मोदी सरकारनं 'संसदेत सखोल चर्चा न करताच विधेयकं मंजूर केली' - बीबीसी मराठी राउंड अप

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसी मराठीच्या महत्त्वाच्या बातम्या एका दृष्टिक्षेपात.

1) मोदी सरकारनं 'संसदेत सखोल चर्चा न करताच विधेयकं मंजूर केली'

"16व्या लोकसभेत बरीचशी विधेयकं संसदीय समितीकडं न पाठवता घाईत मंजूर केली गेली आहेत. त्यामुळं विधेयकातल्या मुद्द्यांवर सखोल चर्चा न करताच कायदे बनवले गेले," अशी माहिती 'PRS Legislative Research' या दिल्लीतील संस्थचे अध्यक्ष M. R. माधवन यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

संसदेच्या अधिवेशनाच्यावेळी सभागृहात सरकार आणि विरोधीपक्ष नेते करत असलेल्या राजकीय टीका-टिप्पणींना जास्त महत्त्व मिळतं. त्यातून विधेयकांवर सखोल चर्चा होत नाही. तसंच वेळेअभावी विधेयकांवर अधिवेशनाच्यावेळी खासदारांना सविस्तर चर्चा करता येत नाही, असं ते सांगतात.

त्यामुळे विधेयकाच्या विषयानुसार संसदेच्या संबधित समितींकडे या विधयेकांची शिफारस केली जाते. संसदीय समित्यांच्या बैठकीत त्या विधेयकांवर सखोल चर्चा होते. या समित्यांच्या बैठका नियमित होतात आणि विधेयकांवर सविस्तर चर्चा होते. खासदार संबंधित विधेयकावर काही सुधारणा सुचवू शकतात. भाजपने मात्र हे आक्षेप फेटाळले आहेत.

कसं होतं 16व्या लोकसभेचं कामकाज? याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

2) कलम 35A : काश्मीरमध्ये यामुळे इतर भारतीय मालमत्ता घेऊ शकत नाहीत

सुप्रीम कोर्टात सोमवारी (25 फेब्रुवारी) कलम 35-A संदर्भात एका याचिकेवर सुनावणी होणार आहे.

पुलवामा इथं CRPF च्या जवानांवर झालेल्या हलल्याच्या पार्श्वभूमीवर या सुनावणीला विशेष महत्त्व आलं आहे.

दरम्यान सरकारने काश्मीरमधील काही फुटीरतावादी नेत्यांना अटक केली असून काश्मीरमध्ये बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीतील 'वुई सिटीझन' या स्वयंसेवी संस्थेनं कलम 35-ए विरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. कलम 35-A आणि 370 मुळे काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे.

देशातील अन्य नागरिकांसोबत हा भेदभाव असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे. कलम 35-A च्या अधिक माहितीसाठी इथं वाचा.

3) पुलवामा : काश्मिरी माता म्हणतात, 'कोणतीही आई मुलाच्या हाती बंदूक देत नाही'

"कोणतीही आई आपल्या मुलाला बंदूक देत नाही. जेव्हा आमची मुलं बंदूक हातात घेतात, तेव्हा आपल्या कुटुंबाला त्याबद्दल सांगत नाहीत. त्यावेळी ते आपल्या आई-वडिलांचा विचारही करत नाहीत." कुलगाममधील खुदवानी इथल्या आपल्या तीन मजली घरासमोर पारंपरिक काश्मिरी पोशाखात बसलेल्या फिरदौसाजवळ उमरच्या केवळ आठवणी उरल्या आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल KJS ढिल्लन यांनी काश्मिरी मातांना आवाहन केलं होतं, की ज्यांच्या मुलांनी हाती बंदूक घेतली आहे, त्यांना शरणागती पत्करण्यासाठी समजवावं.

फोटो कॅप्शन,

आपल्या मुलाच्या फोटोसह फिरदौसा बानो

फिरदौसा यांचा मुलगा उमर वानीचा मृत्यू 2018 साली अनंतनागमधील बहरामसाब भागात भारतीय लष्करासोबतच्या चकमकीत झाला होता. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

4) D. S. हुडा: 'सर्जिकल स्ट्राईक्स'चे नायक हे काँग्रेसचे 'अजित डोवाल' आहेत का?

बहुचर्चित 'सर्जिकल स्ट्राइक' मोहिमेचे नायक मानले जाणारे माजी लेफ्टनंट जनरल D. S. हुडा यांची काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षाविषयक टास्क फोर्सवर नियुक्ती झाली आहे. त्यामुळं काँग्रेसलाही स्वतःचे अजित डोवाल मिळाले आहेत, असं म्हटलं जात आहे.

नुकतंच हुडा यांनी 'सर्जिकल स्ट्राईकवर जरा जास्तच राजकारण केलं गेलं,' असं विधान केलं होतं. पण काँग्रेस पक्षाच्या सुरक्षा विषयक टास्क फोर्सवर माझी नियुक्ती झाली असली तरी मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/RAHUL GANDHI

फोटो कॅप्शन,

माजी लेफ्टनंट जनरल D. S. हुडा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

हुडा यांनी हे स्पष्ट करण्यामागे काही खास कारण होतं का? इथं वाचा बीबीसीनं घेतलेली हुडा यांची मुलाखत

5) व्हेनेझुएलात अन्न, औषध मिळवण्यासाठी हिंसाचार; मदतीचे ट्रक पेटवले, सीमा रोखल्या

व्हेनेझुएलात ब्राझिल आणि कोलंबियामधून येणारी मदत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी रोखून धरल्यामुळे सीमेच्या आसपासच्या भागांत संघर्ष उफाळला आहे. ही मदत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागरिकांवर अश्रुधूर आणि रबरी गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात 2 जणांचा बळी गेला आहे.

अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी माईक पॉम्पेओ यांनी नागरिकांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला असून राष्ट्राध्यक्षांच्या समर्थकांचा उल्लेख 'ठग' असा केला आहे.

पॉम्पेओ यांनी आलेली मदत जाळून टाकणं म्हणजे खालच्या पातळीचं कृत्य आहे, अशी टीका केली आहे. व्हेनेझुएलन राष्ट्राध्यक्ष यांनी अशी कारवाई करण्यामागे काय कारणं असावीत जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)