पुलवामा: भारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅचच्या मतावरून सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर ट्रोल झाले

सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय संघानं आगामी क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानविरोधातला सामना खेळावा की नाही, यावरून क्रिकेटविश्वात बरीच चर्चा सुरू आहे.

इंग्लंडमध्ये 16 जून रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत आणि पाकिस्तान लढत होणार आहे. पण या सामन्यावर भारताने बहिष्कार घालावा, अशी भूमिका फिरकीपटू हरभजन सिंगने मांडली होती.

पण सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या मते, पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून माघार घेतली तर भारताला दोन पॉइंट गमवावे लागतील.

सचिन तेंडुलकरने एका ट्वीटद्वारे म्हटलं आहे की "पाकिस्तानला वर्ल्डकपच्या मैदानात नमवण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. उगाच त्यांना दोन पॉइंट देणे त्यांना टूर्नामेंटमध्ये मदत केल्यासारखं असेल.

"पण माझ्यासाठी माझा देश सर्वांत आधी येतो. आणि जो देशाचा निर्णय असेल, मी त्याचीच साथ देईल," असंही त्याने स्पष्ट केलं. उल्लेखनीय म्हणजे, काळ्या पार्श्वभूमीवरचं त्याचं पहिलं वाक्य सरळ सोप्या फाँटमध्ये आहे तर दुसरं वाक्य आवर्जून बोल्ड केलेलं आहे.

सचिनच नव्हे तर सुनील गावस्कर यांनीही 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, "भारतानं या सामन्यातून माघार घेतली तर फायदा पाकिस्तानचा होईल. पाकिस्तान जिंकेल, कारण त्यांना दोन गुण मिळतील."

"मी देशासोबत आहे. सरकारनं पाकिस्तानविरोधात सामना न खेळण्याचं ठरवलं, देशवासीयांना आपण पाकिस्तानशी खेळू नये असं वाटत असेल, तर मी त्याबाजूनं आहे. मी भावना समजू शकतो, पण या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहायला हवं," असं त्यांनी सांगितलं होतं.

साहजिकच सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी घेतलेल्या या भूमिकेवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

काहींनी त्यांच्या मतांशी सहमती दर्शविली तर अनेकांना या दोन्ही माजी खेळाडूंनी घेतलेली भूमिका पटलेली नाही.

भारताने आजवर पाकिस्तानविरुद्धचा प्रत्येक वर्ल्डकप सामना जिंकला आहे. "त्यामुळे मनात असं वैर न ठेवता भारताने पाकिस्तानला हरवावं, जेणेकरून ते पुढच्या वर्ल्डकपपर्यंत पुन्हा ट्रोल होतील," असं सादबक्ष या हँडलवरून मत व्यक्त करण्यात आलं आहे.

Image copyright Student of BugsBunny

तर सय्यद अझीझ म्हणतात, "सचिनचं बरोबर आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना न खेळणं मूर्खपणा ठरेल. मोदींनी ना युद्ध पुकारलं आहे ना पाकिस्तानवर कुठली लष्करी कारवाई केली आहे. मग बहिष्काराचं कारण काय?"

Image copyright Twitter / Syed Areez

पण "हा केवळ दोन गुण देण्याचा मुद्दा नसून भारताने दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या देशाशी न खेळून कडक शब्दांमध्ये इशारा देण्याची गरज आहे," असं मतही ट्विटरवर अनेकांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright ExSecular

"गावस्कर आणि तेंडुलकर यांना दोन पॉइंट्सची पडली आहे. भारताने पाकिस्तानबरोबर खेळायला नको. जोवर बदला घेतला जात नाही, तोवर बाकी सगळं थांबू शकतं," असं @ExSecular या अकाउंटवरून सांगण्यात आलं आहे.

"भारताने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा इशारा देणं, हेच सडेतोड उत्तर असेल," असं देविका म्हणतात.

Image copyright Devika

आणि एकाने आठवण करून दिली की 1980 मध्ये रशियाने यजमानपद भूषविलेल्या ऑलिम्पिक्सवर अमेरिकेने बहिष्कार टाकला होता, तर 1984 साली लॉस अँजेलिसमध्ये आयोजित ऑलिम्पिक्समधून रशियाने माघार घेतली होती.

Image copyright Twitter @SaffronAvnish

काहींनी या दोन्ही खेळाडूंची भूमिका लज्जासपद असल्याचं म्हटलं आहे.

तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर कळवा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)