नरेंद्र मोदींनी सकारात्मक बोलणी सुरू केली तर मेहेरबानीच – पाकिस्तानी खासदार

सुषमा स्वराज आणि रमेश कुमार वंकवानी

फोटो स्रोत, TWITTER/RAMESH KUMAR VANKWANI

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुलवामा हल्ल्यानंतर तणाव वाढला आहे. यादरम्यान पाकिस्तानच्या एका खासदारानं भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-एन्साफ (पीटीआय)चे खासदार रमेशकुमार वंकवानी हे प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी भारतात आले आहेत.

या दौऱ्यात त्यांची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी भेट झाली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एक लहानशी भेट झाल्याचं त्यांनी सांगितलं.

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचं सांगत त्यांनी इम्रान खान यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला.

अमृतसरमध्ये बीबीसी प्रतिनिधी रवींद्र सिंह रॉबिन यांना ते म्हणाले, "भारताविरोधात पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर करेल असा तुम्ही आजिबात विचार करू नका, जर पुलवामा हल्ल्यात सहभागाबद्दल काही पुरावे भारताकडे असले तर पाकिस्तानी सरकार त्यावर कारवाई करेल. एकमेकांवर आरोप करण्याचा काळ आता संपला आहे. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे."

दोन्ही देशांमध्ये मैत्री कायम राहावी यासाठी आपण भारत दौरा केल्याचंही त्यांनी सांगितलं.

सुषमा स्वराज यांच्याशी काय बोलणं झालं?

वंकवानी पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातील आहेत. त्यांनी सुषमा स्वराज यांच्या भेटीचे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केले होते.

या भेटीत झालेल्या चर्चेबाबत वंकवानी म्हणाले, "मी परराष्ट्रमंत्री (स्वराज) यांना म्हणालो, प्रतिक्रियेला प्रत्युत्तर म्हणून प्रतिक्रिया देण्याने काही समस्येची उकल होणार नाही, एखाद्या वळणावर आपल्याला सकारात्मक पाऊल टाकावं लागेल. दोन्ही देशांमध्ये मैत्री व्हावी असं देवालाही वाटतं. यामुळंच मी या कठीण परिस्थितीतसुद्धा भारतात येऊ शकलो."

वंकवानी पाकिस्तानातील हिंदू काउंसिलचे प्रमुख आहेत. त्यांनी भारताचे परराष्ट्र् राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्याशी चर्चा केली आहे.

आपण पूर्ण दिवसभर सिंह यांच्याबरोबर होतो असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, TWITTER/RAVINDER SINGH ROBIN

वंकवानी म्हणाले, काही दिवसांमध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक बोलणी सुरू होतील, असं करणं त्यांच्या कमजोरीचं निदर्शक नसेल तर ही त्यांनी केलेली मेहेरबानी असेल.

इम्रान खान यांच्याशी करणार चर्चा

वंकवानी म्हणाले, भारत दौऱ्याची माहिती ते पाकिस्तानात गेल्यावर पंतप्रधान इम्रान खान यांना देणार आहेत.

इथं आपल्याला चांगली वागणूक मिळाल्याबद्दलही त्यांना सांगू असे ते म्हणाले.

जम्मू काश्मीरमधील पुलवामात 14 फेब्रुवारी रोजी आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 हून अधिक जवान मारले गेले.

या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधल्या जैश-ए-मोहम्मदने घेतली होती.

या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असं भारताच्या लष्करप्रमुखांनी आणि पंतप्रधानांनी सांगितलं आहे, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ते आरोप फेटाळले आहेत.

भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)