लैंगिक छळवणुकीच्या आरोपांवरून कॅथलिक चर्चने केला कार्डिनल ओस्वल्ड ग्रासिअस यांचा बचाव

कार्डिनल

लहान मुलांचा लैंगिक छळाच्या तक्रारीसंदर्भात कॅथलिक चर्चने त्या मुलांच्या पालकांना निराश केलं, या बीबीसीच्या वृत्तासंदर्भात कार्डिनल चर्चने स्वतःचा बचाव केला आहे.

चर्चने या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं नाही, असं म्हणत कॅथलिक चर्चने फेटाळले आहे.

आपल्याकडे आलेली लैंगिक छळाच्या आरोपांची प्रकरणं योग्य पद्धतीनं हाताळायला हवी होती, अशी कबुली भारतातले सर्वांत ज्येष्ठ कार्डिनल ओस्वल्ड ग्रासिअस यांनी बीबीसीकडं दिली होती.

कार्डिनल ग्रासिअस यांच्याकडे आलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारींविषयी त्यांनी 'अत्याचार पीडितांना निराश केलं', असं वृत्त बीबीसीने दिले होते.

कार्डिनल ग्रासिअस मुंबईचे आर्चबिशप आहेत आणि ते पुढचे पोप होण्याची शक्यता काही जणांनी वर्तवली आहे.

लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी घेऊन आल्यावर कार्डिनल ग्रेशस यांनी त्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिलं नाही, अशी व्यथा पीडितांनी मांडली आहे.

मुंबईच्या आर्चडायसेसने बीबीसीला पाठवलेल्या निवेदनात म्हटलं आहे, "2015 साली मुंबईतील एका रहिवासी पाद्रीने एका लहान मुलाचा बलात्कार केल्याची तक्रार झाली होती. तेव्हा त्या मुलाच्या आणि कुटुंबाच्या विनंतीनुसार कार्डिनल यांनी त्यांची भेट घेतली होती.

"कार्डिनल यांनी पालकांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला होता. कार्डिनलना त्याच दिवशी रोमला निघायचं होतं. त्यामुळे तक्रार करणारे पालक गेल्यानंतर त्यांनी लगेच आरोपी पाद्रींना फोन करून त्यांच्याविरोधात आरोप झाल्याचं सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मुंबईतील आर्चबिशप हाऊस

या निवेदनानुसार त्या आरोपी पाद्रींनी हे आरोप फेटाळले, "पण कार्डिनल ग्रासिअस यांनी त्यांना तात्काळ काढून टाकलं. दुसऱ्या दिवशीच्या माससाठीही उपस्थित राहण्यास मनाई केली."

"तसंच कार्डिनल यांनी एका बिशपला या प्रकरणाची चौकशी करायच्या तसंच या तक्रारकर्त्या पालकांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या, आणि ते रोमला निघाले.

"रोमला पोहोचल्यानंतरही कार्डिनलनी त्या नेमलेल्या बिशपना फोन केला, तेव्हा त्या बिशपनी त्यांना सांगितलं की पीडित मुलाच्या कुटुंबाने स्वतःच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर चर्चनं त्या कुटुंबाला मदत देऊ केली मात्र कुटुंबानं नाकारली," , असं या निवेदनात म्हटलं आहे.

काय आहे आरोप?

देशातील सगळ्यात वरिष्ठ पाद्री आणि व्हॅटकिनच्या बाल लैंगिक शोषणासंदर्भातील परिषदेचे महत्त्वपूर्ण संयोजक कार्डिनल ओसवाल्ड ग्रासिअस यांनी बाल लैंगिक प्रकरणाची तक्रार गांभीर्याने घेतली नाही, असा आरोप पीडित आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींनी केला आहे.

धर्मगुरूंकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत कॅथलिक चर्चमध्ये भीतीचं वातावरण असतं आणि त्याबाबत मौन बाळगलं जातं, असं भारतातील कॅथलिक सांगतात. ज्यांनी याविरोधात बोलण्याचं धाडस दाखवलं आहे, त्यांनी हा भयंकर अनुभव असल्याचं म्हटलं आहे.

पीडितांना योग्य वेळेत मदत तसंच पाठिंबा देण्यात कार्डिनल अपयशी ठरल्याच्या दोन स्वतंत्र घटना बीबीसीच्या हाती लागल्या आहेत.

फोटो कॅप्शन,

पीडिताचे आईवडील

यापैकी पहिली घटना मुंबईतली चार वर्षांपूर्वीची म्हणजेच 2015ची आहे. त्या संध्याकाळी पीडित व्यक्तीचं आयुष्य पूर्णत: बदललं. त्या आईचा मुलगा चर्चमधील प्रार्थना आटोपून घरी परतला. चर्चमधील पॅरिश प्रीस्टने बलात्कार केल्याचं त्या मुलाने आईला सांगितलं.

"हे ऐकल्यावर काय करावं हे मला समजेना," असं पीडित मुलाच्या आईने सांगितलं. आईला कल्पना नव्हती, पण या घटनेनंतर मुलाची आई आणि भारतातील कॅथलिक चर्च यांच्यात खडाजंगी होणार हे स्पष्ट झालं.

मुलाने त्याच्यावरच्या अत्याचाराबद्दल सांगितल्यानंतर आईने कॅथलिक चर्च व्यवस्थेतील मुंबईतल्या सगळ्यांत अव्वल अधिकारी व्यक्तीशी संपर्क केला. कथित बलात्काराचं समजल्यानंतर तीन दिवसांनी पीडित मुलाचे कुटुंबीय मुंबईचे आर्चबिशप आणि कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसिअस यांना प्रत्यक्ष भेटले.

त्यावेळी कार्डिनल ग्रासिअस हे कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया आणि फेडरेशन ऑफ एशियन बिशप्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष होते. ते पुढचे पोप ठरू शकतात, असं अनेकांना वाटायचं.

विशेष म्हणजे त्या आठवड्यात व्हॅटिकनमध्ये लैंगिक शोषणासंदर्भात होणाऱ्या जागतिक परिषदेच्या प्रमुख संयोजकांपैकी ते एक होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)