आसाम: विषारी गावठी दारूने घेतला 70 लोकांची जीव

  • दिलीप कुमार शर्मा
  • बीबीसी हिंदीसाठी आसामहून
आसाम

फोटो स्रोत, Ritupallab Saikia

आसाममध्ये विषारी गावठी दारू प्यायल्यामुळे मृतांची 70 वर पोहोचली आहे. हे सगळे गोलाघाट आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे होते. मृतांमध्ये अनेक महिलांचा समावेश आहे.

गोलाघाट जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पुष्कर सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की जिल्ह्यात 58 लोकांचा मृत्यू गावठी दारू पिऊन झाला आहे. त्यापैकी 35 लोकांचा मृत्यू गोलाघाटच्या रुग्णालयात झाला आहे तर 23 जण जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये मृत्युमुखी पडले.

आणखी एका माहितीनुसार जोरहाट जिल्ह्यात विषारी दारूमुळे 12 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पोलीस अधीक्षक पुष्कर सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की अनेक लोकांवर सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहे.

गोलाहाट आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. रतूल बोरदोलोई यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं, "हॉस्पिटलला येणारे लोक उलट्या करत होते, काहींच्या छातीत दुखणं होतं तर काहींना श्वास घेताना त्रास होत होता."

काही दिवसांपूर्वी अशाच गावठी दारूमुळे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जवळजवळ 100 लोकांचा बळी गेला होता. यापैकी उत्तर प्रदेशच्या दोन जिल्ह्यांमध्ये तर उत्तराखंडच्या रूडकीमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक होती.

आसाममध्ये चहाच्या मळ्यांमधले कामगार अनेकदा आपला कामाचा थकवा घालवण्यासाठी दिवसाअंती मद्यप्राशन करतात. या घटनेत ज्या दारूमुळे एवढ्या लोकांचा जीव गेला, ती दारू स्थानिकांनीच बनवली होती, अशी माहिती मिळाली आहे.

जाणकारांनुसार ही दारू, त्या परिसरात मिळणाऱ्या देशी दारूपेक्षाही स्वस्त पडते. साधारण पाच लीटर दारूसाठी त्यांना 300 ते 400 रुपये लागतात.

गोलाहाट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका कामगाराने सांगितलं, "मी अर्धा लीटर दारू विकत घेतली होती. ती प्यायलो आणि मग जेवण केलं. आधी काही वाटलं नाही, पण काही वेळाने डोकं दुखू लागलं. मग डोकेदुखी एवढी वाढली की काही खाऊ किंवा झोपू शकलो नाही."

सकाळी छातीतही दुखू लागल्याने त्याच्या पत्नीने त्याला चहाच्या मळ्यांमधल्या दवाखान्यात नेलं. तिथून त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.

आसाम पोलिसांनी एका जणाला याप्रकरणी ताब्यात घेतलं असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच ही या मद्याची विक्री रोखता न आल्याने अबकारी खात्याच्या दोन अधिकाऱ्यांना हलगर्जीपणासाठी निलंबित करण्यात आल्याचं AFP ने सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)