पुलवामा घडवणारी जैश-ए-महम्मद नव्हे तर जैश-ए-सैतान : असदुद्दीन ओवेसी #5मोठ्याबातम्या

असदुद्दीन ओवेसी

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1) जैश-ए- महम्मद माझ्या दृष्टीने जैश-ए-सैतान - असदुद्दीन ओवेसी

पाकिस्ताननं पुलवामा आत्मघाती हल्ला घडवून आणला. पाकिस्तानवर कारवाई झाली पाहिजे. भारतातले मुस्लीम सरकारसोबत आहेत असं MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. ते शनिवारी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या सभेत बोलत होते. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे

"मसूद अजहर मौलाना नाही तर सैतान आहे," अशा शब्दात ओवेसींनी टीका केली.

जैशने पुलवामामध्ये केलेला हल्ला पहिला हल्ला नाही. याआधी सुद्धा त्यांनी पठाणकोटमध्ये हल्ला केला आहे. जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा आम्ही सर्व एक आहोत हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे असे ते म्हणाले, असंही या बातमीत म्हटलं आहे

2) जमिनावर बाहेर असलेल्या भुजबळांनी किती बोलावं हे त्यांनी ठरवावं - मुख्यमंत्री

"तुम्ही स्वातंत्र्यलढ्यासाठी किंवा गरिबांसाठी तुरुंगात गेला नाही. भ्रष्टाचार केला आणि राज्याच्या तिजोरीतील पैसा स्वत:च्या तिजोरीत भरला म्हणून तुम्ही तुरुंगात गेला. 3 वर्ष तुम्ही तुरुंगात होता आणि अजूनही तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, हे विसरू नका," अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शुक्रवारी नांदेड येथे भाजपच्या बूथ प्रमुखांचा मेळाव्यात ते बोलत होते. ABP माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, TWITTER / CMOMAHARASHTRA

याआधी बुधवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नांदेडमध्येच भाजप सरकारवर टीका केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा समंजस कोणी असेल तर ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.

3) माजी IPS अधिकाऱ्याची आत्महत्या, सूइसाइड नोटमध्ये घेतलं ममता बॅनर्जींच नाव

गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे, असं पश्चिम बंगालचे माजी IPS अधिकारी गौरव दत्त यांनी म्हटलं आहे. त्यांनी स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या केली होती. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

19 फेब्रुवारीला त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं होतं. 1986 साली त्यांची IPS म्हणून निवड झाली होती.

अनेक दिवसांपासून चालत आलेले दोन खटले बंद करावेत अशी दत्त यांनी विनंती केली होती. पण बॅनर्जी यांनी ती मागणी फेटळाली होती. त्यापैकी एका खटल्याची फाईल राज्य सरकारनं गहाळ केली होती तर दुसऱ्या खटल्यात भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नव्हते. या संदर्भात सरकारच्या वतीने प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

4) काँग्रेस सत्तेवर आल्यास निमलष्करी जवानांनाही शहिदांचा दर्जा - राहुल गांधी

काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास कर्तव्य बजावताना शहीद होणाऱ्या निमलष्करी दलाच्या जवानांना शहिदांचा दर्जा देऊ, असं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

ते शनिवारी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी चर्चा करत होते. त्या वेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये गांधी यांनी हे आश्वासन दिलं.

फोटो स्रोत, Reuters

निमलष्करी दलाच्या जवानांना शहिदांचा दर्जा दिला जात नाही, मात्र त्यांना तो मिळावयास हवा, आमचे सरकार आल्यास तो दर्जा दिला जाईल, असं ते म्हणाल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

5) दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी केजरीवाल यांचे आमरण उपोषण

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी 1 मार्चपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत दिला आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी मोहीम सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)