शिवसेनेची मोदींवर पुन्हा टीका : डिजिटल इंडियात पायधुणी आली कोठून? - #5मोठ्याबातम्या

मोदी

फोटो स्रोत, Getty Images

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवरील 5मोठ्या बातम्या अशा :

शिवसेनची मोदींवर पुन्हा टीका : डिजिटल इंडियात पायधुणी आली कोठून?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. या कृतीचा उल्लेख 'राजकीय पायधुणी' असा करत शिवसेनेचे मुखपत्र सामनाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधानांनी सफाई कामगारांचे पाय धुतले त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन पण कामगारांचे प्रश्न पायाचे नसून पोटाचे आहेत असं 'सामना'ने म्हटलं आहे. डिजिटल इंडियात ही पायधुणी आली कोठून असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

2. पुलवामा हल्ल्यात वापरलेल्या गाडीचा मालक बेपत्ता

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात मारूती इको मिनिव्हॅनचा वापर करण्यात आला होता, ती गाडी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने हल्ल्याच्या दहा दिवस आधी विकत घेतली होती. पण या गाडीचा मालक बेपत्ता आहे, असे नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (NIA) एनआयएने म्हटले आहे ही बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे.

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद बट याने ही गाडी विकत घेतली होती.

फोटो स्रोत, Getty Images

तो दक्षिण काश्मीरमधील बिजबेहराचा रहिवासी असून तो फरार आहे, हल्ल्याच्या तपासातील हा महत्त्वाचा धागा असल्याचे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.

3. जेवण कसे शिजतेय? रेल्वे प्रवासी पाहणार

आपण ऑर्डर केलेले जेवण रेल्वेच्या स्वयंपाकघरांमध्ये कसे शिजवले आणि पॅक केले जात आहे, हे प्रत्यक्ष पाहण्याची सुविधा रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'रेल्वे दृष्टी डॅशबोर्ड' (www.raildrishti.cris.org.in) नावाची वेबसाइट त्यासाठी तयार करण्यात आली असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी तिचे लोकार्पण केले. ही बातमी एनडीटीव्हीनं दिली आहे.

'विविध रेल्वेगाड्या, स्थानके, विकली गेलेली तिकिटे यांची माहिती या वेबसाइटवर असेलच, पण आयआरसीटीसीच्या देशभरातील स्वयंपाकघरांमध्ये शिजवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची प्रक्रियाही तेथे थेट पाहता येणार आहे', असे गोयल रेल भवनातील पत्रकार परिषदेत म्हणाले.

4. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून निरोप, पण मोदींसोबत राहू - रामदास आठवले

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आम्हाला निरोप येतो आहे पण आम्ही मोदींसोबत राहणार आहोत असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आरपीआयच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहोत असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आम्हाला अनुल्लेखाने मारू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे, असं वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई यामधली एक लोकसभा जागा मिळावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. त्यासोबत लातूर, रामटेक, सोलापूर यापैकी एका जागेची मागणी त्यांनी केली आहे. साताऱ्याची जागा नको असं असल्याचं देखील आठवले यांनी स्पष्ट केलं.

5. राम मंदिर आणि बाबरी वाद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. यामध्ये न्या. रंजन गोगोई, न्या. बोबडे, न्या. चंद्रचूड, न्या. अब्दुल नाजीर आणि न्या. अशोक भूषण यांचा समावेश असणार आहे. 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने राम मंदिर आणि बाबरी प्रकरणात जो निकाल दिला त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या 14 याचिकांवर हे खंडपीठ सुनावणी करणार आहे. याप्रकरणी 29 जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र खंडपीठातील पाच न्यायाधीशांपैकी न्या. बोबडे हे सुट्टीवर होते, त्यामुळे या तारखेला सुनावणी होऊ शकली नाही. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)