ऑस्करवर भारताची छाप : सॅनिटरी पॅड बनवत मासिक पाळीवर जागृती करणाऱ्या तरुणींची कथा

  • गीता पांडे
  • बीबीसी न्यूज, काठीखेरा

भारतातील एका लहानशा गावात सॅनिटरी नॅपकिन्स बनवणाऱ्या तरुणींची कहाणी सांगणाऱ्या माहितीपटाला यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्त्कृष्ट लघू माहितीपट म्हणून गौरविण्यात आलं आहे. बीबीसीच्या प्रतिनिधी गीता पांडे यांनी ऑस्कर सोहळ्यापूर्वी या तरुणींची त्यांच्या गावात जाऊन भेट घेतली होती. या भेटीचा हा वृत्तांत...

पहिल्यांदा पाळी आली तेव्हा स्नेह 15 वर्षांची होती. काय होतं आहे हेच तिला समजत नव्हतं.

"मी फार घाबरले होते. काहीतरी गंभीर आजार झाल्याचं वाटून मी रडू लागले होते," दि्ललीपासून फार दूर नसलेल्या काठीखेरा गावामध्ये भेटल्यानंतर स्नेह मला हे सांगत होती.

फोटो कॅप्शन,

लॉस एंजलीसमध्ये होणाऱ्या ऑस्कर सोहळ्याला स्नेह उपस्थित राहिली.

"हे आईला सांगण्याचं धाडस माझ्यात नव्हतं म्हणून मी हे गुपचूप काकूला सांगितलं. ती म्हणाली, की आता तू मोठी बाई झालीस. रडू नको. ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मग तिनंच माझ्या आईला हे सांगितलं."

स्नेह आता 22 वर्षांची आहे. या सात वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. ती आता तिच्या गावातल्या सॅनिटरी पॅडच्या लहानशा कारखान्यात काम करते. ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट लघू माहितीपटाचा बहुमान मिळवणाऱ्या 'Period. End of Sentence' या माहितीपटातील मुख्य व्यक्तिरेखा स्नेहच आहे. लॉस एंजलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार वितरणालाही स्नेह उपस्थित होती.

नॉर्थ हॉलीवुडच्या विद्यार्थ्यांनी क्राऊडफंडिंगद्वारे गोळा केलेले पैसे पॅड बनवण्याच्या मशिनसाठी पाठवल्यावर आणि इराणी-अमेरिकन चित्रपट रायका झेहताबची यांनी स्नेहच्या गावाला भेट दिल्यावर या माहितीपटाला सुरुवात झाली.

दिल्लीपासून 115 किमी अंतरावरील हापूर जिल्ह्यातील काठीखेरा गावात साधारणपणे अडीच तासांमध्ये पोहोचता येतं. मात्र महामार्गांच्या बांधकामुळं आम्हाला तेथे पोहोचायला 4 तास लागले. शेवटच्या 7.5 किमीच्या रस्त्यावरून जाताना तर गाडीचा वेग पूर्ण मंदावला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उघड्या गटारी आहेत.

या माहितीपटाचं चित्रिकरण याच गावातल्या शेतांमध्ये, शाळेत झालं आहे. भारतातल्या इतर गावांप्रमाणं इथंही पाळीला निषिद्ध विषय मानलं जातं. पाळी आलेली बाई अपवित्र मानली जाते तसंच तिला मंदिरात प्रवेश नाकारला जातो. बऱ्याचदा सामाजिक कार्यक्रमांतही तिला सहभागी होऊ दिलं जात नाही.

फोटो कॅप्शन,

पूर्वी मुलींमध्येही पाळी या विषयावर बोललं जायचं नाही असं स्नेह सांगते

या विषयाभोवती असणाऱ्या निषिद्धतेच्या वलयामुळे स्वतःला पाळी येईपर्यंत स्नेहने त्याबद्दल कधीच काही ऐकलं नव्हतं

हा विषय चर्चा न करण्याचा होता. अगदी मुलींमध्ये आपसांतही नाही, असं ती सांगत होती.

मात्र वैद्यकीय प्रश्नांसाठी काम करणाऱ्या 'अॅक्शन इंडिया' नावाच्या एका संस्थेनं काठीखेरा गावात सॅनिटरी नॅपकीनचा कारखाना सुरू केल्यानंतर या स्थितीत बदल झाला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ऑस्कर पुरस्कार स्वीकारल्यानंतर आनंद व्यक्त करताना 'Period. End of Sentence' ची टीम

फोटो कॅप्शन,

एका पाकिटाची किंमत 30 रुपये आहे.

या कारखान्यात काम करणार का, असं तिच्या शेजारी राहाणाऱ्या आणि 'अॅक्शन इंडिया'साठी काम करणाऱ्या सुमनने तिला जानेवारी 2017 रोजी विचारलं.

पदवीधर झालेल्या स्नेहचं दिल्ली पोलिसात काम करण्याचं स्वप्न आहे. गावामध्ये रोजगाराची कोणतीही संधी नसल्यामुळं ती हे काम करायला उत्सुक होती.

जेव्हा मी तेथे काम करण्यासाठी आईची परवानगी मागितली तेव्हा ती म्हणाली, "तुझ्या बाबांना विचार." आमच्या कुटुंबांमध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय पुरुष घेतात.

पण पॅड तयार करण्याचं काम करायला जाण्याबद्दल वडिलांना विचारणं अवघड वाटल्यामुळं लहान मुलांचे डायपर बनवायला जाणार आहे, असं तिनं बाबांना सांगितलं.

दोन महिन्यांनंतर माझ्या आईनं मी पॅड तयार करत असल्याचं त्यांना सांगितलं. पण बाबा म्हणाले, "काही हरकत नाही. काम हे कामच असतं."

या कारखान्यात आता 18 ते 31 वयोगटातील सात महिला काम करतात. आठवड्यातील 6 दिवस 9 ते 5 या वेळेत त्या काम करतात. त्यांना दरमहा 2500 रुपये पगार मिळतो. दररोज इथं 600 पॅड तयार होतात आणि 'फ्लाय' नावाने त्यांची विक्री होते.

फोटो कॅप्शन,

दिवसभरात 600 पॅडस बनवली जातात.

फोटो कॅप्शन,

गावातील महिला पूर्वी पाळी आल्यावर कापडाचा वापर करायच्या

अधूनमधून वीज जाणं ही इथली सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळं टारगेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला कधीकधी रात्री काम करण्यासाठी यावं लागतं, असं स्नेह सांगते.

खेड्यातील दोन खोल्यांच्या घरात चालणाऱ्या या व्यवसायामुळं महिलांची वैयक्तिक स्वच्छता सुधारली आहे. हा कारखाना सुरू होण्यापूर्वी गावातल्या महिला मासिक पाळी आली की बेडशिट किंवा जुन्या साडीचे तुकडे कापून वापरत. आता 70 टक्के महिला पॅड वापरतात.

दोनेक वर्षांत मासिक पाळी या विषयाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून गेला आहे.

आता या विषयावर महिलांमध्ये सहजपणे बोललं जातं. परंतु हा प्रवास तितका सोपा नव्हता.

"सुरुवातीला हे सगळं कठीण होतं. मला आईला घरकामात मदत करावी लागे. अभ्यास करून नोकरी करायची असे. कधीकधी परीक्षेच्यावेळी जास्त तणाव असेल तर माझ्याजागी आई कामावर जायची."

तिचे बाबा राजेंद्र सिंग तन्वर सांगतात, "मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो. जर तिच्या कामामुळे समाजाला विशषतः महिलांना उपयोग होत असेल तर मला आनंदच होईल."

फोटो कॅप्शन,

राजेंद्र सिंग तन्वर आणि स्नेह

फोटो कॅप्शन,

सुषमा देवी यांनी तिथं काम करू नये असं त्यांच्या नवऱ्याला वाटतं. पण त्या मागे हटल्या नाहीत

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पण कारखान्यात नक्की काय चाललं आहे याबाबत साशंक असणाऱ्या काही गावकऱ्यांच्या प्रश्नांना या मुलींना सुरुवातीच्या काळात उत्तरं द्यावी लागत. जेव्हा शूटिंगसाठी माणसं आली तेव्हासुद्धा ही माणसं काय करत आहेत, असे प्रश्न विचारले गेले.

31 वर्षांच्या सुषमा देवीसारख्या महिलांना त्यासाठी घरी लढा द्यावा लागला.

स्नेहच्या आईनं त्यांच्या नवऱ्याची समजूत काढल्यानंतरच तिला परवानगी मिळाली, असं ती सांगते. कामावर जाण्याआधी तिनं सर्व घरकाम पूर्ण केलं पाहिजे असं त्यानं बजावलं.

"त्यामुळं मी आता पहाटे पाच वाजता उठते. घर स्वच्छ करते, कपडे धुते, म्हशींना चारा घालते. जळणासाठी गोवऱ्या थापते, अंघोळ करून, स्वयंपाक करून कामावर जाते. संध्याकाळी आल्यावर रात्रीचा स्वयंपाक करते."

तरीही तिचा नवरा असामाधानी आहे. तो नेहमी माझ्यावर रागावतो. घरात इतकं काम पडलं असताना मी बाहेर कामासाठी जायची काय गरज असं तो विचारतो. हे काम चांगलं नाही असं माझे शेजारी म्हणतात. तसंच पगारही कमी असल्याचं ते म्हणतात.

तिच्या शेजारच्या दोन महिलाही या कारखान्यात काम करायच्या. मात्र काही महिन्यांमध्येच त्यांनी काम सोडलं. पण सुषमा मात्र काम सोडणार नाही. "जरी नवऱ्यानं मला मारहाण केली तरीही मी नोकरी सोडणार नाही. मला इथं काम करायला आवडतं," असं ती सांगते.

फोटो कॅप्शन,

'अॅक्शन इंडिया'द्वारे इथं कारखाना सुरू करण्यात आला.

आपल्या कमाईतून धाकट्या भावासाठी कपडे विकत घेतल्याचं तिनं या माहितीपटात सांगितलं आहे. जर हे ऑस्करपर्यंत जाणार असल्याचं मला माहिती असतं तर मी आणखी काहीतरी चांगलं उत्तर दिलं असतं, असं ती हसून सांगते.

सुषमा, स्नेह आणि तिच्या सहकाऱ्यांना ऑस्कर नामांकनामुळे हुरूप आला होता. आता या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट लघू माहितीपटासाठी ऑस्करही मिळालं आहे. नेटफ्लिक्सवर ही फिल्म उपलब्ध आहे.

स्नेह लॉस एंजल्सला जायला निघाली तेव्हा तिच्यामुळं गावाची प्रतिष्ठा वाढली आणि गावाला प्रसिद्धी मिळाली अशा शब्दांमध्ये तिच्या शेजाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

काठीखेरामधून आजवर परदेशात कोणीच गेलेलं नाही. परदेशात जाणारी मीच पहिली, असं ती सांगते. मला गावात ओळख आणि सन्मान मिळतो. लोक म्हणतात त्यांना माझा अभिमान वाटतो.

जगातील सर्वात मोठा सिनेमा पुरस्कार म्हणून ऑस्करला ओळखलं जातं हे आपण ऐकल्याचं ती सांगते. पण तिनं कधीच हा सोहळा पाहिलेला नाही आणि आपण कधी रेड कार्पेटवर जाऊ हा विचारही तिच्या मनात आला नसेल.

मी कधी अमेरिकेला जाईन असं वाटलं नव्हतं. अजूनही ते खरं वाटत नाही. माझ्यासाठी नामांकन हे पुरस्कार मिळाल्यासारखंच होतं. हे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघितल्यासारखं आहे.

सर्व फोटो -अभिषेक मुजुमदार, बीबीसी

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)