पुलवामा : काश्मिरी माता म्हणतात, 'कोणतीही आई मुलाच्या हाती बंदूक देत नाही'

  • माजिद जहांगीर
  • बीबीसी हिंदीसाठी, श्रीनगर
आपल्या मुलाच्या फोटोसह फिरदौसा बानो
फोटो कॅप्शन,

आपल्या मुलाच्या फोटोसह फिरदौसा बानो

'कोणतीही आई आपल्या मुलाला बंदूक देत नाही.'

'जेव्हा आमची मुलं बंदूक हातात घेतात, तेव्हा आपल्या कुटुंबाला त्याबद्दल सांगत नाहीत.'

'त्यावेळी ते आपल्या आई-वडिलांचा विचारही करत नाहीत.'

कुलगाममधील खुदवानी इथल्या आपल्या तीन मजली घरासमोर पारंपरिक काश्मिरी पोशाखात बसलेल्या फिरदौसाजवळ उमरच्या केवळ आठवणी उरल्या आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी काश्मिरी मातांना आवाहन केलं होतं, की ज्यांच्या मुलांनी हाती बंदूक घेतली आहे, त्यांना शरणागती पत्करणासाठी समजवावं.

"जो कोणी बंदूक उचलेल, तो मारला जाईल," असा इशाराही केजेएस ढिल्लन यांनी दिला होता. काश्मिरी मातांची मात्र वेगळीच कहाणी आहे.

'कट्टरपंथी विचारांकडे वळणं ही हतबलता'

फिरदौसा यांचा मुलगा उमर वानीचा मृत्यू २०१८ साली अनंतनागमधील बहरामसाब भागात भारतीय लष्करासोबतच्या चकमकीत झाला होता. बंदूक हाती घेतल्यानंतर तीनच महिन्यात उमर वानीचा मृत्यू झाला. त्याचं वय अवघं २१ वर्षे होतं. चकमकीच्या वेळी उमरचे दोन मित्रही त्याच्यासोबत होते.

फोटो कॅप्शन,

फिरदौसा बानो

उमरनं हा निर्णय तुरुंगातून परत आल्यावरच घेतला असावा, असं फिरदौसा सांगतात.

"त्याला वारंवार त्रास देण्यात आला. पकडून जम्मूमधील कोटबिलावल तुरुंगात पाठवलं. तो सुटून बाहेर आला, मात्र त्याला वारंवार कँपमध्ये बोलावलं जायचं. सुरक्षा दलांनी दिलेल्या त्रासामुळेच तो कट्टरवादी बनला, बंदूक हाती घ्यायला तयार झाला," असा दावा त्या करतात.

भारतीय लष्कराने वेळोवेळी या प्रकारचे आरोप फेटाळून लावले आहेत. कोणतीही मोहीम हाती घेताना निरपराधी व्यक्तीचा जीव जाणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो, असं लष्कराकडून स्पष्ट करण्यात येतं. मात्र तरीही काश्मिरमधील नेते, फुटीरतावादी, मानवाधिकार कार्यकर्ते तसंच सामान्य नागरिकांकडून वारंवार लष्करावर आरोप करण्यात येतात.

फिरदौसा बानो सांगतात, "काश्मिरी तरुणांना कट्टरपंथाकडे वळण्यासाठी भाग पाडलं जात आहे."

त्या सांगत होत्या, की एकेदिवशी त्यांचा मुलगा अचानकपणे घरातून निघून गेला. "आठ दिवसांनंतर तो परतला तेव्हा त्यानं कोणता मार्ग निवडलाय हे आम्हाला कळलं."

"आज तुमचा मुलगा जिवंत असता, तर तुम्ही त्याला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता का," असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यांनी उत्तर दिलं, "मी निश्चितच समजावलं असतं. पण तो खूप दुखावला होता आणि आमचं काहीच ऐकण्याच्या मानसिकतेत तो नव्हता."

फिरदौसा अत्यंत दुःखी स्वरात सांगतात, की त्यानं कट्टरपंथीयांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमचे हात बांधले गेले होते. "आपला मुलगा आपल्यापासून दूर जावा, असं कोणत्याही आई-वडिलांना वाटत नाही. मात्र इथे परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. इथे असं वातावरण नसतं, तर आम्ही जरूर काहीतरी करू शकलो असतो. त्याला जाण्यापासून अडवलं असतं. जेव्हा माझ्या मुलाचं शव घरी आणलं गेलं, तेव्हा मी त्याला पाहतच राहिले. माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते," असं त्या म्हणाल्या.

त्या सांगतात, "जेव्हा आमची मुलं बंदूक हातात घेतात, तेव्हा त्याबद्दल कुटुंबाला काहीच सांगत नाहीत. आपल्या आई-वडिलांचं काय होईल, याची चिंता त्यांना नसते. उमर जेव्हा तुरुंगात होता, तेव्हा आमच्याशी लग्नाबद्दल बोलायचा. स्वतःच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करेन, असं म्हणायचा. पण नंतर सगळंच बदललं."

जरीफा यांची आशा आजही कायम

फोटो कॅप्शन,

बुऱ्हान गनीची आई जरीफा

अनंतनागमधील एसके कॉलनीत राहणाऱ्या जरीफा यांना आपला मुलगा परतून येईल, अशी आशा आहे. आपल्या मुलानं समाजसेवा करावी, अशी त्यांची इच्छा आहे.

जरीफा यांचा मुलगा बुऱ्हान गनी गेल्यावर्षी 24 जूनपासून बेपत्ता आहे. श्रीनगरमधील सीआरसी कॉलेजमध्ये शिकणारा बुऱ्हान एक दिवस घरातून बाहेर पडला, तो परत आलाच नाही.

तो रविवारचा दिवस असल्याचं जरीफाला अजूनही आठवतं. तो घरातून गेल्यानंतर तीन दिवसांनी एक फोटो प्रसिद्ध झाला होता. या फोटोत बुऱ्हाननं हातात बंदूक धरली होती. हा फोटो पाहिल्यानंतर आमच्या कुटुंबाला खूप धक्का लागल्याचं जरीफा यांनी सांगितलं.

फोटो कॅप्शन,

बुऱ्हान गनी 24 जून 2018 पासून गायब आहे.

जरीफा यांनी आपल्या मुलासाठी आवाहन केलं आहे, "माझा मुलगा कोठे आहे, हे माहीत असेल तर मला सांगा. माझा मुलगा परत आला तर मी खूप आनंदी होईन."

जरीफा यांनी मुलासाठीही संदेश दिला आहे, "माझ्या मुला, घरी परत ये. तू लोकांची सेवा केली पाहिजेस. तेच तुझं काम आहे. गरीब आणि नाडलेल्यांना मदत करणं हाच खरा जिहाद आहे. मी तुला खूप चांगले संस्कार दिले आहेत."

भारतीय लष्करानं काश्मिरी मातांना केलेल्या आवाहनाबद्दल जरीफा यांनी म्हटलं, "आपला मुलगा मारला जावा, असं कोणत्याही आईला वाटणार नाही. आमची मुलं सुखरूप असावीत, घरी परत यावीत अशीच आमची इच्छा आहे. आई आपल्या मुलाच्या हातात बंदूक देणारच नाही. आई आपल्या मुलावर किती प्रेम करते, हे सगळ्यांनाच माहीत असतं."

'कट्टरवादी विचारांपासून परावृत्त नाही करू शकत'

हमीदा यांचे विचार जरीफा यांच्यापेक्षा थोडे वेगळे आहेत. बंदूक हाती घेणं ही काश्मिरी तरुणांची हतबलता असल्याचं त्या मानतात.

हमीदा यांचा मुलगा तारिक अहमद खान ऑगस्ट २०१८ मध्ये कट्टरपंथी संघटना लष्कर-ए-तैय्यबामध्ये सामील झाला होता. तारिकचे वडील नजीर अहमद खानदेखील फुटीरतावादी चळवळीत सहभागी झाले होते. काश्मीर प्रश्न सोडवण्यात होत असलेल्या विलंबामुळं हे तरुण हातात बंदूक घेत असल्याचं हमीदा यांचं मत आहे.

फोटो कॅप्शन,

तारिक अहमदची आई हमीदा

हमीदा म्हणतात, "काश्मीरमध्ये प्रत्येक जण कमकुवत आणि बंदूक घेण्यासाठी हतबल झाला आहे. माझ्या मुलाची गोष्ट यापेक्षा वेगळी नाहीये. सार्वजनिक सुरक्षा कायदा (पीएसए) च्या नावाखाली निर्दोष लोकांना तुरुंगात डांबण्यात येत आहे. पॅलेट गनमुळं लोक आंधळे होत आहेत. काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाल्यानंतरच सर्वकाही ठीक होईल."

सेनेनं केलेल्या आत्मसमर्पणाच्या आवाहनाबद्दल हमीदा यांनी म्हटलं, की मी माझ्या मुलाला कट्टरपंथी विचारांपासून परावृत्त करू शकत नाही. जो कोणी बंदूक हाती घेईल, तो मारला जाईल. माझ्या मुलाच्या नशिबातही यापेक्षा काही वेगळं लिहिलेलं नाही. मारली गेलेली इतर मुलंही माझ्या मुलाप्रमाणेच आहेत.

'...तर कोणीच कट्टरपंथाकडे वळणार नाही'

हमीदा म्हणतात, "काश्मीरमध्ये अत्याचार होतोय. लोकांचा आवाज दाबला जातोय. काश्मीर प्रश्न सुटला पाहिजे. जेव्हा या प्रश्नावर तोडगा निघेल तेव्हा सर्वकाही नीट होईल. जर अत्याचार थांबले तर कोणीच कट्टरपंथाकडे वळणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images

काश्मिरींवर कोण अत्याचार करतं, या प्रश्नाचं उत्तर देताना हमीदा यांनी म्हटलं, "लष्कर, CRPF, SOG आणि पोलीस इथल्या लोकांवर अत्याचार करतात."

भारतीय लष्करांना काश्मिरी तरूणांना केलेल्या आत्मसमर्पणाच्या आवाहनाबद्दल बोलताना हमीदा म्हणतात, "माझा मुलगा कट्टरपंथीय विचारधारेपासून माघारी वळेल, हे आता शक्य नाहीये."

गेल्या दोन वर्षांत झालेल्या संघर्षामध्ये जवळपास ५०० कट्टरपंथी मारले गेल्याचा दावा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. काश्मीरमध्ये २०० हून अधिक कट्टरपंथी सक्रीय असल्याचा दावाही सुरक्षा दलांनी केला आहे.

90 च्या दशकात काश्मीरमध्ये कट्टरपंथीयांचा जोर वाढला होता. त्याचवेळी काश्मिरी तरुण या विचारधारेकडे आकर्षित झाला होता. आजतागायत कट्टरपंथाकडे वळणाऱ्या तरुणांची संख्या कमी झालेली नाही, असं सांगितलं जातं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)