राज ठाकरे : 'पुलवामाबद्दल अजित डोवालांचीच चौकशी करा, म्हणजे सगळे बाहेर येईल' #5मोठ्याबातम्या

राज ठाकरे

फोटो स्रोत, AFP

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्या अशा :

1. राज ठाकरे : 'पुलवामाबद्दल अजित डोवालांचीच चौकशी करा, म्हणजे सगळे बाहेर येईल'

पुलवामा हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या एका माणसाची कसून चौकशी झाली तर सगळी माहिती बाहेर पडेल, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर रविवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसंच निवडणुकीच्या तोंडावर अशीच एखादी घटना घडवली जाईल, अशी शक्यताही राज ठाकरेंनी व्यक्त केली. 'सकाळ'नं यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

एखादी घटना लपवायची असेल तर काहीतरी मोठी बातमी आणायची, हे सगळ्या सरकारांमध्ये चालत आलंय. पण या सरकारमध्ये त्यात प्रचंड वाढ झाल्याचं राज यांनी म्हटलं आहे. नोटाबंदी, राफेल आणि भ्रष्टाचाराची अन्य प्रकरणं जनतेने विसरावीत, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा मध्यात सरकारकडून काहीतरी मोठं घडवलं जाईल, अशी शंका राज यांनी व्यक्त केल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.

2. निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांवरः जीएसटी कौन्सिलचा महत्त्वपूर्ण निर्णय

फोटो स्रोत, Getty Images

जीएसटी कौन्सिलच्या रविवारी झालेल्या बैठकीत गृहनिर्माण क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. निर्माणाधीन घरांसाठी जीएसटीचा दर हा 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर दिली. 'इकॉनॉमिक टाइम्स'सह सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी ही बातमी दिली आहे.

या बैठकीत अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे परवडण्यासारख्या घरांवरील जीएसटी 8 टक्क्यांवरून 1 टक्क्यावर आणण्यात आला आहे. नवीन कर दर हे 1 एप्रिलपासून लागू होतील. ज्यांची घरखरेदी आधीच झाली आहे, त्यांच्या हफ्त्यांवरही हे नवे दर लागू होतील.

3. नांदेडमध्ये किसान सन्मान योजनेचा बोजवारा, लाभार्थींना पैसे परत करण्याची सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभारंभ केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा बोजवारा उडाल्याचं नांदेडमध्ये पहायला मिळालं. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातील 8 हजार 182 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार रुपये टाकले. मात्र अवघ्या काही तासांतच त्यातील 1 हजार 21 लाभार्थी शेतकऱ्यांना हे पैसे परत करण्यास सांगण्यात आलं आहे.

'एबीपी माझा'नं यासंबंधीची बातमी दिली आहे. बँकेनं एक मेल पाठवून हे पैसे परत करायला सांगितलं आहे. मात्र त्यामागचं कारण स्पष्ट न केल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

4. राज्यात खासगी शाळांची बंदची हाक, अडीच हजार शाळा सहभागी

फोटो स्रोत, Getty Images

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE ) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचं शुल्क तातडीनं जमा करण्यात यावं, यासह विविध मागण्यांसाठी इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने (ईसा) सोमवारी बंद पुकारला आहे. या 'शाळा बंद' आंदोलनात राज्यातील अडीच हजार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सहभागी होणार आहेत.

'लोकसत्ता'नं यासंबंधीची बातमी दिली आहे. या शाळांमध्ये परीक्षा मात्र सुरळीत सुरू राहतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी मुख्याध्यापकाऐवजी शालेय वाहतूक व्यवस्थापनावर सोपवावी, मोफत गणवेश, पुस्तके आदी पुरविण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, विनाअनुदानित शाळांचा दर्जा वाढण्यासाठी तातडीने ऑनलाइन सुविधा सुरू करावी आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.

5. पाकिस्ताननं एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत 20 बॉम्ब वापरून प्रत्युत्तर देईलः परवेझ मुशर्रफ

फोटो स्रोत, Getty Images

भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची आगळीक पाकिस्तान कधीच करणार नाही, असं स्पष्ट मत पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी व्यक्त केलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध हे अतिशय धोकादायक पातळीपर्यंत ताणले गेले असले तरी अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता मुशर्रफ यांनी फेटाळून लावली. दुबईमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये मुशर्रफ यांनी पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधातील तणावांवर भाष्य केले. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं मुर्शरफ यांच्या पत्रकार परिषदेचं वृत्त दिलं आहे.

पाकिस्ताननं भारतावर एक अणुबॉम्ब टाकला तर भारत असे २० बॉम्ब वापरून संपूर्ण पाकिस्तान बेचिराख करू शकतो. यावर पर्याय म्हणजे पाकिस्ताननं पहिल्यांदा थेट ५० अणु बॉम्ब वापरून भारतावर हल्ला करावा लागेल, असं ते म्हणाले. हे करायची आपली तयारी आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)