पुलवामा : काश्मीरमध्ये सैनिकांची संख्या वाढवली, अफवांचं पेव

लष्कर Image copyright Getty Images

फुटीरतावादी नेत्यांची धरपकड झाल्यानंतर आणि काश्मीरमध्ये सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यातच कलम 35-ए वर सर्वोच्च न्यायालयात सोमवार होणाऱ्या सुनावणीमुळे फुटीरतावादी नेत्यांनी रविवारी काश्मीर बंदची घोषणाही केली होती. या परिस्थितीत काश्मीरमध्ये अफवांचे पेव फुटले आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.

काश्मीरमध्ये एकूणच निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आणि अफवांचं फुटलेलं पेव यांमुळे जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी एक पत्रक प्रसिद्ध केलं. निवडणुकांमुळे खोऱ्यात सैनिकांची संख्या वाढविण्यात आल्याचं मलिक यांनी या पत्रकाद्वारे स्पष्ट केलं. या गोष्टीचा संदर्भ इतर कशाशीही जोडला जाऊ नये, असं आवाहनही मलिक यांनी केलं.

मलिक यांनी बीबीसीला सांगितलं, "काश्मीरमध्ये लोक अफवा पसरवत आहेत. तेव्हा मी काय करू शकतो, हे कसं थांबवू शकतो? वेगानं पसरणाऱ्या अशा अफवांवर लोकांनी विश्वास न ठेवता शांतता राखली पाहिजे. अफवांमुळे लोकांच्या मनात विनाकारण भीती निर्माण होते. लष्कराकडून सुरक्षेशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेतली जात आहे पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात येत आहे."

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अतिरिक्त सैन्य

मलिक यांनी म्हटलं, की पुलवामामधील हल्ल्यानंतर भारतातील लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी कट्टरपंथीयांकडून जोरदार प्रयत्न केले जाऊ शकतात. या प्रयत्नांना खीळ घालण्यासाठीच सुरक्षा दलांकडून आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. या प्रयत्नांना केवळ निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीनंच पाहिलं पाहिजे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रविवारी काश्मीरमध्ये कडेकोट बंद पाळला गेला.

"येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगाची एक मोठी टीम इथला दौरा करणार आहे. निवडणुकांसंबंधी निर्णय घेण्यासाठीच हा दौरा आहे. येत्या काही दिवसांत काश्मीरध्ये सुरक्षा दलांची संख्या वाढवली जाऊ शकते," असंही मलिक यांनी सांगितलं.

जमात-ए-इस्लामीचे कार्यकर्ते आणि अन्य काही फुटीरतावाद्यांना ताब्यात का घेतलं, या प्रश्नाचं उत्तर देताना सत्यपाल मलिक यांनी सांगितलं, "काश्मीरमध्ये ही काही विशेष बाब नाहीये. हे लोक राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर कट्टरता पसरवतात. 'जमात'च्या लोकांचा उल्लेख यासंदर्भात विशेषत्वानं करायला हवा. दक्षिण काश्मिरमध्ये हे लोक युवकांना कट्टरपंथी बनवतात. जेव्हा कोणतीही चकमक होते, तेव्हा त्यांचे कार्यकर्ते सामान्यांना मशिदींमधून दगडफेक करायला उद्युक्त करतात."

पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर मर्यादा

स्थानिक प्रशासनानं रविवारी पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा मर्यादित करण्याचेही आदेश दिले आहेत. यामुळं आधीच दहशतीच्या सावटाखाली असणाऱ्या काश्मीरमधली परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

काश्मिरचे विभागीय आयुक्त बशीर अहमद खान यांनी रविवारी स्पष्ट केलं, की श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग सातत्यानं बंद राहिल्यामुळं काही भागांमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या रेशनिंगचे आदेश देण्यात आले आहेत.

Image copyright Getty Images

दरम्यान, फुटीरतावादी नेत्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून जमात-ए-इस्लामीच्या 200 कार्यकर्त्यांना तसंच इतर नेत्यांना अटक करण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे.

एका फुटीरतावादी नेत्याच्या भावानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, की 23-24 फेब्रुवारीला रात्री पोलिसांनी त्यांच्या भावाच्या घरी छापा घातला होता. भाऊ काही दिवसांपासून घरीच नव्हता.

या सर्व घडामोडींमध्ये रविवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि कट्टरपंथीयांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलीस उपाधीक्षक (डीएसपी) अमन ठाकूर यांचा मृत्यू झाला तर एक जवान जखमी झाला.

रविवारी फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदामुळे काश्मिरमधील जनजीवनही पूर्णपणे ठप्प झालं होतं. दुकानं उघडली नाहीत तसंच रस्त्यांवरही पूर्ण सामसूम होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)