आसाम गावठी दारूचे 99 बळी: देशी दारू नेमकी विषारी कशी बनते?

  • आभा चौधरी
  • रसायन शास्त्रज्ञ
गावठी दारू

फोटो स्रोत, Getty Images

विषारी गावठी दारूमुळे आज पुन्हा अनेकांचा जीव गेला आहे.

आसामच्या गोलाघाट आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे मृतांची संख्या 99 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये अनेक महिलांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी अशाच गावठी दारूमुळे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जवळजवळ 100 लोकांचा बळी गेला होता. आणि साधारण दोन वर्षांपूर्वी मुंबईजवळही अशाच प्रकारे विषारी दारूचे अनेक बळी गेले होते.

पण ही दारू नेमकी काय असते? तिची निर्मिती का केली जाते? आणि जर ही दारू एवढी सर्रास बनवली जाते, तर मग नेमकं चुकतं कुठे ज्यामुळे अशा घटना अधूनमधून ऐकायला मिळतात?

जेव्हापासून हा कारभार सुरू झाला आहे, तेव्हापासून या चुका होताहेत. देशाच्या अनेक भागातून या दारूमुळे मृत्यूच्या बातम्या आल्या आहेत.

देशी दारूला कच्ची दारू असंही म्हणतात. तिचं मिश्रण करणं अतिशय सोपं असतं. पण या कच्च्या दारूची झिंग वाढवण्याच्या नादात ती विषारी बनते.

सामान्यत: गूळ आणि उसाच्या मळीपासून देशी दारू तयार केली जाते. त्यात युरिया आणि बेलाची पानं टाकली जातात. त्यामुळे त्याची नशा आणखी जास्त होते.

मिथिल अल्कोहोल

दारू जास्तीत जास्त चढावी, यासाठी त्यात ऑक्सिटॉसिन टाकलं जातं, जे मृत्यूला निमंत्रण देते. गेल्या काही वर्षांत अशी माहिती मिळाली आहे की ऑक्सिटॉसिनमुळे वंध्यत्व येतं आणि मज्जासंस्थेशी निगडीत आजार होतात.

त्याच्या सेवनामुळे डोळ्यात जळजळ, खाज आणि पोटात जळजळ होऊ शकते. दीर्घकाळ सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.

कच्च्या दारूत युरिया आणि ऑक्सिटॉसिन सारखे रासायनिक पदार्थ मिसळल्यास मिथिल अल्कोहोल तयार होतं आणि त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

मिथिल अल्कोहोल शरीरात जाताच झपाट्याने रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे शरीराच्या आतले अवयव निकामी होतात आणि लगेच मृत्यू ओढवतो.

मिश्रणात असंतुलन

काही लोकांच्या शरीरात ही रासायनिक प्रक्रिया हळूहळू होते. त्यामुळे ते बचावतात.

जे द्रव्य दारू म्हणून विकलं जातं ते 95 टक्के शुद्ध अल्कोहोल म्हणतात. त्याला इथेनॉलसुद्धा म्हणतात.

उसाचा रस, ग्लुकोज, पोटॅशियम नायट्रेट, मोहाची फुलं तसंच बटाटे, भात, जवस, मका असे स्टार्च असलेले पदार्थ एकत्र आंबवून इथेनॉल तयार केलं जातं.

या इथेनॉलमध्ये आणखी नशा टाकण्यासाठी त्यात मिथेनॉल टाकलं जातं. त्यात कास्ट अल्कोहोल किंवा कास्ट नॅप्था या नावाने ओळखलं जाणारं मिथेनॉल मिसळलं जातं की दारूचं संतुलन बिघडतं आणि ती धोकादायक बनते.

मिथेनॉल विषारी असतं

रसायनशास्त्रातील सर्वांत सोपंसरळ अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल. सामान्य तापमानात ते द्रवरूपात आढळतं.

हे एक रंगहीन आणि ज्वलनशील द्रव्य आहे. त्याचा गंध इथेनॉलसारखाच असतो. त्याचा वापर अँटीफ्रीझर म्हणून, म्हणजे गोठणबिंदू कमी करण्यासाठी केला जातो. तसंच एखादा पदार्थ तयार करण्यासाठी आणि इंधन म्हणूनही मिथेनॉल वापरलं जातं.

मिथेनॉल अतिशय विषारी असतं, हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचा वापर पिण्यासाठी अजिबात केला जात नाही. ते प्यायल्यामुळे मृत्यू ओढवतो तसंच दृष्टी जाण्याचाही धोका असतो.

पाहा व्हीडिओ - दारूचा स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होतो का?

औद्योगिक क्षेत्रात इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, कारण इथेनॉलची विरघळण्याची क्षमता जास्त आहे. त्याचा वापर वॉर्निश, पॉलिश, औषधं, क्लोरोफॉर्म, कृत्रिम रंग, पारदर्शक साबण, अत्तर आणि इतर द्रव्यं तयार करण्यासाठी होतो.

दारूच्या अनेक प्रकारात, जखमा स्वच्छ करताना जंतू नष्ट करण्यासाठी तसंच प्रयोगशाळेत द्रावण (solvent) म्हणून त्याचा वापर करण्यात येतो.

मृत्यू कसा होतो?

विषारी दारू प्यायल्यामुळे शरीरात काय होतं?

या प्रश्नावर डॉ. अजित श्रीवास्तव म्हणतात, "सामान्य दारू ही इथाईल अल्कोहोल असते तर मिथाईल अल्कोहोल विषारी असते. कोणतंही अल्कोहोल शरीरात लिव्हरच्या माध्यमातून अल्डिहाईडमध्ये बदलतं. मात्र मिथाईल अल्कोहोलचं फॉर्मलडिहाईड नावाच्या विषात रूपांतर होतं.

"या विषाचा सगळ्यांत जास्त परिणाम डोळ्यांवर होतो. आंधळेपणा हे त्याचं पहिलं लक्षण आहे. एखाद्याने जास्त दारू प्यायली तर फॉर्मिक अॅसिड शरीरात तयार होतं. त्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो," श्रीवास्तव सांगतात.

आश्चर्याची गोष्ट अशी की विषारी दारूचा उपचारही दारूनेच होतो.

डॉ. अजित श्रीवास्तव सांगतात, "मिथाईल अल्कोहोलचा उपचार इथाईल अल्कोहोल आहे. विषारी दारूला उतारा म्हणून गोळ्याही मिळतात. मात्र भारतात त्या जास्त प्रमाणावर उपलब्ध नाहीत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)