अनिल अंबानी : 45 अब्ज डॉलर ते 2.5 अब्ज डॉलर अशा घसरणीचा प्रवास

  • आलम श्रीनिवास
  • ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
अनिल अंबानी

फोटो स्रोत, Getty Images

2007 ची गोष्ट आहे. मुकेश आणि अनिल यांची भागीदारी तुटून दोन वर्षं झाली होती.

त्यावर्षी फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत दोन्ही भाऊ मुकेश आणि अनिल यांचा या यादीत वरचा क्रमांक होतो. त्यात अनिल अंबानी यांच्या कंपन्याची एकूण मालमत्ता 45 अब्ज डॉलरची होती. मुकेश यांची संपत्ती 49 अब्ज डॉलर होती.

खरंतर 2008 मध्ये अनेक लोकांना असं वाटायचं की छोटा भाऊ आपल्या मोठ्या भावाच्या पुढे जाईल. विशेषत: रिलायन्स पॉवरचा पब्लिक इश्यू येण्याच्या आधी. अनेकांना असं वाटत होतं की त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या एका शेअरची किंमत एक हजार होईल. असं झालं असतं तर अनिल अंबानी पुढे गेले असते. मात्र तसं झालं नाही.

आता पुन्हा येऊया फोर्ब्सच्या 2018च्या यादीकडे. फोर्ब्सच्या 2018 च्या श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत अगदीच मामूली घट झाली आहे. मुकेश यांची मालमत्ता 47 अब्ज डॉलरची होती. तर अनिल अंबानी 2.5 अब्ज डॉलर इतकीच आहे. ब्लुमबर्ग इंडेक्सनुसार त्यांची संपत्ती फक्त 1.5 अब्ज डॉलर आहे.

एक काळ असा होता की धीरूभाई अंबानींचे खरे वारस आपणच आहोत हे दाखवण्याची चढाओढ होती. आता ही स्पर्धा संपली आणि अनिल आपल्या मोठ्या भावापेक्षा फारच मागे आहेत.

अपूर्ण अपेक्षा

एका दशकापूर्वी अनिल अंबानी सगळ्यात श्रीमंत भारतीय होण्याच्या उंबरठ्यावर होते. त्यांच्या त्या वेळेच्या उद्योगांबाबत असं सांगितलं जायचं की ते सगळे उद्योगधंदे वेगाने वाढत आहेत आणि अनिल त्याचा फायदा घेण्यासाठी तयार आहेत.

आर्थिक विषयांचे तज्ज्ञ मानतात की अनिल यांच्याकडे एक विशेष दृष्टी आणि ऊर्जा आहे. ते 21 व्या शतकातील उद्योजक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत एक बहुराष्ट्रीय कंपनी उभारेल.

अख्खं जग त्यांच्या पायाशी लोळण घेत होते. जग जिंकण्यासाठी त्यांना फक्त काही पावलं उचलायची होती. अनेक लोकांना असं वाटत होतं की अनिल आपल्या टीकाकारांना आणि मोठ्या भावाला चुकीचं सिद्ध करेल. मात्र असं झालं नाही.

फोटो स्रोत, Getty Images

अनिल अंबानी जर एखाद्या चमत्काराने आता वर येऊ शकले नाही तर ते भारतातील सगळ्यात अयशस्वी उद्योजकांमध्ये गणले जातील. कारण दहा वर्षांत 45 अब्ज डॉलरची मालमत्ता गमावणं ही साधीसुधी घटना नाही. त्यांच्या कंपनीच्या भागधारकांना हा मोठा धक्का असेल.

अनिल अंबानी यांचा व्यवसाय फारसा बहरला नाही. त्यांच्यावर मोठं कर्ज आहे. ते आता काही नवीन सुरू करण्याच्या स्थितीत नाही. ते आपला बहुतांश व्यवसाय विकत आहेत किंवा बंद करत आहेत. त्यातच त्यांना रफालचं कंत्राट मिळालं. तेही वादात सापडलं आहे.

धीरूभाई अंबानी यांचं 2002मध्ये निधन झालं. त्यांच्या काळात कंपनीचा विस्तार वेगाने होण्याची चार महत्त्वाची कारणं होती. मोठ्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी, सरकारबरोबर योग्य ताळमेळ, आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करणं.

या गोष्टींवर नियंत्रण मिळवल्यामुळे धीरूभाईंच्या काळात आणि त्याच्या पुढच्या काळात वेगाने पुढे जात राहिली. मुकेश अंबानी यांनी या चारही गोष्टी लक्षात ठेवल्या मात्र काही ना काही कारणांमुळे अनिल मागे पडत गेले.

'काय होतास तू काय झालास तू'

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

धीरूभाई यांना आधीपासून माहिती होतं की ते आर्थिक लाटेवर स्वार होते. त्यांनी त्या लाटेचा चांगलाच फायदा करून घेतला होता. ते त्याच्या खाली उतरू शकत नव्हते. याचा अर्थ असा होता की इतर उद्योगपतींच्या पुढे राहण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी निरंतर पैसा मिळत रहावा म्हणून तसंच शेअर बाजाराचे भाव उच्च रहावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भागधारकांच्या अपेक्षा पूर्ण करायलाच हव्या होत्या.

2007-2008 च्या सुमारास आलेल्या जागतिक मंदीमुळे मुकेश अंबानींना चांगलाच फटका पडला. त्यांच्या संपत्तीत 60 टक्के घट झाली. त्यांनी ही वेळही निभाऊन नेली आणि ते पूर्वपदावर पोहोचले. आता ते पुढे जाण्याच्या तयारीत आहे.

अनिल अंबानींची घसरण होतच गेली. त्यांच्याकडे कोणतीही दुभती गाय नव्हती हेही त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. म्हणजे एखाद्या व्यवसायातून सतत काही आवक सुरू राहील, असा कोणताही व्यवसाय त्यांच्याकडे नाही.

2005मध्ये जेव्हा भावांमध्ये वाटणी झाली तेव्हा मुकेश यांच्या वाट्याला रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी आली. ती समुहातील सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि ती सगळ्यात जास्त नफा देत होती.

फोटो स्रोत, Getty Images

अनिल अंबानी यांच्या हातात टेलिकॉम आली. या कंपनीच्या विस्ताराच्या भरपूर शक्यता होत्या. त्यात सुरुवातीच्या काळात गुंतवणुकीची गरज होती. रिलायन्स फायनान्शिअल सर्व्हिस नफ्यात होती. मात्र त्याची तुलना मोठ्या भावाशी होऊ शकत नाही.

मुकेश यांच्या उद्योगात सातत्याने नफा होत होता तर अनिल यांना पैशासाठी झगडावं लागत होतं. मात्र अनिल अंबानीसुद्धा कच्च्या गुरूचे चेले नाहीत. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून गॅसचा पुरवठा सतत होत राहील अशी एक अट त्यांनी मान्य करवून घेतली होती. गॅसची जी किंमत ठरली होती ती अतिशय स्वस्त होती. अशा प्रकारे त्यांनी गॅससाठी कच्च्या मालाची किंमत ठरवून घेतलेली किंमत अतिशय कमी होती. गॅसच्या किंमत एक अशी जादूची छडी होती जिच्यामुळे त्यांना नफा होण्याची अपेक्षा होती.

मात्र ही योजना राजकारण आणि कोर्टाच्या कचाट्यात सापडली. केंद्र सरकार आणि मुकेश अंबानींनी त्यांना कोर्टात खेचलं.

2010 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तेल आणि गॅस ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे त्याच्या विक्रीची किंमत ठरवण्याचा अधिकार फक्त सरकारला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला सरकारने आदेश दिला की इतर वीज कंपन्यांनाही त्यांनी गॅस विकावा.

या निर्णयामुळे अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसला. त्यांना बाजारमुल्यापेक्षा जास्त दरात तेल खरेदी करावं लागलं. त्यामुळे जास्त नफा आणि गुंतवणूक करण्याची महत्त्वाकांक्षा धुळीस मिळाली.

त्यानंतर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर चा पब्लिक इश्यू आणून बाजारातून पैसा उभारण्याचा प्रयत्न केला. गुंतवणूकदारांमध्येसुद्धा उत्साह होता. त्याचा समभागसुद्धा 72 पटींनी जास्त प्रमाणात सबस्क्राईब झाला. या टप्प्यावर असं वाटलं की सगळं ठीक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

11 फेब्रुवारी 2018 मध्ये शेअर लिस्टिंग झालं. शेअर 538 वर उघडला म्हणजे 450 पासून 19 टक्के जास्त. त्यानंतर त्यात घट व्हायला सुरुवात झाली होती. संध्याकाळी जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा 538 रुपयांवर सुरू झालेला समभाग 372.50 वर येऊन थांबला. अनेक लोकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. हल्ली रिलायन्स पॉवरचा समभाग 12 रुपयांच्या वरसुद्धा जात नाही.

कर्जाचं वाढतं ओझं

1980 ते 1990 च्या दरम्यान धीरूभाई रिलायन्स समुहासाठी सातत्याने बाजारातून पैसा उचलत होते. त्यांच्या समभागाची किंमत कायम चांगली होती आणि मुख्य म्हणजे गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर विश्वास होता.

मुकेश अंबानी यांच्या कंपनीने गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात नफा मिळवला होता. दुसऱ्या बाजूला गॅसच्या प्रकरणात कोर्टाचा निर्णय आणि रिलायन्स पॉवरचे शेअर पडल्यामुळे अनिल यांचा मार्ग खडतर होत गेला.

अशा परिस्थितीत देशा विदेशातल्या बँकाकडून कर्ज घेण्यावाचून अनिल यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. 2000 ते 2010 या काळात मोठ्या भावाच्या कंपनीचा विस्तार झाला आणि लहान भावाच्या कंपनीवर कर्ज वाढत गेलं. त्यांच्या बहुतांश कंपन्या समस्यांशी झुंजत आहेत किंवा साधारण फायदा कमावत आहेत.

आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्या काही कंपन्यांनी दिवाळखोरी घोषित करण्याचा अर्ज केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

काही काळआधी शक्तिशाली आणि राजकीय पक्षांशी संबंध ठेवणाऱ्या कॉर्पोरेट घराण्यावर कर्ज जास्त झालं तर कसंतरी कामं चालवलं जायचं. त्यांच्या कर्जाची पुनरर्चना केली जाते किंवा त्याची परतफेड करण्यासाठी वेळ वाढवून मिळतो. मात्र सध्या एनपीए राजकीय मुद्दा झाला आहे. बँकांची परिस्थिती वाईट आहे.

आता कायद्यातही अनेक बदल झाले आहेत. ज्यांनी कर्ज दिलं आहे ते नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या माध्यमातून कंपन्यांना इनसॉल्व्हंट घोषित करून कर्जदारांकडून रक्कम चुकवण्यासाठी कोर्टात खेचू शकतात. त्यामुळेच दिवाळखोरी घोषित करण्याशिवाय त्यांना काहीही पर्याय नाही.

दोन्ही भावांची वैशिष्ट्यं

जेव्हा धीरूभाई जिवंत होते तेव्हा अनिल अंबानी यांना बाजारातले स्मार्ट खेळाडू मानलं जायचं. त्यांना मार्केट वॅल्युएशनची कला उत्तम अवगत होती. धीरूभाई यांच्या काळात आर्थिक प्रकरणं अनिल आणि औद्योगिक प्रकरणं मुकेश अंबानी पहायचे.

अनिल अंबानी यांच्या टीकाकारांचं असं मत आहे की त्यांनी आर्थिक विषयांवर जास्त लक्ष दिलं. मात्र मुकेश अंबानींनी जितकं मोठ्या प्रकल्पांवर लक्ष दिलं तितकं अनिल अंबानींनी दिलं नाही.

रिलायन्स पॉवर आणि टेलिकॉममध्ये त्यांना तोटा झाला आहे मात्र त्यांची रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या परिस्थितीत आहे. त्यामुळे ते खेळाबाहेर गेले आहेत असं मानणं चुकीचं ठरेल. त्यांच्या दोन्ही कंपन्यांच्या समभागाचे दर चांगले आहेत त्यामुळे त्यांचे भाव वाढणं हे अनिल यांच्यासमोरचं मोठं आव्हान ठरेल.

फोटो स्रोत, Getty Images

रिलायन्सचं विभाजन झालं तेव्हा दोन्ही भावांनी एकमेकांवर खूप आरोप केले. सरकार आणि प्रसारमाध्यमांमध्ये दोन तट पडले. मात्र मुकेश अंबानी यांनी प्रसारमाध्यमांना विशेषत: प्रसारमाध्यमांच्या व्यवस्थापनाला आपल्या बाजूने केलं. या सगळ्या लढाईत अनिल यांनी काही नवीन मित्र जोडले आणि काही नवीन शत्रूही जोडले. एकूणच काय तर प्रभावशाली नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि संपादकांनी शांत आणि सौम्य मुकेश अंबानींची साथ देण्याचा निर्णय घेतला.

बाह्यगोष्टींच्या नियंत्रणाचं काम आधी अनिल अंबानी करत असते. त्यात ते अनेकदा यशस्वीही झाले. मात्र वाटण्या झाल्यानंतर त्यांचा म्हणावा तितका प्रभाव उरला नाही. विशेषत: 2010 नंतर त्यांचा प्रभाव कमी झाला.

आता जी परिस्थिती आहे त्यासाठी बऱ्याच अंशी अनिल अंबानी स्वत: जबाबदार आहे. काही प्रमाणात हा परिस्थितीचाही दोष आहे जी त्यांच्या नियंत्रणात नाही. त्यांनी दिलेली वचनं पूर्ण केली नाही हेही इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांनी बराच संघर्ष केला, पण दिलेली वचनं मात्र त्यांना पूर्ण करता आली नाहीत.

(आलम श्रीवास्तव अंबानी विरुद्ध अंबानी आणि स्टॉर्म इन द सी विंड या पुस्तकांचे लेखक आहेत)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)