लाठीचार्ज झालेल्या कर्णबधिर मुलांचे सरकारला शाप लागतील - राज ठाकरे

पुणे मोर्चा

फोटो स्रोत, Nitin Nagardhane

पुण्यात आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढणाऱ्या कर्णबधिर तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

कर्णबधिर तरुणांच्या संघटनेने सोमवारी पुण्याच्या समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढला.

कर्णबधिरांना शिक्षण आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

व्हीडिओ कॅप्शन,

पुण्यात कर्णबधिर मोर्चेकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

त्यांच्या या प्रमुख समस्या आहेत

1.1995चा RPWD (Rights of Persons with Disability) कायदा आहे तेव्हापासून आमच्या ज्या मागण्या आहेत त्यावर काहीही कारवाई झालेली नाही.

2.अंध आणि विकलांग व्यक्तींना अनेक सुविधा दिल्या मात्र आम्हाला काहीही दिलं नाहीत.

3.2016 चा ही कायदा आला मात्र त्यात आम्हाला काहीही मिळालेलं नाही.

4.2013 पासून कर्णबधिर लोकांच्या हक्कांसाठी लढूनसुद्धा काहीही झालं नाही.

5.कर्णबधिरांच्या भावनांशी सरकार खेळ करत आहे.

6.कर्णबधिर मुलींवर बलात्कार होत आहे त्याकडे सरकारचं लक्ष नाही.

फोटो स्रोत, Nitin Nagardhane

झालेल्या प्रकाराबदद्ल पोलिसांनी माहिती दिली. ते म्हणाले, "इथं मोर्च्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. तेवढ्यात मोर्चाचे नेते प्रदीप मोरे यांनी सांकेतिक भाषेत पोलिसांचे बॅरिकेड तोडून पुढे चाल करण्याचं आवाहन केलं आणि आंदोलकांना चिथावलं. त्यानुसार आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आणि पोलिसांना तुडवून पुढे गेले आणि गोंधळ उडाला."

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान या सगळ्या प्रकारावर सुप्रिया सुळे यांनी टीका करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ही अत्यंत निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या मुलांना बोलताही येत नाही ती मुलं शांतपणे आपल्या मागण्या घेऊन आली होती. त्यांच्यावर लाठीमार करण्याइतपत पोलिसांची मजल गेलीच कशी? असा सवाल त्यांनी केला. राज्याला सक्षम गृहमंत्री असावा अशी आमची आधीपासून मागणी आहे. ते वारंवार खरं ठरत आहे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री पूर्णपणे अयशस्वी ठरले असून त्यांनी राजीनामा द्यावा असं त्या म्हणाल्या.

हे डायर सरकार असल्याची टीका सुद्धा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Nitin Nagardhane

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. ज्या मुलांना बोलताही येत नाही त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिले असा सवाल त्यांनी केला. या मुलांचे शाप सरकारला लागतील असं ते म्हणाले. मूकबधिरांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे स्वतः मांडणार असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)