काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांवर कारवाई, 20 हजार अतिरिक्त जवान तैनात-बीबीसी मराठी राउंड अप

काश्मिरमध्ये तैनात जवान

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसी मराठीच्या महत्त्वाच्या बातम्या एका दृष्टिक्षेपात.

1. काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांवर कारवाई, 20 हजार अतिरिक्त जवान तैनात

जमात-ए-इस्लामीचे प्रमुख हामिद फैय्याज आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे (JKLF) नेते यासीन मलिक यांच्यासह 200 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ निमलष्करी दलाचे 20 हजार अतिरिक्त जवान काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. या वृत्तानंतर काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये CRPFच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीर तसंच सीमेवर तणावाचे वातावरण आहे. शिवाय, काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 35-A संदर्भात सुरू असलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे. याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

2. पुलवामा हल्ल्यानंतर वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्नचिन्ह

फोटो स्रोत, Getty Images

काश्मीरमध्ये पुलवामा येथे CRPF च्या जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्काराचं सावट आहे. भारतानं 16 जून रोजी मँचेस्टरमध्ये होणारा पाकिस्तानविरूद्धचा सामना खेळू नये, अशी भूमिका भारतातील सर्वसामान्यांची भावना आहे.

या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर बंदी घालण्यात यावी यासाठी भारत आयोजकांवर दबाव आणत असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र भारताच्या विनंतीवरून अन्य 8 देशांचे संघ पाकिस्तानशी असलेले क्रीडा संबंध धोक्यात का आणतील, हा प्रश्न आहे. वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान मॅचचे भविष्य काय असेल, याच्या शक्यता जाणून घ्या.

3. भारतातील 10 लाख आदिवासी कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर

फोटो स्रोत, Getty Images

भारतात आजमितीला जवळपास दहा कोटी आदिवासी आहेत. एका अंदाजनुसार यातले जवळपास 40,00,000 आदिवासी संरक्षित वनक्षेत्रात राहतात. म्हणजेच भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 5% भागात त्यांचं वास्तव्य आहे. 2006च्या कायद्यानुसार वन जमिनीवर 2005 पूर्वी तीन पिढ्यांपासून राहणारे आदिवासी आणि मूलनिवासी यांना तिथेच राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे.

मात्र सुप्रीम कोर्टाच्या नवीन आदेशानंतर वनजमिनीवर राहणाऱ्या दहा लाखांहूनही जास्त आदिवासींना लवकरच आपले राहते घर सोडावे लागणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदिवासींवर नेमका काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घ्या.

4. 'इस्लामिक स्टेटचा पाडाव पण त्यांचा विखारी विचार मात्र कायम'

फोटो स्रोत, Getty Images

स्वयंघोषित 'खिलाफत' इस्लामिक स्टेटने सीरिया आणि इराकमधील 80 लाख लोकांवर एकेकाळी राज्य केलं होतं. पण आता इस्लामिक स्टेटचा प्रभाव जवळपास संपला आहे.

पाश्चात्य देशांच्या राजधानीत या विजयाचा आनंद दिसत आहे. 79 देशांचे साडेचार वर्षांचे अथक प्रयत्न आणि काही अब्ज डॉलरचा खर्च यातून हा क्षण आलेला आहे. पण ज्या लोकांना इस्लामिक स्टेटच्या गुप्त घडामोडींची माहिती आहे, ते मात्र काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगतात.

थोडक्यात इस्लामिक स्टेट पुन्हा उचल खाऊ शकतं. यासंदर्भातली संपूर्ण बातमी इथं वाचा.

5. लैंगिक छळाच्या तक्रारींबद्दल कॅथलिक चर्चनं केला कार्डिनलचा बचाव

फोटो कॅप्शन,

कार्डिनल ओस्वल्ड ग्रासिअस

लहान मुलांचा लैंगिक छळाच्या तक्रारीसंदर्भात कॅथलिक चर्चने त्या मुलांच्या पालकांना निराश केलं, या बीबीसीच्या वृत्तासंदर्भात कार्डिनल चर्चने स्वतःचा बचाव केला आहे.

चर्चने या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं नाही, असं म्हणत कॅथलिक चर्चनं आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

आपल्याकडे आलेली लैंगिक छळाच्या आरोपांची प्रकरणं योग्य पद्धतीनं हाताळायला हवी होती, अशी कबुली भारतातले सर्वांत ज्येष्ठ कार्डिनल ओस्वल्ड ग्रासिअस यांनी बीबीसीकडं दिली होती. कार्डिनल ग्रासिअस यांच्याकडे आलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारींविषयी त्यांनी 'अत्याचार पीडितांना निराश केलं', असं वृत्त बीबीसीने दिलं होतं.

कार्डिनल यांच्यावरील आरोप आणि त्यांनी दिलेली उत्तरं इथं वाचा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)