राज ठाकरे : 'कर्णबधिर मुलांवर लाठीहल्ला करणाऱ्या सरकारला शाप लागतील' - बीबीसी मराठी राउंड अप

Image copyright NITIN NAGARDHANE
प्रतिमा मथळा आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे कर्णबधिर तरुण

1. राज ठाकरेंची : कर्णबधिर मुलांवर लाठीहल्ला करणाऱ्या सरकारला शाप लागतील

पुण्यात आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढणाऱ्या कर्णबधिर तरुणांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ला प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या मुलांना बोलताही येत नाही त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिले, असा सवाल त्यांनी केला. या मुलांचे शाप सरकारला लागतील असंही ते म्हणाले.

कर्णबधिर तरुणांच्या संघटनेने सोमवारी पुण्याच्या समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. कर्णबधिरांना शिक्षण आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या मुलांची चौकशी केली.

या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कर्णबधिर तरुणांच्या मागण्या आणि त्यांच्या आंदोलनाबद्दल सविस्तर जाणून घ्या.

2. आरक्षण नाही दिलं, तर लाखो धनगर विधानभवनावर धडकतीलः धनगर नेत्यांचा इशारा

Image copyright Getty Images

राज्य सरकरानं त्वरित अध्यादेश काढून धनगर आरक्षण लागू करावं. अन्यथा आम्ही 27 फेब्रुवारीला महाडमधून मोर्चा काढून विधानभवनावर धडकू, असा इशारा धनगर आरक्षण संयोजन समितीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

गुरुवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्र्यांना भेटले.

धनगर समाजाच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेत हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी आपण केंद्राला शिफारस करू, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. धनगर आरक्षणाचा नेमका प्रश्न काय आहे, समजून घेण्यासाठी इथं वाचा.

3. ऑस्करवर भारताची छाप : मासिक पाळीवर जागृती करणाऱ्या तरुणींची कथा

Image copyright Getty Images

भारतातील एका लहानशा गावात सॅनिटरी नॅपकिन्स बनवणाऱ्या तरुणींची कहाणी सांगणाऱ्या माहितीपटाला यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्त्कृष्ट लघू माहितीपट म्हणून गौरविण्यात आलं आहे.

बीबीसीच्या प्रतिनिधी गीता पांडे यांनी ऑस्कर सोहळ्यापूर्वी या तरुणींची त्यांच्या गावात जाऊन भेट घेतली होती. या भेटीचा सविस्तर वृत्तांत वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

4. नॅशनल वॉर मेमोरियलबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीमध्ये नॅशनल वॉर मेमोरियलचं उद्घाटन केलं. इंडिया गेट परिसरात नॅशनल वॉर मेमोरियल बांधण्यात आलं आहे. विविध युद्धांमध्ये मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतिसाठी हे स्मृतिस्थळ उभारण्यात आलं आहे.

Image copyright EPA

अमर जवान ज्योतीजवळ 40 एकर परिसरात पसरलेल्या या स्मृतिस्थळासाठी 176 कोटी रूपयांचा निधी लागला आहे. नॅशनल वॉर मेमोरियलची वैशिष्ट्ये इथं वाचा.

5. उत्तर कोरिया अण्वस्त्रांशिवाय उत्तम देश असू शकतो - डोनाल्ड ट्रंप

उत्तर कोरियाने जर अण्वस्त्रांचा त्याग केला तर तो एक उत्तम देश होऊ शकतो, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे. ट्विटरवर आपलं मत व्यक्त करताना ते म्हणाले, "या राष्ट्राला इतर देशांपेक्षा प्रगतीच्या जास्त संधी आहेत."

Image copyright Getty Images

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी उत्तर कोरिया अजूनही धोकादायक आहे, असं म्हटलं होतं त्या पार्श्वभूमीवर ट्रंप यांनी हे वक्तव्य केलं आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांची डोनाल्ड ट्रंप व्हिएतनाममधल्या हनोई इथं भेट घेणार आहेत.

डोनाल्ड ट्रंप यांची उत्तर कोरियाविषयीची भूमिका आणि ट्रंप-किम जाँग उन यांच्या भेटीविषयी सविस्तर वाचा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics