लोकसभा निवडणूक 2019: बीबीसी रिअॅलिटी चेक मोहिमेचा शुभारंभ

रिअॅलिटी चेक
फोटो कॅप्शन,

रिअॅलिटी चेक

बीबीसी न्यूज तर्फे भारतात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'रिअॅलिटी चेक' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सोमवार 25 फेब्रुवारीपासून बीबीसी आठवड्यातून पाच दिवस या मथळ्याखाली विशेष बातम्या प्रकाशित करेल. सहा भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषेतून हा उपक्रम चालवण्यात येणार आहे.

त्यात राजकीय पक्षांतर्फे जे दावे केले जातात, त्यांची पडताळणी केली जाईल. तसंच या दाव्यामागे काय तथ्य आहे, ते आम्ही योग्य आकडेवारीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवू.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बीबीसी वर्ल्ड न्यूजचे संचालक जेमी अँगस यांनी भारतातील निवडणुकांसाठी या उपक्रम राबवण्याचं वचन दिलं होतं.

महत्त्वाच्या व्यक्ती आणि संस्थांतर्फे जी वक्तव्यं केली जातात त्यांना बीबीसी 'रिअलिटी चेक'तर्फे आव्हान दिलं जाणार आहे. ते खरे आहेत की दिशाभूल करणारे आहेत, या दाव्यांत आणि वक्तव्यांमध्ये किती तथ्य आहेत, ते ही पडताळणी केल्यावर कळेल.

"अटीतटीच्या निवडणुकांसारख्या परिस्थितीत लोकांमध्ये मतभेद होतात, समाजात दोन गट पडतात. अशा परिस्थितीत आमचे वाचक-प्रेक्षक सांगतात की त्यांच्यासाठी बीबीसीचं निष्पक्ष विश्लेषण मोलाचं ठरतं. मोठ्या घटनांचं सखोल विश्लेषण करण्यासाठी सदैव तयारीत असणं आणि त्यासाठी पुरेशी व्यवस्था असणं, या महत्त्वाच्या गोष्टींमुळे संशयास्पद बातम्यांना वेळीच तपासून त्यावर काम करता येतं," असं जेमी अँगस यांनी सांगितलं होतं.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बीबीसीतर्फे भारतात Beyond Fake news ही मोहीम सुरू केली होती. याअंतर्गत अनेक शाळांमध्ये आणि महाविद्यालयात 'फेक न्यूज'च्या बाबतीत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या तसंच फेक न्यूजसंदर्भात ठिकठिकाणी परिषदही आयोजित करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर 'रिअॅलिटी चेक' ही मोहीम सुरू करण्यात आली होती.

"'रिअॅलिटी चेक'च्या माध्यमातून जे मुद्दे राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आहेत, ते आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे निवडणुकांच्या काळात आम्ही माहितीचा विश्वासार्ह स्रोत होण्याचा प्रयत्न करू," असं बीबीसीच्या भारतीय भाषांच्या संपादक रूपा झा सांगतात.

'बीबीसी रिअॅलिटी चेक' आधुनिक भारतातील जगण्याच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेल. महागाई, अंतर्गत सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतूक, यासारख्या क्षेत्रांमध्ये जे दावे केले जातात, त्यांबद्दलच्या नेमक्या आकडेवारीवर हा 'रिअॅलिटी चेक' आधारित असेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)