाहेब सांगत. त्यातूनच भीमशक्ती आणि शिवशक्तीचा विचार समोर आला," आठवले सांगतात.

"मग मी महाराष्ट्राचा दौरा केला. कार्यकर्ते, पत्रकार, साहित्यिक आणि विचारवंतांच्या भेटी घेतल्या. युतीसोबत जावं की नाही यासंदर्भात त्यांना विचारणा केली त्यांनी मला फीडबॅक दिला आणि युतीसोबत जाण्यास हरकत नाही असं सूचवलं. 2012मध्ये शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कडवं आव्हान होतं पण रिपाईच्या मदतीनं दलित मतदान युतीला मिळालं आणि त्यांना पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर 2014 मध्ये युतीला 42 जागा मिळाल्या. त्या मध्ये देखील दलित मतदारांचा मोठा वाटा होता. विधानसभा निवडणुकीला शिवसेना भाजप एकत्र लढले नाहीत पण नंतर एकत्र आले. तेव्हा देखील ते सोबत यावे यासाठी आपण प्रयत्न केले," असं आठवले सांगतात.

'विरोध पत्करून भाजपची भूमिका लोकापर्यंत पोहोचवली'

"भारतीय जनता पक्ष दलितांमध्ये तितका लोकप्रिय नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर भाजपची भूमिका ही सर्वसमावेशक आहे असं मी सांगितलं. त्याचा सकारात्मक परिणाम दलितांवर झाला आणि त्यांनी महायुतीच्या पारड्यात मतं टाकली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर देखील मी हीच भूमिका मांडत राहिलो मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे नेते आहेत, ते राज्यघटनेला मानतात आणि ते दलितांच्या हिताचा विचार करतात हा विचार मी तळागाळातल्या लोकापर्यंत पोहोचवला.

रामदास आठवले

फोटो स्रोत, Getty Images

भाजपच्याच प्रयत्नांमुळे डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला हे सांगून मी वातावरण निर्मिती केली. काही लोकांचा माझ्या या भूमिकेला विरोध होता पण तो पत्करून आपण भाजपच्या बाजूने ठाम उभे राहिलो," असं आठवले सांगतात.

'युती होईल यावर विश्वास होता'

"गेल्या काही वर्षांत शिवसेनेनी भाजपवर टीका केली. त्यानंतर युती होणं जवळपास अशक्यच आहे असं लोक म्हणत पण तेव्हा देखील मी म्हणत राहिलो की युती होणारच आणि युती झाली देखील असं आठवले सांगतात. पण ही गोष्ट विचारत न घेता ही 2019साठी शिवसेना भाजपची युती झाली आणि रिपाईला जागा सोडली गेली नाही. रिपाईला जागा न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे," असं ते म्हणाले.

पुढे काय निर्णय घेणार आणि ही कोंडी कशी सोडवणार असं विचारलं असता आठवले सांगतात, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गोष्टीवर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे."

25 फेब्रुवारीला निर्णय

आठवले यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात आठवले पुढे काय करणार याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारणा केली असता आठवले सांगतात, 25 फेब्रुवारी रोजी आपण आपल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेणार आहोत. या बैठकीत जे ठरणार आहे त्याची घोषणा त्याच वेळी केली जाईल.

'मित्रपक्षांना सोबत घेतलं जाईल'

"भारतीय जनता पक्षाने नेहमीच मित्रपक्षांचा विचार केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील. सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन जाणं ही भाजपची भूमिका आहे," असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं.

2014 च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेनी एकत्र लढल्या नव्हत्या. त्यावेळी रामदास आठवलेंनी भाजपलाच पाठिंबा दिला होता.

आठवलेंचं महायुतीमध्ये राहणं किती महत्त्वाचं?

रामदास आठवले यांचं महायुतीमध्ये राहणं किती महत्त्वाचं असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे सांगतात, "आठवलेंचं महायुतीमध्ये राहणं हे भाजप-शिवसेनेसाठी फार फायद्याचं नसेल पण थोडं फायद्याचं आहेच हे मान्य करावं लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे या निवडणुकीत अटीतटीच्या लढती होतील. जिथं अशा लढती होतील त्या ठिकाणी आठवलेंना मानणारा जो वर्ग आहे तो त्यांचं मतदान निर्णायक ठरू शकतं."

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, Twitter

"राज्यात विशेषतः शहरात त्यांच्या बाजूने असणारा मतदार वर्ग आहे. किमान 10 ते 15 मतदारसंघात त्यांच्या बाजूने असलेल्या मतदारांची संख्या ही अंदाजे 5,000-8000 इतकी आहे. आठवले ज्या बाजूने असतात त्यांनाच हे मतदान मिळतं. जर 'कांटे की टक्कर' झाली तर निवडून येण्यासाठी नाही पण उमेदवार पाडण्यासाठी ही मतं निर्णायक ठरतात," असं कांबळे सांगतात.

वंचित आघाडीचा परिणाम?

वंचित आघाडीची निर्मिती झाल्यानंतर दलित मतदार प्रकाश आंबेडकर बरोबरही जाऊ शकतो मग त्याचा परिणाम आठवलेंच्या मतावर होऊ शकतो का असं विचारलं असता कांबळे सांगतात, "एका मतदारसंघात साधारणतः एक लाख ते अडीच लाख पर्यंत आंबेडकरी चळवळीला मानणारा वर्ग महाराष्ट्रात आहे. ईशान्य मुंबई आणि काही शहरी मतदारसंघात ही संख्या आणखी अधिक होऊ शकते. अशा काही मतदारसंघात आठवलेंच्या पाठीशी असलेला एक गट आहे."

बीबीसी

फोटो स्रोत, facebook

"दलित वर्ग हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करत आला आहे. प्रकाश आंबेडकरांना मानणाराही एक वर्ग आहे. त्यांनीही उमेदवार उभे केले तर त्याचा परिणाम आठवलेंच्या मतदानावर होऊ शकतो पण त्याचं प्रमाण 10-15 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहील. म्हणजेच जर एका मतदारसंघात त्यांचं मतदान 8,000 मतदार असतील तर त्यापैकी 1000-1500 मतांचा फटका त्यांना बसू शकतो," कांबळे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)